Tuesday, April 6, 2021

शोध घोड्याच्या वाटेचा

राजाची वाट

त्र्यंबकेश्वरच्या जंगलात, 'घोड्याची वाट', म्हणून एक जुना घाट मार्ग आहे. १ जानेवारी १६६४ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज सुमारे दहा हजाराचे घोडदळ घेऊन गोंदे घाट उतरून या वाटेने जव्हारच्या दिशेने गेले होते. सूरत मोहिमेशी निगडीत असलेल्या त्र्यंबकेश्वर ते गोंदे या मार्गाला जुन्या पिढीतली मंडळी, 'घोड्याची वाट', म्हणून ओळखते. विशेष म्हणजे ही वाट अतिक्रमण आणि कथित विकासकामांपासून आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. आता ती बरीच पूसट झाली असली तरी तिच्या असंख्य खाणाखूणा बघायला मिळतात. एका प्रसिद्ध धबधब्यावरून जाणार्‍या या वाटेवर जुन्या पुलाचे अवशेष अजूनही थोड्या फार प्रमाणावर शिल्लक आहेत.
पौष वद्य द्वादशी, ३१ डिसेंबर १६६३ या दिवशी शिवाजी महाराजांनी त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतल्याची नोंद शिवापूर यादीत आढळते. सुरत लुटीची मोहिम गोपनिय असल्याने त्यासंबंधी असलेल्या पुराव्यांची मर्यादा पाहता ही अत्यंत महत्वाची नोंद मानली जाते. शिवापूर यादी हे समकालिन साधन आहे, इतिहास अभ्यासक त्यास विश्वासार्ह मानतात. 

शोभकृत संवत्सरे शके १५८५
- मार्गशीर्ष वद्य २, (६ डिसेंबर १६६३) सुरतेस गेले
- पौष शु।। १२,  (३१ डिसेंबर १६६३) त्रिंबकराज दर्शन 
- पौश वद्य ८ (११ जानेवारी १६६४) माघारे आले

या मोहिमेच्या मार्गाचा विचार करता ऐतिहासिक नोंदींच्या बरोबरीने स्थानिक मान्यतांना अव्हेरून चालणार नाही. त्र्यंबकेश्वर परिसराच्या बाबतीत दोन ठिकाणे आहेत ज्याची मान्यता सुरतेच्या स्वारीशी संबंधित आहे. त्यातलीच ही, 'घोड्याची वाट'.

 
अंधारात निघण्याचे प्रयोजन म्हणजे अंधारात ही वाट साध्य असू शकते की नाही याचा अंदाज येणार होता

शिवापूर यादीतील हा उल्लेख राजगडावरून सुरतेस निघाले या अनुषंगाने आहे. शिवापूर यादीतल्या नोंदीनुसार राजगड ते त्र्यंबकेश्वर हे तीनशे सव्वा तीनशे किलो मिटरचे अंतर पंचवीस दिवसात पार केले. या मोहिमेत त्र्यंबक हेच कलाटणी देणारे ठिकाण ठरते. 'इथून पुढे कुठे जाणार'? याचं वारंही लागू न देता दहा हजाराची फौज जव्हारच्या दिशेने गेली. त्र्यंबकला जव्हारशी जोडणार्‍या पारंपारिक व्यापार मार्गास फाटा देऊन महाराजांनी एक वेगळाच मार्ग निवडला. जुने व्यापार मार्ग हे किल्ले, गावे, नद्या, पाणवठे अशा महत्वाच्या ठिकाणांवरून जात. याचे कारण म्हणजे ते प्रवास मार्गावरचे थांबे म्हणून उपयोगी पडायचे. चारापाणी, मुक्काम अशा वेगवेगळ्या कारणांसाठी. अशा ठिकाणावरून धुराळा न उडवता डोंगरांच्या पोटातली एक कमी वापराची वाट शोधून काढण्यात आली ही अचंभित करणारी गोष्ट ठरते. 

ही काही व्यापारी वाट नाही ज्यावरून बैलगाडी सदृष्य वाहने जाऊ शकतात. त्यासाठी सद्या प्रचलित असलेले दोन वेगवेगळ्या बाजुंनी जाणारे त्र्यंबक-जव्हार मार्ग हेच व्यापार मार्ग म्हणून वापरात असावेत. त्र्यंबकेश्वरचे धार्मिक महत्व, तिथे भरणारा कुंभमेळा पाहता जव्हारशी जोडणारा मार्ग हा बैलगाड्यांचे तांडे जाऊ शकतील इतका प्रशस्त नक्कीच असणार यात शंका नाही.

हर्षेवाडीचे सुक्रुबाबा

Lekurwali Ghat to Dugara Jumgle route


घोड्याची वाट ही स्थानिकांचा गोंदे परिसर ते त्रिंबक परिसरात ये जा करण्याचा मार्ग आहे. तो पूर्वी पासून प्रचलित असावा. शिवपूर्व काळापासून याचा वापर होत असावा. या परिसराची डोंगराळ रचना पाहता ही सर्वात सोपी आणि जव्हारकडे सर्वात वेगाने जाणारी वाट ठरते. गुगल नकाशावरून तिचा अदमास घेतला तरी त्याचे प्रत्यंतर येते. या वाटेवर आढळणारे जुन्या पुलाचे अवशेष मोठी उत्सकता निर्माण करतात. जर ही व्यापारी वाट नव्हती. दळणणवळणाची वाट होती. स्थानिकांची केवळ पायी ये जा करण्याची वाट होती तर त्यावर पुलाची काय आवश्यकता? सुरतेच्या मोहिमेसाठीच तर हा तयार केला नसेल ना? तो इतक्या तयारीनिशी बनविण्याचे अन्य कुठले तार्किक प्रयोजन दिसत नाही. 
त्र्यंबकेश्वरला जव्हारशी जोडणारा हाच प्रमुख पारंपारीक मार्ग असता तर गोंदा घाटातून बैलगाडी उतरणारी वाट नक्कीच असती. घाटाच्या खडकाळ, एके ठिकाणी असलेली चिंचोळी पट्टी तर एके ठिकाणी काहीसा तिव्र स्वरूपाचा उतार पाहता त्यावरून बैलगाडी नेणे दुरापास्त. घोडे, खेचर, गाढव, बैलांवर माल लादून न्यायचे असेल तर ते शक्य. परंतू मुळातच त्र्यंबकेश्वर परिसरात इतका मोठा कच्चा माल तयार होत नव्हता किंवा ही मोठी व्यापारी पेठ नव्हती त्यामुळे घोड्याच्या वाटेचा वापर पारंपारिक पद्धतीच्या दळणवळणासाठी संभवत नाही, केवळ पायी जाण्यासाठी किंवा निरोपासाठी होत असावा. केवळ पायी ये-जा करण्यासाठी हा पूल बांधण्याची आवश्यकता नाही. 
आज मितीला त्र्यंबकवरून जव्हारकडे जाणारा सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे गणपत बारीतून आंबोली, अंबईचा घाट उतरून, निळमातीवरून जव्हार. ५०.३ किलो मिटरचे अंतर. दुसरा मार्ग म्हणजे पेगलवाडी, भिलमाळ, टाके हर्ष, निरगुडपाडा, खोडाळा मार्गावरून जव्हार. जुन्याच मार्गावर आवश्यक ते फेरफार करून इंग्रज आमदतीन त्यावर आज दिसतात ते घाटरस्ते बांधले गेले.
या दोन मार्गांना सोडून आणखी एक वाट होती असे सांगितले तर अनेकांचा यावर विश्वास बसणार नाही. महाराजांनी तिचाच वापर करून सुरत मोहिमेस कलाटणी देणारा प्रवास तिथून केला असण्याची शक्यता आहे.

त्रिंबकगड आणि त्याच्या आसपासचे किल्ले हे त्यावेळी मोगलांकडे होते. इतक्या मोठ्या मोहिमेसाठी महाराज त्र्यंबकेश्वर वरून जाण्याचा धोका पत्कारतील का? अभ्यासकांना भेडसावणार्‍या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या कार्यशैलीतूनच मिळते. ''लाखाच्या फौजेच्या गराड्यात राहणार्‍या शास्ताखानावर केलेला लाल महालातल छापा, अफजुलखानाचा वध, पन्हाळगडातून सुटका, आग्र्यात भर दरबारात औरंगजेबचा अपमान, त्यानंतर झालेल्या कैदेतून संपुर्ण फौजेसह सुखरूप पलायन'', अशा अनेक प्रसंगात महाराजांनी अतिशय तोकडे संख्याबळ असूनही मोगलांना धडका दिल्या. सर्वच्या सर्व प्रसंगात विजयश्री मिळवली. महाराजांनी स्वराज्य मिळवलं तेच मुळी आदिलशाही, मोगल आदी परकीयांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशाचे लचके तोडून. 
त्रिंबकगड किंवा त्यावेळचा हरिहरचा किल्ला हे बेलाग दुर्ग. थोड्या शिबंदीवर लढले जाणारे बेजोड किल्ले. महाराज दहा हजाराचे सैन्य घेऊन पायथ्याशी दाखल झालेत म्हटल्यावर त्यांच्याकडून आगळीक केरण्याचे धारिष्ट्य ही अवघड गोष्ट आहे. गडावरून उतरून खाली लढायला येणे म्हणजे आत्मघातच ठरल असता. लहानशा शिबंदीकडून अशी जोखिम अशक्य गोष्ट ठरते. 'एक मोठे सैन्य पायथ्याशी आले. मुक्कामी राहिले. कुठे तरी निघाले. या बाबी तटावरून प्रेक्षक होऊन पाहणे इतकीच त्यांची भूमिका राहिली असणार यात शंका नाही.
 

दुगारवाडी धबधब्याचा आटलेला तळ
सुरत मोहिमेसाठी महाराज राजगडावरून निघाले त्यावेळी तिथून केवळ सहा मैल अंतरावर असलेल्या सिंहगडाला मुगल सरदार जसवंतसिंह वेढा देऊन बसला होता. त्यास थांगपत्ता लागू न देता. महाराजांनी मार्गाशिर्ष वद्य द्वितीयेला प्रस्थान केले. 'त्र्यंबकेश्वर पर्यंतचा प्रवास हा तीनशे ते सव्वा तीनशे किलो मिटरचा असल्याचे मत इतिहास अभ्यासक गिरीश टकले नोंदवतात. त्यासाठी महाराजांना पंचवीस दिवस लागलेत. याचा अर्थ हा प्रवास त्यांनी वेगाने केलेला नाही. वाटेत काही मोहिमा किंवा इतर काही कामे पार पाडली असणार, अन्यथा घोडदळाने हे अंतर निम्म्या वेळेत पार होऊ शकले असते', असेही श्री टकले यांनी सांगितले.

सुरत हे त्याकाळचे जगातले प्रमुख बंदर म्हणून गणले जायचे. जगभरातील मालाची आयात निर्यात तिथून केली जायची. औरंगजेबच्या काळात तर सूरत भरभराटीला होते. 'मोगलांची आर्थिक राजधानी', असेही त्यास संबोधले जायचे. महाराष्ट्रातून सुरतेला औरंगाबाद-अंकाई-सटाणा-मुल्हेर-नंदूरबार-सुरत हा प्रमुख वापरातला मार्ग होता. आणखी एक मार्ग पश्चिम किनारपट्टीवरून जाणारा. कल्याण-विक्रमगड-डहाणू-सिल्वासा-वापी. या दोन्ही मार्गावर परकीय सत्तांचे वर्चस्व असल्याने त्यावरचा प्रवास शत्रूच्या लक्षात येणारा ठरू शकला असता. राजगड ते त्र्यंबक वाटचालीत कुणालाही नेमका अंदाज बांधणे शक्य होऊ नये अशा स्वरूपाच्या महाराजांच्या हालचाली होत्या. खरी कलाटणी मिळाली ती त्र्यंबकेश्वर पासून. तिथून पुढचा प्रवास हा प्रचलित वाटांना फाटा देऊन केला, या तर्काला ही घोड्याची वाट पुष्टी जोडते.


काळा बाण: लग्नस्तंभ, पांढरा बाण - दुगारवाडी धबधब्यावरून कळमुस्तीनदीकडे जाणारी वाट



हा तोच ऐतिहासिक पुल असू शकतो


हा तोच ऐतिहासिक पुल असू शकतो
कळमुस्ती नदीतला ऐतिहासिक पुल अवशेष रूपात

चुन्याच्या घाणीचे चाक नदीतल्या जुन्या पुलालगत

नदीपलिकडच्या पात्रात पुलाच्या पायाची कातळकोरीव खाच


नदी पार करताच लागणारी जुनी प्रशस्त मळलेली वाट

चार नद्या
ही वाट अतीशय सोपी आहे, केवळ दोन ठिकाणी ती काहीशी चिंचोळी आहे, ती पट्टीही शंभर एक फुटांपेक्षा कमीच. तिव्र उतार नाही, एकही मोठी किंवा मध्यम चढण नाही. डिसेंबर/जानेवारी महिन्याचा विचार करता चार ठिकाणी नदी ओलांडावी लागते.

१) किकवी, तळेगाव/काचुर्ली
२) कळमुस्ती, दुगारवाडी
३) वाल, उंबर्डे
४) चिंचओहळ, घाट गोंदे
यात किकवी ही श्रावणात दुथडी भरून वाहते, त्यात छाती इतके पाणी असते. डिसेंबरमहिन्यात पात्र कोरडे पडते. नदी सहज ओलांडता येते. कळमुस्ती आजमितीला कोरडी. त्याकाळी तिच्यात जासत पाणी असावे. यासाठी पुलाचे नियोजन. वाल नदी पावसाळा संपतात आटते. सहज ओलांडता येते. चिंचओहळचे पात्र उथळ. ती सहजगत्या ओलांडता येते, तेव्हा कमी वेळेत, कोणाला थांगपत्ता लागू न देता वेगवान हालचालीसाठी ही वाट निवडली असण्याची शक्यता आहे. त्र्यंबकगड, ब्रम्हा, हरिहर उतवड या डोंगरांच्या पायथ्यांने जाणारी ही वाट गडावरच्या तोफांच्या मार्‍यापासून सुरक्षित आहे. प्रत्यक्ष वाट बघित्यानंतर त्याची खात्री पटते. 

मोकळी माळवाट

जुन्या वाटेच्या तळाचे दगड

मोकळी माळावरची वाट
गुगल नकाशावरून पाहिेले तेव्हा, 'घोड्याची वाट', डोंगराचे कमीत कमी चढ उतार असलेली वाट दिसत होती. प्रत्यक्षात मोठे घोडदळ त्यावरन जाऊ शकते का? किती ठिकाणी चिंचोळे मार्ग आहे? किती ठिकाणी नदी ओलांडावी लागते? नदीचे पात्र कसे? अशा अनेक प्रश्नांचे निराकरण प्रत्यक्ष भेटीत करता अले. त्र्यंबकेश्वरवरून महाराज पुढच्या सहा दिवसात सुरतला दाखल झालेत, हे पाहता ही वाट जास्त सोयीची वाटते. 'महाराजांचे घोडदळ त्र्यंबकवरून गोंदे घाट उतरून जव्हारकडे गेले', या बाबत इतिहास अभ्यासकाता मान्यता आहे. 

शिरप्याचा माळ
या वाटेच्या पुढच्या टप्प्यात जव्हार परिसरात दुसरी एक मान्यता आहे, ज्यात शिवाजी महाराजांनी जव्हार राजे पहिले विक्रमशहा यांची भेट घेतलेली. जव्हार परिसरात अशी मान्यता आहे की, १६६४च्या १ जानेवारीला जव्हार नरेश पहिले विक्रमशहा यांनी जव्हारच्या सीमेवर एका टेकडीवर शिवाजी महाराजांची भेट घेतली. उभयतामध्ये मित्रत्वाची बोलणी झाली. जव्हार नरेशांकडून त्यांना सूरतला जाणार्‍या वाटे संबंधी मार्गदर्शन मिळाले. या प्रसंगी शिवाजी महाराजांच्या जिरेटोपात विक्रमशहा यांनी मौल्यवान शिरपेच खोवला. जव्हारच्या त्या टेकडीला आजही शिरप्याचा माळ म्हणून ओळखले जाते.

सपाटी वरून जाणारी मळलेली वाट
---
---

माहित आहे 'घोड्याची वाट'! 
यंदा जानेवारी, फेब्रुवारी असा सुमारे दिड महिना त्र्यंबकेश्वरमध्ये एका लेखनकार्यासाठी मुक्काम होता. त्यावेळी त्र्यंबकगडाच्या परिसरात मनसोक्त भटकंती करण्याचा योग आला. ब्रम्हगिरी किल्ल्याच्या वेगवेगळ्या वाटा, परिसरातील ऐतिहासिक स्थळे, बारवा, शिलालेख, मंदिरे बघण्याचा सपाटा सुरू होता. एके दिवशी इतिहासाचे अभ्यासक उदय थेटे यांनी महत्वाची खबर आणली, 'हरिहर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हर्षेवाडीत त्यांचे शेत कसणार्‍या सक्रुबाबांना, 'घोड्याची वाट ठाऊक आहे'! ही तीच वाट आहे ज्या वाटेने शिवाजी महाराज सुरतेले गेले होते. स्थानिक आदिवासींमध्ये तशी मान्यता आहे'. 
सुरत मोहिमेचा सांगोपांग अभ्यास असलेले गिरीश टकले यांच्याशी संपर्क करून, 'महाराजांचे सैन्य कोणत्या वाटेने त्र्यंबकेश्वर वरून जव्हारकडे गेले', या संबंधी विचारले तेव्हा त्यांनी गोंदे घाट उतरून गेल्याचे सांगितले. त्यांच्या 'सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई', या महाराष्ट्र देशा फाऊन्डेशनने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात ते नमुद केले आहे.

एके दिवशी उदय थेटे यांच्यासोबत चर्चा करत असताना चक्क सुक्रुबाबा हजर झाले. त्र्यंबकेश्वरला बाजारासाठी आले की त्यांची थेटेंकडे चक्कर होतेच. त्यांच्याकडून घोड्याच्या वाटेची माहिती घेतली. त्यांच्याशी बोलताना एक गोष्ट पक्की झाली, बाबांचे कोणतेच शालेय शिक्षण झालेले नाही. त्यांचा इतिहासाचा अभ्यास असल्याचे कोणतेच संकेत मिळाले नाही. 'ही घोड्याची वाट कशी कळली', यावर त्यांचे सरळ उत्तर, 'आजोबा व वडिलांसोबत त्यावाटेवरून गेलो आहे'. एकेठिकाणी पुलाचे अवशेष असल्याची माहिती त्यांनी दिली. 'तुम्ही या, तुम्हाला तिथले जंगल दाखवतो, असे त्यांनी सांगितले. ' आम्हाला जंगल अजिबात बघायचे नाही, फक्त आणि फक्त घोड्याची वाटच बघायची आहे, दुसरे काहीच बघायचे नाही, असे त्यांना सांगितले. घोड्याची वाट उतरून आपल्याला गोंदे घाटाने उतरायचे. तिथून मोठ्या रस्त्यावर पोहोचायचे इतके त्यांना सांगितले. 

लेकुरवाळी घाटातून अवघ्या दिड किलो मिटरवर चालीनंतर दिसणारा उतवड

महामारीची ठकठक
बाबांनी होकार कळवला होता. पण त्यानंतर बाबांचा थांगपत्ता लागेना. एकतर त्यांच्याकडे फोन नाही, कोणाचा पर्यायी क्रमांक नाही. त्यांची भेट घेऊन निघण्याची वेळ ठरवायची तर त्यासाठी हर्षेवाडीला जाणे आले. सुमारे महिनाभर बाबा हाती लागले नाही. दरम्यान माझे त्र्यंबकेश्वरचे काम आटोपले. नासिकला आल्यावर कामाचा गराडा वाढत असताना एक वाईट बातमी येऊन आदळली, आमच्या सौभाग्यवतीं नम्रताला कोरोना विषाणूची लागण झाली. तिच्या सगळ्या बहिणींना या महाभयंकर विषाणूची बाधा झाली. नम्रताच्या बहिणींना त्यांच्या त्यांच्या गावी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तिचा तपासणी अहवाल येण्याची वाट न पाहता आम्ही तिला एका खासगी सदनिकेत विलगीकरणात ठेवले. घोड्याच्या वाटेची सगळी उत्सुकता मावळली. तोच उदय थेटेंचा फोन आला, हर्षेवाडीला जाऊन बाबांची भेट घेणार आहे, रविवार, १४ मार्चला जाण्याचे नियोजन करू...
माझी निघण्याची शक्यता मावळली असताना, उदयला नियोजन करून ठेवायला सांगितले. काही तरी चमत्कार घडणार, असे का वाटत होते. 'निघाचे असेल तर पहाटे साडे पाचला निघण्याचे नियोजन करा. उन्हे वाढल्याने दुपारच्या वेळेस चालणे जिकिरीचे ठरेल. किती चढ किती उतार याची काहीच कल्पना नसल्याने सकाळच्या थंड वातावरणात जास्तीत जास्त वाट कापण्याचे उद्दीष्ट साधता येईल. माझे जाणे होणार नसले तरी त्याने एक दोघांना घेऊन वाट बघून यावी असा विचार मनात होता. त्यामुळे काळाच्या उदरात दडून राहिलेली महाराजांचा त्र्यंबकेश्वर-जव्हार हा मार्ग समजणार होता. एका महत्वाच्या विषयाची माहिती हाती लागणार होती. 


जुनी वाट आणि त्याच्या बाजुला असलेली झाडी
उदय सोबत त्र्यंबकेश्वर शिवप्रतिष्ठानचे आणखी काही कार्यकर्ते सोबत येण्यास तयार होते. तोच एक चांगली गोष्ट घडली. आमच्या डॉक्टर मित्राकडे नम्रताची तपासणी केली. कोव्हिड चाचणी, रक्त चाचणी आणि छातीचा एक्सरे केला. 'फुप्फूसात विषाणूचा सौम्य फैलाव असल्याने दवाखान्यात दाखल करण्याची आवश्यकता नाही. घरच्या घरी औषधे घेता येतील', ही वार्ता ऐकून सौभाग्यवती कमालीच्या आनंदल्या. मोठे संकट थोडक्यात निभावतेय म्हटल्यावर तिच्या मनावरचा ताण हलका झाला. माझ्याही काळजी कमी झाली, तेव्हा सहज खडा टाकला, 'परमेश्वर कृपेने तूझी स्थिती सामान्य असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे, तेव्हा मी त्र्यंबकला जाऊन येतो'. आनंदाच्या भरात तिने होकार कळवला. शनिवारी रात्री त्र्यंबकेश्वरकडे कुच केली. एका मित्राकडे मुक्काम केला. रात्री उशिरा त्र्यंबकेश्वरी पोहोचल्यावर दुसर्‍या दिवसाचे नियोजन केले. सुक्रू बाबा लेकुरवाळी घाटात येणार. लेकुरवाळीच्या मंदिरा जवळ त्यांना साडे पाचला येण्याची वेळ दिली. मुलांना त्र्यंबकच्या गौतमी तलावा जवळ रविवारी पहाटे पावणे पाचला निघण्याची वेळ देऊन आम्ही शुभरात्री केली. 



घोड्याच्या वाटेला समांतर धावणारे ब्रम्हा, हरिहर डोंगर
'यश'ने प्रश्न सोडवला
लेकुरवाळी घाटात आम्हाला सोडण्यास यश लोहगावकर तयार झाला. त्याच्यावरच गोंदे घाट संपल्यावर घ्यायला येण्याची जबाबदारी देण्यात आली. भटकंतीची आवड असलेला हा सर्पमित्र आम्हाला जीपने सोडण्यास व घ्यायला येण्यास तयार झाल्याने एक मोठी सोय झाली होती. सगळेच मित्र जाणार असताना, यशने मोठ्या मनाने त्याग भावनेचे दर्शन घडविले.
दुसर्‍या दिवशी पहाटे प्रत्यक्षात सगळी मुले वेळेवर आली. यश देखिल भल्या पहाटे जीपसह हजर झाला. अपवाद एकाचा. त्यामुळे वीस मिनीटे निघण्यास विलंब झाला. सहभागी संख्या अकरा झाली. 
सोबत दोन लिटर पाणी प्रत्येकी, दुपारचा जेवणाचा डबा, पूर्ण बाह्यांचा शर्ट अथवा टी शर्ट, डोंगरावर चालण्याचे उत्तम बुट असा प्रत्येकाचा जामानिमा होता. सव्वा सहा वाजता त्र्यंबक सोडले, गणपत बारीतून सापगाव, काचुर्ली असा साडे चार किलो मिटरचा प्रवास झटक्यात पूर्ण करून ब्रम्ह्याच्या डोंगराच्या पायथ्याचे लेकुरवाळी देऊळ गाठले तेव्हा सुक्रु बाबा आलेच नव्हते. अंधारात निघण्याचे नियोजन कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली. तिथून दोन जण त्याच जीप गाडीने हर्षेवाडीत बाबांना घ्यायला गेले. साडे सहा वाजता बाबांना घेऊन मुले हजर झाली. त्यांनी लेकुरवाळीचे दर्शन घेतले. सहभागींना काही प्राथमिक सूचना देऊन पाचच मिनीटात आम्ही प्रस्थान केले. 

जुन्या चौकी वजा इमारतीच्या पायाचे ठिकाण
महाराजांनी लेकुरवाळीचा घाट चढला असेल का? हा विचार मनात डोकावत होता. बाबांसोबत लेकुरवाळी घाट उतरताना त्यांनी घोड्याची वाट इथून नव्हे तर काचुर्लीवरून सुरू होते असे सांगितले. म्हणजे आम्ही उगाचच घाटातून सुरूवात केली होती. ही गल्लीत बाबांना आमचा विषय नीट न समजल्याने झाली होती. लेकुरवाळी घाटातून आम्ही दुगारवाडीत उतरणार होती. काचुर्लीची वाट दुगारवाडीत येऊन पोहोचते. याला स्थानिक मंडळी दुगारा म्हणतात. ही तीच दुगारवाडी जिचा धबधबा प्रसिद्ध (की कुप्रसिद्ध) आहे. 'भल्या सकाळी कुठे चाललात', हे कुतुहल, 'गोंद्याला जायचे आहे', म्हटल्यावर त्यांचे आश्चर्ययुक्त उद्‌गार ऐकायला मिळाले. दुगारवाडीत भटके येतात ते दुगारवाडीचा धबधबा बघायला. तोही पावसाळ्यात. इथून दुसरीकडे जाण्याची वाट कोणी विचारत नाही, अशी पुस्ती तिथल्या एका बुजुर्गाने जोडली. 

उंबर्डे जवळ आल्याची खुण

Jambhulwadi at the left

दुगारवाडीची शिव उतरल्याबरोबर एक लहान माळ लागला. तिथून पुर्वोत्तर बाजुच्या टेकडीकडे निर्देश करून बाबांनी जुन्या वाटेची पदचिन्हे दाखवली, 'दुगार्‍यावरून येणारी ही जुनी वाट हाये', 'तेच्या कडेची झाडी दिसते', 'ती इथे येऊन मिळते'. 'म्हणजे दुगारवाडी धबधब्याचा पाण्याचा प्रवाह ओलांडावा लागत असेल', या प्रश्नावर बाबांनी, 'नाही! तो तर काचुर्लीच्या अलिकडेच लागतो, असे स्पष्ट केले. श्रावण महिन्यात मोठी ४० मैल अंतराची ब्रम्हगिरी-ब्रम्हा-हरिहर ही मोठी प्रदक्षिणा करणारे ती ओलांडतात. ती किकवी नदी. हिचा उगम ब्रम्ह्याच्या डोंगरावर होतो. श्रावणात ती काही वेळा छाती इतक्या पाण्यातून ओलांडावी लागायची. गेल्या वीसेक वर्षांपूर्वी तीवर पक्का पुल बांधला आहे. आता तिचे पाण आटून तळाचे दगडगोटे दिसत आहेत.

exposed vast stone path 
आम्ही आता खर्‍या खुर्‍या घोड्याच्या वाटेवर होतो. जुन्या प्रशस्त मळलेल्या वाटेची पदचिन्ह व्यवस्थित दिसत होती. त्र्यंबकेश्वर पासून इथवर यायचे तर सगळा प्रवास हा हलक्याशा उताराने. सापगावच्या वाटेला लागल्यावर इथल्या झाडीतून कोण चालले आहे हे दुर्गभांडारवरून दिसणे दुरापास्त. महाराजांचे सैन्य या वाटेवर असेल. रात्रीच्या अंधारात त्यांनी त्र्यंबक सोडले असेल किंवा मध्यरात्री गाव आणि किल्ला मिट्ट अंधारात पहूडला असताना. 

broad way of the Ghodyachi wat

जुना पुल...
आता आम्ही कळमुस्ती नदी उजवीकडे ठेऊन थोडे खाली उतरत होतो. ही कळमुस्ती नदी ब्रम्ह्याच्या डोंगरावर उगम पावते. खालच्या बाजुला हरिश्चंद्रगडाचा प्रवाह तिला येऊन मिळतो. उण्यापुर्‍या पाच मिनीटात आपण कळमुस्तीच्या पात्रात येऊन पोहोचतो. इथे पुढची फळी थबकलेली. 'काय आहे', 
'दादा हा बघ जुना पुल'! चुन्याच्या घाण्याचे मोठ्या आकाराचे एक दगडी जाते बाजुला पडलेले, चुन्यात संधलेले मोठमोठे दगड सुटे होऊन नदीपात्रात विखुरलेले', थरारून जावे असा हा अनूभव. 'अरे! खरच की, हा लहान उंचीचा जुना पुलच. बाजुला चुन्याच्या घाणीचे चाक. नदीच्या पात्रात अनेक अनगड, घडलेले दगड विखुरलेले. काही दगडांना छन्नी हाथोड्यांनी केलेली छिद्रे'. भान हरपून सगळेजण पुल बघत होते. ज्या वाटेवरून बैलगाडी जाणार नाही. जीवर तोकडी वहिवाट. अशा मार्गावर पुलाचे जुने अवशेष निर्देष करत होते की, होवो ना होवो सुरतेच्या स्वारीच्या वेळी याच पुलाचा वापर केला असावा. या उधवस्त पुलाच्या थोडे पुढे एक नवा सिमेंटचा बंधारा बांधला आहे. जलसिंचन किंवा वनविभागाने बांधलेला हा एक सर्वसाधारण असा जलसिंचन बंधारा वाटतो. त्यावरून पलिकडे जाता येते. नदीच्या पलिकडच्या बाजुला जुन्या पाण्याच्या टाक्या सारखा आकार दगडात खोदलेला दिसला. पण ते टाके नाही. त्याच्या डाव्या उजव्या अंगाला दगडातच लहानशी खाच खोदलेली. पाण्याच्या प्रवाहात दगडांना आधार मिळावा यासाठी ती खोदण्याचे प्रयोजन दिसते. या पुलाची उंची आठ दहा फुटांपेक्षा अधिक नसावी. याने भर पावसात घोडदळाच्या वेगवान हालचालीस सहाय्य होण्यास मदत झाली असणार. 

Ghodyachi wat meets the tar road of Jambhulwadi-Umberde
कळमुस्तीवरच्या शिवकालिन इतिहासाशी नाते सांगणार्‍या पुला समोर नतमस्तक होऊन एक अगदीच लहानशा चढणीला लागलो. या चढणीत विखुरलेले दगड सांगत होते, त्याच्या जुन्या प्रशस्त वाटेची कहाणी. पुढच्या पाच मिनीटात डोंगराचा काठ लागतो. तिथून खाली दुगारवाडी धबधब्याचा तळाचा भाग दिसतो. त्या वरून येणारी घोड्याची वाट, जी कळमुस्ती पुलावरून इथे येते. 'शिवाजी राजांची फौज तुमच्या आमच्या ओळखीच्या दुगारवाडी धबधब्यावरून गेली होती', हा विचार सर्वांना रोमांचित करत होता. 
सह्याद्रीतल्या किल्ल्यावर जाताना जशी आपल्याला दगड गोट्यांनी मळलेली प्रशस्त वाट लागते तशी ही भली प्रशस्त वाट. आता वापर नसल्याने ती पुसटशी झाली असली तरी तिचा तळ तिचा दैदिप्यमान इतिहास सांगण्यासाठीच जणू आपले अस्तित्व टिकवून असलेला. वाटेतला प्रत्येक जुना दगड, 'ती दिव्य पावले' या वाटेवरून गेल्याची साक्ष देत होता. या प्रशस्त माळाला समांतर जाते ती ब्रम्हा डोंगराची उत्तरी धार. पुढे हा माळ अगदी प्रशस्त होतो. आजुबाजुला कोणतेच गाव नाही की वस्ती नाही. पायाखालची वाट जुनी मळलेली. ज्यावरून बैलगाडी नव्हे पण घोडे नक्कीच गेले असावे याची शाश्वती देणारी. 
अवघ्या दहा मिनीटाच्या चालीनंतर समोर दिसू लागला तो भला थोरला उतवडचा डोंगर. दक्षिण दिशेला ब्रम्ह्याच्या जोडीने हरिहरचा किल्ला, नागफणी, भास्करगड. ही डोंगरचौकडी नजरेच्या टप्प्यात तरी झाडी झाडीच्या वाटेमुळे समोरच्या टेहाळणीस अदमास लागू न देणारी, गडावरूनच्या कुठल्याच मार्‍यात न येणारी वाट. दोन ठिकाणी काही दगडी जोती वजा अवशेषांचे ढिगारे दिसतात. या चौक्या तर नसाव्यात? अशी शंका घेऊन आपण दुतर्फा झाडी झाडोर्‍याने संरक्षित केलेल्या वाटेवर येतो. जणू काही एखाद्या जुन्या वाटेच्या बाजूस टिकून असलेली झाडी झुडपांची रांग. याचा तळ म्हणजे मळलेला दगडी वाट. हे जुन्या घोड्याच्या वाटेचे अवशेष, सुक्रु बाबा सांगत तसा प्रत्येक टप्पा डोळ्यात जीव आणून जो तो बघत, ही कुठली कृपा म्हणावी की या वाटेवर अतिक्रमण नाही की विकासकाम! 
अगदी रमतगमत, सकाळच्या थंड वातावरणात आमची संथ चाल सुरू होती. दुगारवाडी धबधब्याचा तळ पाहिला त्याच्या पन्नास मिनीटात आम्ही पक्क्क्या डांबरी रस्त्याला लागला. हा रस्ता म्हणजे जांभुळवाडी ते उतवडच्या पायथ्याचे गाव उंबर्डे यांना जोडणारा. अलिकडच्या काळात तो बांधलेला. तो तयार करताना प्राचीन घोड्याच्या वाटेचा काही भाग त्याने गिळंकृत केला. दुर्गम वाड्या जोडताना ऐतिहासिक महत्वाच्या घोड्याच्या वाटेचे अभ्यास केला असता तर त्यावर हा रस्ता न बांधता त्याच्या बाजूने नेता आला असता. ह्या जांभुळवाडूतीन अलिकडच्या काळात नागफणी भास्करगडाची भली मोठी खिंड फोडून निरगूडपाड्याकडे जाणारा पक्का रस्ता बनवण्यात आला आहे.

what an abstract symmetry 
इथून पुढे वाल नदीचे पात्र लागते. ही देखिल लहानशी नदी. भास्करगडावर उगम पावते. ही वाग नदीची उपनदी. पुढे जाउन ती ओझरखेडजवळ दमणगंगेला मिळते. डिसेंबर जानेवारी महिन्याचा विचार केला तर ही नदी ओलांडणे अगदी सोपे. कळमुस्तीवर जसा पुल तशा पुलाची या ठिकाणी आवश्यक्ता नाही. नदीच्या दगड गोट्यातून सहज वाट काढता येते. उंबर्डे गावाकडे न जाता आम्ही उत्तर बाजुने उतरताच समोर एक लहानशी टेकडी लागली. पाठीमागे उतवड डोंगराची भव्य आकृती. 'आता आपण गोंदे घाटाला लागलोय', बाबा उत्तरले. त्यामुळे त्र्यंबक रांगेतले दैदप्यमान डोंगर सोडून आमच्या नजरा भटकंतीच्या दुनियेतल्या या अस्पर्षीत वाटेवर लागल्या. 
उत्तर बाजुने जाणारी ही वाट. शंभर एक फुटाची पातळ धार. त्यात्या पुढे पुन्हा उतार. हा उतार थेट गोंदे गावात नेणारा. गोंदा घाट उंचीने अगदीच थोडका, परंतू याचे ऐतिहासिक महत्वा मोठे. खाली घाटात दुरवर एक मोठी इमारत दिसत होती, तीच गोंद्याची शासकीय आश्रमशाळा. पाऊण तासाच तिथवर पोहोचू, सक्रुबाबा सांगत होते. सकाळी पावणे सात वाजता सुरू केलेला प्रवास अगदी रमत गमत आम्हाला सव्वा नऊ वाजेच्या सुमारास गोंदे घाटाच्या मुखावर घेऊन आले होता. सकाळपासून कोणीच काही खाल्ले नव्हते. उन लागले नाही, परंतू उन्हाचा ताप जाणवायला लागला होता. इथेच न्याहारीसाठी आम्ही बसकन मारली, घोड्याच्या वाटेवर मावळे गोंदे घाटाचा परिसर बघत न्याहारी करत होते. 
पाऊण तासाचा अवकाश घेऊन आम्ही घाट उतरायला सुरूवात केली. अगदी कुर्मगतीने चालून आम्हाला २२ मिनीटे लागली घाट उतरायला. आता सपाटीला मोठे आंब्याचे झाड लागले. तिथे पुन्हा अर्धातासाची विश्रांती घेऊन सगळे ताजेतवाने झाले. घोड्याची वाट आणि गोंदे घाट पार झाले होते. आता आमचे उद्दीष्ट होते ते जव्हार मार्गाला जोडणार्‍या ठिकाणी पोहोचण्याचे. सुरूवातीला अंदाज होता गोंदे घाट उतरून नीळमाती लागेल याचे, परंतू इथून नीळमाती कुठच्या कुठे राहून जाते हे लक्षात आले. टळटळीत उन्हातून चालत पुढच्या पंचवीस मिनीटात आम्ही चिंचओहळ नदीवर आलो. या नदीचा उगम भास्करगडावरचा. तिच्यात उतवडचे पाणी येऊन मिळते. तिचा पुढचा प्रवास कळू शकला नाही. जानेवारी महिन्याच्या हिशोबाने पायी नदी ओलांडता येते. नदीचे पाणी अतिशय स्वच्छ व गोडे. पिण्यालायक पाणी कुठून भरायचे याचे उपजत ज्ञान असलेल्या सक्रुबाबांनी पाच मिनीटे भर उन्हात चालवले आणि नदीत वाहत्या पाण्यावरचे एक डबके शोधले. पाण गार व चवदार असल्याने सगळ्यानी ते भरपर प्यायले. गोंद्याची एक वाडी सोडून आम्ही समोरच्या दिशेला दिसणार्‍या जुन्या मंदिराच्या दिशेने कुच केली. हे घाट गोंदे गावचे शिवमंदिर. इथे गोंदे घाटातून येणार्‍या कच्च्या वाटेला डांबरी रस्ता मिळतो. जसे जांभुळवाडीत घोड्याच्या वाटेचे नव्या डांबरी रस्त्याशी मिलन, अगती तशाच पद्धतीचे. शिवमंदिराच्या प्रांगणात एक प्रशस्त अशी जुनी विहीर. घाट गोंदेचा तमाम महिला वर्ग पिण्याचे व वापरण्याचे पाणी त्यातून भरण्यासाठी ये जा करताना दिसत होता. विहीरीचे पाणी स्वच्छ व चवदार आहे. वरच्या बाजुला एक शिलालेख दिसला. खालच्या काठावर उतरून त्याचे छायाचित्र घेतले. फार जुना नसवा. पण तो वाचता आला नाही. कोणी तरी विहीरीचा जिर्णोद्दार केल्याचा लेख लिहीला असण्याची शक्यता वाटते. शिवमंदिरात दर्शनादी आटोपून मंदिराच्या मागे 'उरल्या सुरल्या खाण्यावर', सगळ्यांनी ताव मारला. नानाविविध पदार्थांची मेजवानीच ती. तोच आम्हाला घ्यायला येणारा यश लोहगावकर जीप घेऊन हजर झाला. त्याला हे ठिकाण सहजासहजी सापडले. याचा अर्थ आम्ही जव्हार मार्गाच्या जवळ होतो. 

without reaching umberde a path leads to the Ghat
आणखी एक धक्का
घाट गोंद्यातून जव्हार मार्गाला लागलो. तिथल्या वाडीत विचारले, 'कोणते गाव'? उत्तर आले, 'शेरीचा पाडा'! आता डोक्याला हात मारण्याची पाळी होती. ज्या शेरीच्या पाड्यावरून अनेक वर्षे आम्ही हिवाळ्यात उतवड-भास्करगडाची भटकंती करायचो तिथे आम्हाला घोड्याची वाट घेऊन आली. सक्रु बाबांनी स्पष्ट केले, ही घोड्याची वाट. हीला आमचे पुर्वज राजाची वाट म्हणायचे. शिवाजी राजे या वाटेने गेले्याचे त्यांना कळाले होते. 'राजाची वाट' हे नाव ऐकून अंग माहरून गेले. आमच्या राजाने आभाळा इतके कर्तुत्व केले. अपार पुण्य कमवले. साड तीनशे  वर्षे पश्चात, इतिहास व शिक्षण कशाचाही गंध नसलेला वर्ग त्यांचे नाव ज्या आदबीने घेते ते पाहून गहिवरून आले. काय चारित्र्याचा देह आमच्या महाराष्ट्रभूमीला लाभला. याचा सार्थ अभिमान बाळगत आमची घोड्याच्या वाटेची भटकंती सफल झाली. 
- प्रशांत, १४/३/२०२१

विशेष आभार:
१. उदय थेटे
२. सखरू बाबा
३. यश लोहगावकर
४. निखील महाजन

संदर्भ:
शिवापूर यादी
जेधे शकावली
सुरतेची लूट की स्वराज्याची भरपाई,
गिरीश टकले, (मराठी देशा फाऊन्डेशन)
शककर्ते शिवराय, विजय देशमुख

val river, it is easy to cross it from the upper section

old marks on the bamks of wal river that originates from Bhaskargad

Umberde, base village of  Utwad is ahead, our way turns in the left side of the jungle

majestic Utwad now in the Sight

beautifyl trees at the entrence of Gonde Ghat



here begins the Gonde Ghat

mouth of Gonde Ghat

the narrow begning of Gonde Ghat...thouth a small stretch



from the top of Gonde ghat the base Ghat Gonde village, near the state highway

early start to the trekk enabled us to reach the final section befor the blaze of the Sun



little slope of the Gonde Ghat, with Utwad at the background

Gonde Ghat is no bullock cart way

little steep slope no proper for bullock cart


Gonde Ghat ends here

small descend of Gondeghat leading to large open way


Ruver Chinch Ohal is easy to cross during summer

parallel new road to the Gonde Ghat road from Ghat Gonde village

resting destination after Trimbakeshwar, Shiv temple, water well at Ghat Gonde village

big old square  water well

memory stone at Ghat Gonde




the contures speak Shivaji Maharaj took the most easiest route from Trimbak to Gonde

our rote marked on Google map, Trimbakeshwar to Gonde village



1,2 and 3 Maharaj took the easiest and shortest route on his Surat mission in 1663 AD

comprative routes. Dotted is the traditional route from Trimbak

Jedhe Shakawali mention of the Surat mission



we trekked teh Ghodyachi alias Rajaya Chi wat (blue)


Shivapur yadi published by Bharat Itthas Sanshodan Mandal, Pune







5 comments:

  1. खर तर घाट वाटांचे वेड जोपासताना त्र्यंबक रांगेपलिकडे कोकणात गुजरातकडे उतरणाऱ्या वाटा ते थेट कोंडाई बारी पर्यंत उतरणाऱ्या वाटा याविषयी माझ्या मनात उत्सुकता आहे.याविषयी मी चौकशी पण केली अनेकांकडे पण योग आला नव्हता.तुमच्या या छान अभ्यासपूर्ण मोहिमेचे वर्णन वाचून परत एकदा याकडे नेटाने बघावे लागेल असे दिसतेय😀

    ReplyDelete
  2. फार सुंदर वर्णन

    ReplyDelete
  3. फारच सुंदर प्रशांतजी,उदय व अन्य सहकारी
    पराग मुळे,त्र्यम्बकेश्वर

    ReplyDelete
  4. अभ्यासपुर्ण भटकंती आणि त्याची सुंदर मांडणी .

    ReplyDelete