Wednesday, May 22, 2019

Tahakari: a temple that laments!



टाहाकारी: अनोखे शिल्प, देखण्या बांधणीचे शाक्त मंदिर
कुणाचा टाहो कानावर पडली की माणसाचे मन हेलावते. ती तर आदीशक्ती, कुणा लढवैय्या पुरूषांला असे रडताना बघून ती देखिल हेलावली. 'हा कुण्या असामान्य व्यक्तीचा विलाप नाही, खुद्द राम सीतेच्या आठवणीने व्याकुळ झालेत', शिवानी समजावले तर पार्वतीला रामाची परिक्षा पाहण्याची हुक्की आली. आपल्या हातून त्याची कुचेष्टा होतेय हे लक्षात येताच आदी माता खजिल झाली. मग ती आंबेच्या रूपाने गावात विराजमान झाली. तिच्या आगमनाने गावाला वैभव मिळाले. टाहोकरी, टाहाकारी जुन्या व्यापार मार्गावरचे वैभवशाली केंद्र बनले. 
आज अगदी अडगळीत गेल्या सारखे बाजुला पडले असले तरी गतकाळी टाहाकारीत व्यापाराची भरभराट होती. पांथस्तांची ये-जा होती. विश्वास बसणार नाही इतका हा परिसर आज रूक्ष वाटतोय. इथली शेती ओस पडली आहे. आढळा तर पूर्ण आटली-रूसली. आपल्या अमिट सौंदर्याची छाप सोडणारे पुरातन मंदिर, या गावचे कोणे एकेकाळी केवढे मोठे वैभव होते याची साक्ष देत उभे आहे.

महाराष्ट्रात जिथे असंख्य मंदिरं जिर्णशिर्ण अवस्थेत शेवटची घटका मोजताहेत, तिथे टाहाकारी उत्तमरित्या टिकून आहे. शेवटी हा माणूसच! त्याला ना मंदिराचे वैभव जोपासता आले ना आढळाचा मान राखता आला. त्यामुळे जीवनाची गती येथे मंदावली असावी.
आढळा रूसली तसे गावात पिण्यालाही पाणी शिल्लेक राहिले नाही. शेती जर्जर झाली, वृक्ष, वन्यसंपदा या परिसरातापासून दूरावली. परिसर भकास झाला.
आंबामाई वाट बघतेय! माणसाची बुद्धी केव्हा ठिकाणावर येईल याची. 'पुरातन वैभवशाली वास्तूंचे जतन कशा प्रकारे करायला हवे', याची माणसाला जाणिव होण्याची. केव्हा तो पाण्याचे मोल जाणेल. केव्हा त्याला, आयुष्यातली खरी संपत्ती कशात? याची ओळख होईल. 'पैशापेक्षा पाण्याचे मोल अधिक असते', हे त्रिवार सत्य उमगेल! 'शेती, जंगलाशिवाय माणसाच्या आयुष्यात समृद्धी नाही', याचा बोध घडेल! सुख: समृद्दीचा खरा मार्ग जोवर माणसाला उमगत नाही, तोवर आंबाबाई अंधारात तशीच उभी रहील!
श्री एकनाथ महाराजकृत श्री भावार्थ रामायणाच्या अरण्यकांडात या पुरातन अवंध व पट्टा किल्ल्यांच्या परिसराचा उल्लेख आढळतो.

रावणाचा छेदिला आंगोठा
तेथे झाला औंढापट्टा
त्रिंबकीच्या बिकटघाटा
अवंढा-पट्टा प्रसिद्ध!!

पट्टा किल्ल्यावरून १२ कोसाचा प्रवास करून वाहत येणारी आढळाही आंबेच्या भेटीने आनंदलेली असे. चांगले आठ नऊ महिने ती खळाळत्या पाण्याचा प्रवाह घेऊन नित्य नियमाने आंबेच्या दर्शनाला येई तशी टाहाकारी पंचक्रोशीत सुबत्ता निर्माण होत असे. समुद्र मार्गोने थळच्या घाटातून माल घेऊन येणारे व्यापारी आवंढा-पट्टा घाटातून देशावर तसेच  पूर्व-पूर्व-उत्तराच्या प्रदेशात मालवाहतूक करत, तशी टाहाकारी पंचक्रोशीला झळाळी लाभत.
कुण्या राजाला या गोष्टीची कुणकुण लागली, 'टाकेदला प्रभू श्रीराम सीतेचा शोध घेण्यासाठी येऊन गेले', तिथे रावणाशी दोन हात करून मरणप्राय झालेल्या जटायूकडून रामाला सीतेची कर्मकहाणी समजली, आढळेच्या काठावर त्याने विलाप केला. आदिशक्तीने रामाची परिक्षा घेण्यासाठी सीतेचे रूप धारण केले. रामाने, माते म्हणून हाक मारताच, आदीशक्ती आपल्या कृत्याने खजिल झाली. आंबेचे रूप धारण करून आढळेच्या काठी ती विराजमान झाली. 'हे स्थान म्हणजे शिव-पार्वती, राम-लक्ष्मण यांच्या पावन चरणांनी परम पवित्र झाले. या परिसराच्या जवळच जटायूने लंकापती रावणाला लढा दिला'. या लौकिकास साजेशे एखादे मंदिर येथे बांधावे', येणार्‍या-जाणार्‍या वाटसरूंना या मंदिराचा आसरा मिळेल. आढळा नदीमुळे त्यांची पाण्याची सोय होईल, असा यादव कुलोत्पन्न राजाने विचार केला. भौतिक सुखाच्याही पलिकडे जाऊन, मनुष्य जीवनाचे तत्वज्ञान उलगडणारे भव्य मंदिर साकार करण्याचा संकल्प राजाने केला. शिल्पांमधुन जीवनाचे सार लोकांसमोर उलगडण्यासाठी विद्वान बोलावले, त्याकाळचे सर्वोत्तम शिल्पी बोलावले, कलेचा असाधाण अंग असलेल्या कला निर्देशकांना पाचारण केले.
हा सह्याद्री म्हणजे काळ्या सोन्याची खाणच. ओबड धोबड दगडांवर छिन्नी, हाथोड्याचे घाव पडू लागले. स्थपतींच्या मनातले शिल्प आकार घेऊ लागले. ७२ भले मोठे खांब उभे राहिले. प्रत्येक खांब आणि भिंतीवरचे शिल्प जीवनाची कथा उलगडू लागले. कथाही कशा, तर डोळसपणे बघितल्या तरच त्या समजतात, नाही तर निव्वळ दगडात कोरलेली सौंदर्यपूर्ण कलाकृती म्हणूनही त्याला दाद दिली जाऊ शकते.

पुरातन विटांच्या कळसाच्या जागी बांधलेले सिमेंटचे कळस

'आपल्या सर्व वासना बाहेर ठेवून शुद्ध अंतकरणाने मंदिरात प्रवेश करायचा', हा मोक्षप्राप्तीचा संदेश?

११व्या शतकाचा निर्देश करणारा टाहाकारीचा सगळ्यात महत्वाचा दस्तावेज...
माणसाच्या आयुष्यातल्या कामवासना, मद, मोह, मत्सराची प्रतिके मंदिराच्या प्रवेशद्वारावर कोरली गेली, 'या भावना बाहेर ठेऊन आत प्रवेश करायचा', हा संदेश त्या देतात. येथे भेट देणार्‍या भाविकांनी या कथांचा अन्यवार्थ जोडायचा आणि आपले जीवन समृद्ध बनवायचे. आज टाहाकारी मंदिर बघताना, त्याची रया राहिली नाही, हे जाणवत राहते. त्या शीर्णदशेतही हे मंदिर पाहणे एक रभ्य अनूभूती ठरते. याचा कोपरान कोपरा कोणती तरी कथा सांगतो. डोळसपणे बघितले तर ते शिल्प जणू आपल्याशी बोलताहेत असे भासते.
अठराव्या शतकात भारतीय पुरातत्व विभागाच्या पुणे कार्यालयाचे संचालक हेन्री कझीन्स याने भारतातील अनेक पुरातन मंदिरे, शिल्प, लेख आदींचा धांडोळा घेतला. १८९२च्या नोव्हेंबर महिन्यात रतनवाडी वरून तो टाहाकारीलाआला. त्यात त्याने याशिलालेखावर शके १०५० म्हणजेच इसवी सन ११२८ ही तारीख वाचल्याचे आपल्या मिडिवल टेंपल्स ऑफ डेक्कन इंडिया या पुस्तकाच्या २७व्या खंडात नोंदवून ठेवले आहे. या शिलालेखाचा काळ हा यादवकालीन असून तो वाचण्याचा प्रयत्न केल्यास मंदिरासंबंधी महत्वाच्या माहितीवर प्रकाश पडू शकतो. हा संपुर्ण लेख फारच पूसट झाला असून त्याचे वाचन करणे कष्टप्रद आहे. कझिन्सने
मंदिर आणि घाटामधल्या एका  उधवस्त मंदिराच्या स्तंभावर हा शिलालेख असल्याचे नोंदवून ठेवले आहे. आज घाटावरचे दोन्ही मंदिरे बरेच क्षतिगस्त झाले असून त्यातलाच शिलालेखाचा स्तंभ पायर्‍यांच्या मधोमध बसविला आहे. शिलालेख हे महत्वाचे दस्त असतात याची कल्पना नसल्यामुळे इतिहसाचा अनन्यसाधारण महत्वाचा दुवा व्यवस्थित जतन न करता उघड्यावर ठेवण्यात आला. सततच्या उन वारा व पावसाचा मारा पडल्याने अक्षरे क्षतिग्रस्त झालीत.

''हे आढळा! आमचे काय महत्व! त्यापेक्षा तुला पूर येऊ दे...त्यात आम्हाला वाहून ने''
या पायर्‍यांच्या दुतर्फा मंदिराच्या कळसाचे अवशेष आणि अनेक मुर्त्या इस्तत: ठेऊन देण्यात आल्या आहेत. उन, वारा, पाऊस आणि कदाचित नदीच्या पुराच्या हवाली करण्याऐवजी त्यांचे जतन करणे आवश्यक आहे. या मुर्त्या भग्न झाल्या असल्या तरी इतिहासाचा तो अनमोल ठेवा आहे. भारताच्या धार्मिक परंपरेत भग्न मुर्तीचा दोष लागत नाही, तर ती मुळ स्थानावर विराज मान असेल तर. अगदी जागृत देवस्थानातल्या मुर्तीचा जिर्णोद्दार धर्मसिंधू, निर्णयसिंधू या हिन्दू पिनल कोड प्रमाणे कायद्याने संमत केलेल्या ग्रंथातही तेच सांगितले आहे हे ध्यानात घेतले तर या मुर्त्या त्यांच्या मुळस्थानी नेऊन बसवाव्यात. मुळस्थान माहित नसेल तर त्यांची आडोशात रचना करून अभ्यासकांसाठी आणि तिथे येणार्‍या अभ्यागतांना, भारताचा भूतकाळ केवढा प्रगत होता, याची साक्ष देण्यासाठी तरी सांभाळून ठेवाव्यात.
टाहाकारीला पोहोचायचे तर सिन्नर किंवा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथून आडवळणाचा प्रवास करून यावे लागते. मंदिराच्या वीस, पंचवीस किलो मिटर परिसरात खाण्यापिण्याची कोणतीही चांगली सुविधा नाही, इतका हा परिसर आता आडबाजूला पडला आहे. कोणे एकेकाळी येथून आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचाय, यावर विश्वास ठेवणे अवघड ठरते.
आढळा नदीच्या घाटावर दुतर्फा अशा अनेक मुर्त्या विखूरलेल्या

सिन्नरचे गोंदेश्वर आणि ऐश्वर्येश्वर मंदिर ज्यांनी बघितले असेल, ज्याचा वैभवशाली इतिहास ज्याने वाचला असेल त्याने टाहाकारीचे मंदिर जरूर बघावे. तसेया परिसरात आणखी एक पुरातन मंदिर जिज्ञासूंची वाट बघत आहे, अकोल्याचे सिद्देश्वर मंदिर. गोंदेश्वर, ऐश्वर्येश्वर, सिद्धेश्वर, टाहाकारी ही मंदिरे काय सांगतात, गोदावरीची एक मोठी उपनदी असलेल्या प्रवरेच्या काठी पुरातन मनुष्य संस्कृतीचा वैभवशाली काळ नांदत होता. त्यामुळेच नदीच्या किनार्‍यावर अत्यंत देखण्या कातळकोरीव मंदिरांची मांदियाळीच वेगवेगळ्या राजवटीत उभी केली गेली.
सह्याद्रीत भटकंती करणार्‍यांसाठी औंढा, पट्टा उर्फ विश्रामगड, जिथे शिवाजी महाराजांनी दुसर्‍या सुरतेच्या स्वारीनंतर महिनाभर मुक्काम केला  आणि थोरले बाजीराव पेशवांचे जन्मस्थळ डुबेरा उर्फ डुबेरगड या तिन किल्ल्यांच्या भटकंतीला जोडन या परिसरातील पुरातन मंदिरांची भटकंती जोडणे एक परिपूर्ण डोंगरयात्रेची अनूभूती देणारे ठरेल.

घाटावरचे शेषनाग मंदिर: ही मदनिका एखाद्या खांबावरची असावी...

वैशाखाच्या ऐन मध्याला भटकंतीला जायचे तरी कुठे, इतका तो भडकलाय! तेव्हा आम्ही अनेक दिवसांपासून मनात राहिलेला टाहाकारीचा मनसुबा तडीस नेण्याचे ठरवले. नाशिकशहरातून नाशिकरोड पर्यंतचा प्रवास हा वाहतुकीच्या वर्दळूतून होतो, इतका हा नाशिक पुणे रस्ता वाढत्या वाहनांमुळे संकोचला गेला आहे. नाशिकरोडच्या दत्तमंदिर पासून उड्डाण पुलापासून रस्ता भला प्रशस्त व वेगवेन होता. नाशिक-पुणे राज्य मार्गाचा विस्तार झाल्यापासून सिन्नर आणि अगदी संगमनेर पर्यंत रस्त्याचा प्रवास म्हणजे वेगवान, विना अडथळा सहजपणे पार होतो. मोहदरी घाटात दोन मार्गिका झाल्यापासून घाटातली वाहतूक कोंडी कमी झाली आहे तर पळते येथे नविन पुल झाल्यामुळे तिथलेही वाहतूक कोंडी आता होत नाही. येथे चारचागी मोटरवाहनांना पथकर भरून पुढे जाता येते.
आजचे सिन्नर म्हणजे सगळीकडेच रखरखीतपणा. हा पर्जन्यछायेतला तालुका, त्यामुळे येथे पाण्याचे मोठेच दुर्भिक्ष आहे. इथले पर्जन्यमान गेल्या काही शतकांपासून कमी कमी होत गेले असावे, अन्यथा देवगिरीला राजधानी नेण्यापूर्वी यादवांची सिन्नरला राजधानी होती असे उल्लेख सापडतात. त्याकाळी पूरेसे पाणी असल्याशिवाय यादवांनी राजधानी या पसिरात हलवली नसती.
ऐन वैशाखाचा मध्यकाल म्हणजे तर सिन्नर वाळवंटीच वाटते. पुण्याकडे जाणार्‍या द्रुतगती मार्गावरून डुबेरे-ठाणगाव फाटा लक्षात येणार नसेल तर सिन्नर गावातून जुन्या संगमनेर रस्त्याने मारूती मंदिराकडून ठाणगाव रस्त्यावर उजवीकडे वळण घ्यावे. तिथून डुबेरगडाला कुर्निसात करत जमल्यास डुबेर्‍याचा बर्वेंचा वाडा बघून घ्यावा. अखिल भारतात मराठीसत्तेचा झेंडा फडकविणार्‍या या थोर सेनानायकाचा जन्म डुबेर्‍याच्या याच बर्वेवाड्यातला. सद्या या वाड्याची विभागणी झाली असून बर्वे कुटुंबातील वंशजांच्या संमतीने हा वाडा बघता येतो.

ठाणगावच्या बाहेर खंडोबामंदिराचा भव्य वटवृक्ष

इथून सगळा परिसर हा लहान डोंगरांचा असून अफाटवृक्षतोडीमुळे अवघा परिसर हा रूक्ष रूक्ष भासतो. झाडेच नसल्याने माती धरून ठेवणारी नैसर्गिक यंत्रणा नाहीशी झालेली. त्यात इथला दगड ठिसूळ असल्याने सर्वत्र बारीक खडी-मातीचे साम्राज्य. येथे पावसाळ्यात आलात तर हिरवाईने नटलेल्या परिसरातली डोंगरयात्रा किंवा मंदिरयात्रा अल्हाददायक होऊ शकेल. समशेरपूर टाळून ठाणगावात जावे. प्रत्यक्षात टाहाकारीचा रस्ता ठाणगावच्या बाहेरून जातो. गावाच्या पुढे वाटेत एका भल्या मोठ्या वटवृक्षाखाली खंडोबाचे टुमदार मंदिर लागते. तिथून थोडे पुढे गेल्यावर केळीचा फाटा ओलांडला की आपण अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करतो. तिथून दहा मिनीटात टाहाकारी गाव.
टाहाकारी गावातील आढळा नदीवरील पूल ओलांडल्यावर मंदिराचे सिमेंटचे तीन पांढरे कळस दिसायला लागतात. मंदिराभोवती असलेली सात फूट उंच तटबंद भिंत आहे. जुनी भिंत जिर्ण झाल्यामुळे जुन्या दक्षिण बाजूकडून नवे दगड घडवून ही भिंत बांधली आहे. पूर्व बाजूनेमंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. समोरचे दृष्य आवाक करणारे आहे. असे वाटते की, आपण एखाद्या बंगल्याजवळ आलो आहोत. प्रत्यक्षात कुणी तरी टाहाकारी मंदिराचा जिर्णोद्दार केला त्यात मंदिराच्या ढासळत्या खांबांना आधार देण्यासाठी सिमेंट कॉंक्रिटचे खांब उभारलेत. वरती सिमेंटची गॅलरी देखिल तयार करण्यात आली आहे. त्यात मंदिर पुर्णपणे झाकले गेले आहे. असे वाटते की, आपण एखाद्या बंगल्या समोर उभे आहोत.

मंदिराचे प्रवेश द्वार की बंगला?
एखाद्या पुरातन वास्तूचे संवर्धन अशा प्रकारे असू शकत नाही. हे पहिले दर्शन मन विचालीत करते खरे, त्यानंतर मात्र जसजसे मंदिराच्या जवळ जाऊ तसतशी शिल्पसौंदर्याची भूरळ पडायला लागते.
मंदिराचे बांधकाम भूमिज पद्दतीचे आहे. मंदिर उत्तराभिमुख आहे. त्याच्या उत्तरे दिशेला म्हणजेच आढळा नदीवर प्रशस्त असा जुन घाट आजही बर्‍या स्थितीत उभा आहे. हेमाडपंथी पद्धतीचे बांधकाम असल्याने यात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकांत अडकवतात. मंदिराचे मूळचे तीन कळस कोसळलेले असून त्याजागी सिमेंटचे घुमटाकार कळस बांधलेले आहेत. जुन्या कळसाचा कुठलाच आराखडा किंवा कुठलीच माहिती नसल्याने तशा प्रकारचे अगदी सिमेंट कॉंक्रिटमध्ये पुननिर्माण आता शक्य नाही.
या मंदिराचे मुख मंडप, मंडप, अंतराळ व गर्भगृह असे चार भाग आहेत. मंदिर चार फूट उंच दगडी जोत्यावर उभे आहे. जोत्यावर पुष्प पट्टी आणि पद्म पट्टी कोरलेली आहे, मंदिराच्या मुख मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्पे कोरलेली आहेत, त्यात मैथुन शिल्पेही आहेत.
सभामंडपात प्रवेश करताच खांबाला टेकवून ठेवलेल्या दोन मूर्ती दिसतात. त्यातील एक शंकर-पार्वतीची आहे, तर दुसरी गणपती सरस्वतीची आहे. शेंदूर फासण्याचा अट्टहास पुरविण्यासाठी कुणीतरी गणपतीला शेंदूर चढवला आहे तर सरस्वती तशीच ठेवल्यामुळे काळ्या-शेंदरी रंगगाच अजब मेळ बघायला मिळतो.



अप्रतिम कोरीवनक्षीच्या स्तंभांनी सजलेला मुखमंडप

भान हरखून बघावे टाहाकारीचे शाक्तमंदिर
मंदिराचे छत ७२ खांबांवर तोललेले आहे. खांबांवर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमित्तिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबांच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार नक्षीकाम अप्रतिम आहे. या वर्तुळाकार कोरीव कामात फूल, सिंह आणि आठ अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या सभामंडपाच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण या तीन बाजूंस तीन गर्भगृहे आहेत. या रचनेला त्रिदल रचना म्हणतात. मुख्य गर्भगृह आणि सभामंडप यांच्या मध्ये अंतराळ आहे.
प्रसूतीचे शिल्प
मुख्य गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. डाव्या व उजव्या स्तंभावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी प्रसूत होणार्‍या स्त्रीयांचे शिल्प लक्ष्यवेधी ठरते. पुत्रप्राप्तीसाठी आवाहन करणारी मुर्ती, स्त्रीप्रसूत होतानाचे शिल्प आणि लहान बाळासोत असलेली स्त्री, असाहे शिल्प संयोजन म्हणजे कातळात कोरलेल्या कथेचाच एक भाग. कोणी तरी या स्त्रीयांच्या योनीला शेंदूर लावला आहे.

प्रसूत होणारी स्त्री उजव्या कोपर्‍यातला स्तंभ...अपत्य झाल्यानंतर बालकासोबत.

प्रसूत होणार्‍या स्त्रीचे डाव्या बाजूच्या स्तंभावरचे शिल्प

गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची अठरा भुजा असलेली भली मोठी काष्ठमूर्ती आहे. ही मुर्ती आणि आतलली लाकडी महिरफ मुळ मंदिरा बांधले त्यावेळची नाहीत. नंतरच्या काळात ती बसविण्यात आली असावी, असे स्थानिकांचे मत आहे. देवीच्या हातांमध्ये विविध प्रकारची आयुधे आहेत. श्री जगदंबा माता वाघावर आरूढ असून ‘महिषासुरमर्दनिीच्या’ अवतारात आहे. गाभार्‍याचे
प्रवेशद्वारावर नाजूक नक्षीकाम असून ते अजूनही उत्तम स्थितीत आहे. या प्रवेशद्वाराच्या थोडे अगोदरचा वरच्या भागाला मोठा तडा गेल्यामुळे दोन जादा दगडी स्तंभाचा त्यास आधार देण्यात आलेला दिसतो. हे स्तंभ जुने असले तरी त्या दुसर्‍या ठिकाणहून आणून येथे उभे करण्यात आले आहेत.
सभामंडपाच्या दोन बाजूंस असलेल्या गर्भगृहात पूर्वेस महालक्ष्मी आणि पश्चिमेस भद्रकाली (महाकाली) देवीच्या सुबक मूर्ती आहेत. घुमटाकार छताची नक्षी देखणी असून ती सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिराची आठवण करून देते. या तीनही गाभार्‍यास लोखंडी दरवाजे बसवून त्यास कुलूप बसविण्यात आले आहे. त्यामुळे दिवसा देखिल आत जाता येत नाही. फक्त पुजेच्या वेळी किंवा अभिषेकापूरतेच हे दरवाजे उघडले जात असावेत.
या नक्षिच्या आत गारवा व सुरक्षितता असल्यामुळे चिमण्यांनी त्यात घरटी केली असून त्या सारख्या तेथे उडताना दिसतात.

थराचे प्रमाणबद्ध नक्षीकाम मध्ये वेगवेगळ्या क्रीया करताना सुरसुंदरी

मंदिराचा अंतर्भाग पाहून झाल्यावर मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा घालायला सुरुवात केल्यावर वेगवेगळ्या थराची सूबक रचना बघायला मिळते. मंदिराच्या भिंतीच्या मध्यावर २२ प्रकारच्या सुरसुंदरींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. सुरसुंदरी म्हणजे देवांगना. देवांच्या खालोखाल यांचा मान. टाहाकारी मंदिराचे हे मुख्य आकर्षण. सुडौल शरीर रचना, तलम वस्त्र, देखणे अलंकार यातून तत्कालीन कलासौंदर्याचे अनेक आविष्कार उलगडतात.
कधी आरशात स्वत:चे सौंदर्य पाहणाऱ्या, कर्णभूषणे घालणाऱ्या, केसात गजरा घालणाऱ्या, केशशृंगार करणाऱ्या अशा दर्पणा, तर कुठे नृत्य करणारी नृत्यसुंदरी, बासरी, मृदंग वादन करणारी, हाती पोपट घेतलेली शुकसारिका, मुलाला घेतलेली मातृमूर्ती, मांडीवर विंचू असणारी विषकन्या, डोक्यावर छत्र धारण केलेली, मर्कट लीलांनी हैराण झालेली अशा अनेक सुरसुंदरींच्या मूर्ती आहेत. एका सुंदरीच्या अंगावर आज दिसतो तसा गाऊन किंवा पाश्चात्य पद्दतीच्या कोट सारखा पेहेराव दिसतो, विशेष म्हणजे तो दगडात उत्तमरित्या कोरण्यात आला आहे.

गणपतीचे देखणे शिल्प
सुरूवातीलाच दक्षिण बाजूच्या भिंतीवर कोरलेली गजाननाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळते. गर्भगृहामागील देवकोष्टात चामुंडेची मूर्ती आहे. चामुंडा हे देवीचं क्रूर रूप आहे. हडकुळं शरीर, पोटावर विंचू, गुडघ्याच्या खालच्या बाजूपर्यंत पसरलेली मुंडमाळा, हातातल्या दंडावरची कवटी, डाव्या हाताच्या करंगळीचे नख कुरतडताना दाखवलेली ही मूर्ती मुर्तीमंत भय प्रकटकरणारी. या देवकोष्टकाखाली गर्भगृहातील पाणी जाण्यासाठी पन्हाळी आहे. तिथे नेहमीप्रमाणे गोमुख न कोरता मकरमुख कोरलेलं आहे. त्यात दोन्ही बाजूस एक लहान व एक मोठी मुर्ती स्वार झालेली दिसते. कदाचीत आई व मुलगी असावी. हे मकरमुख गोंदेश्वर तसेच हातगड जवळच्या देवळी कराडच्या मकरमुखाची आठवण करून देते.
प्रभू रामाने टाहो केला तेव्हा अंबाबाईच्या रूपाने आदीशक्ती पार्वती तेथे प्रकटली, यादवकुलोत्पन्न राजाने देखणे भव्य मंदिर उभारले. आज या मंदिराची दूरवस्था, परिसराची पाण्यासाठी सुरू असलेली दशा बघून, 'पुन्हा एकदा टाहाकारीचा टाहो सुरू आहे', असा आभास होतो. त्याचाविलाप कोणी ऐकेल का? जल आणि वनांची काळजी घेऊन आढळेला समाधानी केले जाईल. मंदिराची चांगला रखरखाव ठेऊन आंबाबाईला प्रसन्न केले जाईल?

चामुंडेचे भयकारी रूप

मकरमुखात विराजमान दोन व्यक्तीरेखा

सजधजणार्‍या सुरसूंदरी

बाह्य भिंतीवर सुंरसुंदरींची देखण्या शिल्पांची मालिका

मध्यभागी लहान ढोल वाजविणारी सूरसुंदरी

डावीकडच्या सुरसुंदरीचा वैशिष्ट्यपूर्ण पेहेराव...

मंदिराची प्रदक्षिणा पूर्ण करून मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटावर दोन मंदिरे आहेत. पुर्वी हा घाट सुबक दगडाचा असावा. आता त्याचे काही दगड निखळले आहेत तर खालच्या नदीकडचे दगड मोठ्या प्रमाणात हलले आहेत. वरच्या बाजुला व मधल्या माजूला असे दोन स्तंभ आहेत. यातला मधला स्तंभ अत्यंत महत्वाचा असून त्याच्यावर संस्कृत भाषेतला वाचता येणार नाही इतका पुसट शिलालेख कोरला आहे.
या घाटवर एक शेषनागाचे तर दुसरे आंबाबाईची. मंदिराबाहेर काही वैशिष्टय़पूर्ण समाधीचे दगड ठेवलेले आहेत. दोन फूट उंचीचे हे दगड अष्टकोनी असून त्याच्यावर शिवलिंग, नंदी आणि पावले कोरलेली आहेत. अंबाबाईच्या मंदिरात डाव्या कोपर्यात शेषनागालाह तर उजव्या बाजूला शेषशाही विष्णूमूर्ती ठेवलेली आहे. या दोन्ही मुर्ती या मंदिरातली मुर्ती वाटत नाही. बाहेरून कुठून तरी उचलून येथे आणल्या असाव्यात. नदीत कित्येक जुने दगड टाकून देण्यात आले आहेत. मंदिर परिसराचा कोपरानकोपरा आज साडे नऊशे वर्षे उलटूनही गतवैभवाची साक्ष देतो.

मध्यभागी मंदिरातली आंबेची काष्ठ मुर्ती तर उजवीकडी घाटावरची दगडातली आंबाबाई


हेन्री कझीन्सने मंदिरातल्या ज्या स्तंभावर शिलेलाख बघितला तो स्तंभ घाटावर उन वारा पाऊस खात उभा

पट्टा गडावून १२ कोसाचा प्रवास करून येणारी आढळा नदी

घाटावरच्या आंबेच्या मंदिराचे अंतराल...पूर्वी यावर कातळात कोरलेले नक्षीदार छत असावे

आढळा नदीत मंदिराचे अनेक जुने दगड व भग्न मुर्त्या टाकून दिल्या आहेत.

सिमेंट रसायनाचा वापर करून केलेले संवर्धन

उजेड सहजासहजी पोहोचत नाही अशा ठिकाणी छतावरची सुंदरशी नक्षी 

कपडे धुण्यासाठी आढळेच्या डब्यातले साबण मिश्रीत पाणी पुन्हा पुन्हा वापरायचे
तीन मंदिरांचा समूह...आढळा नदीवरचा जुना मोठा घाट

घाटावरचे आंबाबाईचे मंदिर, याच्याच डाव्याबाजूला शेषनागाचे पुर्णपणे उध्वस्त झालेले मंदिर आहे.




मंदिराचे छत तोलून धरणारे यक्ष...

छताचा भाग कोसळू नये या साठी दिलेला चौकोनी कॉंक्रिट खांबांचा आधार 

प्रमाणबद्ध नक्षीकाम...काही खांबांची शिल्प भिंतीवरच्या शिल्पकथेची मेळ खाणारी

फरसबंदीच्या एका दगडावर रॉकेट सदृष्य तीन आकृत्या कोरण्यात आल्या आहेत...
जाण्यासाठी :
१) नाशिकवरून सिन्नर २८ किलो मिटर. द्रुतगती मार्गावरून ठाणगाव फाटा घेऊन ठाणगाव १९ किलो मिटर गाठावे. किंवा सिन्नर बसस्थानकाच्या थोडेसे पुढे जुन्या संगमनेर रस्त्यावर मारूती मंदिराकडून उजवीकडे डुबेरे-ठाणगाव रस्त्याने जावे. २१ किलो मिटर.गाठावे. तिथून टाहाकारी ९ किलो मिटर.
२) मुंबई-नाशिक रस्त्यावर इगतपुरीनंतर – घोटी गाव आहे. घोटी गावातून एक रस्ता सिन्नरला जातो. या रस्त्यावर भंडारदऱ्याला जाणारा फाटा फुटतो. या भंडारदऱ्याला जाणाऱ्या रस्त्यावर टाकेद गाव आहे. घोटीपासून टाकेदपर्यंत पोहोचण्यास पाऊण तास लागतो. टाकेदहून टाहाकारीला जाणारा रस्ता आहे. इगतपुरी ते टाहाकारी अंतर ५८ किमी आहे.
३) पट्टा किल्ला मार्गे टाहाकारी :टाकेद गावाबाहेर प्राचीन राममंदिर आहे. रामायणातील जटायूने रावणाशी युद्ध करून इथेच प्राण सोडला, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. त्यामुळे या मंदिर संकुलात जटायूचे मंदिरसुद्धा आहे. जवळच रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी जमिनीत बाण मारून तयार केलेला झरा व पाण्याचे कुंड आहे. टाकेदहून राम मंदिराला जाणाऱ्या रस्त्यावर उजव्या हाताचा फाटा कोकणवाडी मार्गे पट्टा किल्ल्याच्या पायथ्याशी जातो. कोकणवाडी ते पट्टावाडी अंतर अध्र्या तासाचे आहे. पट्टावाडी हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. पट्टावाडीपासून ठाणगाव मार्गे २५ किलोमीटर वर टाहाकारी गाव आहे.


 sahyadri trekkers bloggers

3 comments:

  1. अप्रतिम लेख... मी खुप वेळा मंदिरात जावुन आलो पण एवढे बरकाईने परिक्षण नाही केले... खूप सुंदर

    ReplyDelete
  2. अत्यंत सुरेख व माहितीपूर्ण लेख प्रशांत! जियो!!

    ReplyDelete
  3. काका.. ह्या मंदिरात भुयार पण आहे ..मंदिर ते नदीपात्र पर्यंत ..तेथील लोकांचे म्हणणे आहे की पूर्वी मंदिरातील पुजारी देवीच्या पूजेसाठी पाणी आणण्यास त्याचा वापर करत असे

    ReplyDelete