Friday, February 2, 2018

Dhodap 3: अनेक गुहांनी सजलेली धोडपची पगडी


किल्ले धोडपचे हे एक भौगालिक आश्चर्य...अजस्त्र आकाराची व्होल्कॅनिक प्लग...जणू धोडपची पगडीच...याच्या पश्चिम धारेवर वैनतेयचे गिर्यारोहक समीरन कोल्हे, सोमदत्त म्हस्कर, प्रतिक रनाळकर वगैरेंनी प्रथम आरोहण केले आहे.

 धोडप भाग ३: तिन भौगोलिक आश्चर्ये अनं अनेक गुहांनी सजलेली धोडपची पगडी

ऐतिहासीक काळातल्या विविध राजवटीतल्या बांधकामांचे अवशेष किती बघावेत आणि किती नाहीत. १४७२ मिटर असे महाराष्ट्रातले तिसरे सर्वोच्च शिखर असलेल्या धोडपच्या मुक्कामी भटकंतीने आम्हाला भरभरून दान दिले, त्याच बरोबर धोडपच्या तीन आश्चर्यांनी मन तृप्त केले. राहता राहिला प्रश्न तो ट्रेकर आणि एसटी बस यांच्यातल्या जुन्या नाते संबंधाचा, 'टेकर्सचे बस सोबतचे नाते हळू हळू कमी होतेय, त्या मागचे कारण म्हणजे ट्रेकच्या नियोजनात जिथे वेळेला अनन्यसाधार असे महत्व येते तिथे आज घडीला एसटीचा पर्याय शेवटच्या क्रमांकावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. राज्य परिवहन मंडळाच्या बदललेल्या धोरणांचा सर्वात मोठा फटका अर्थातच ग्रामीण व दुर्गम महाराष्ट्राला बसतोय, हे मात्र नक्की. त्यावर वेळीच उपायोजना करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा महाराष्ट्राची सूनियोजीत वाहतूक व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

सह्याद्रीच्या सातमाळा रांगेत डाईकची अश्मरचना अनेक ठिकाणी दिसून येते. धोडपचा डाईक अखिल महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. डाईक म्हणजे डोंगरांची अगदी पातळ कातळ भिंत...समोरून अफाट मोठा दिसणारा कातळ बाजूने पातळ पडद्या प्रमाणे दिसतो. सुमारे ३ कोटी वर्षापूर्वी दोन महाखंडांच्या टकरीनंतर पृथ्वीवर जी उलथापालथ झाली त्याचा हा परिपाक. लोणावळ्या जवळच्या तैल बैलाचा डाईक प्रसिद्ध आहे. धोडपचा डाईक लांबलचक पसरलेला तर आहेच, शिवाय त्याला मध्ये बरोबर चौकोनी आकाराची खाच पडली आहे. या डाईकच्या खाचेचे सर्वात उत्तम दर्शन घ्यायचे झाल्यास धोडप सुळक्याच्या उत्तर टोकाला जायला हवे, तिथपर्यंत जाण्याची वाट फारशी बिकट नाही.
काय आश्चर्य...धोडपची ही नैसर्गिक गुहा पश्चिम मुखी असून दक्षिण ती अचानक दक्षिण बाजुला वळण घेऊन निमुळत्या तोंडाने तिथे उघडते...एक प्रकारचे धोडपचे हे वळणदार नेढेच!
 विशेष म्हणजे या डाईकला जिथे खाच पडली आहे. त्याला लागुनच एक बुरूज होता, त्याचे अवशेष आजही बघायला मिळतात. हल्ली या डाईकवर वनखात्याने चक्क लोखंडी खांबांचे सुरक्षा कठडे बसवले आहेत. येथे खंडाळा, लोणावळ्या सारखी मोठी गर्दी उसळेल तेव्हा लोक दरीत घसरून पडू नयेत अशी या मागची भावना ठेवून केलेले हे बांधकमा प्रत्यक्षात एका अजोड भौगोलिक आश्चर्याच्या सौंदर्याला बाधाच पोहोचवत आहे. एकट्या डाईकवर सुमारे सातशे फुटांचा भल्या मोठ्या आकाराच्या लोखंडी सुरक्षा कठड्यांचा खटाटोप करण्यात आलाय. यातले काही कठडे दोनच वर्षांच्या उन्मळून पडण्यास सुरूवातही झाली आहे. (स्थानिक मंडळी यासंबंधिची सप्तश्रृंगी देवीची दंतकथा सांगताना, देवी कोपली त्यावेळी तिने धोडपवर येऊन डोंगरावर आपला गुडघा मारला तेव्हा पासूनची ही खाच आहे, हीच देवी धोडपच्या गुहेत विराजमान असल्याची काही मंडळींची धारणा आहे).
धोडपचं दुसरे भौगोलिक आश्‌चर्य म्हणजे व्होल्कॅनिक प्लग, अर्थात ज्वालामुखीय उद्रेकातून शंखुसारखा उठावलेला डोंगरमाथा, जणू काही डोंगराला घातलेली पगडीच. हाच तो धोडपचा सुळका, अखिल सह्याद्रीत आपल्या वैशिष्टपूर्ण आकारासाठी ओळखला जातो. (याची पूर्व बाजू आरोहणाच्या दृष्टीने सोपी, तर पश्चिम बाजू मध्यम जोखिमेची आहे) त्यावेळी इथला जो भूमाख होता त्याचे बंध झुगारून तप्त लाव्हा रस पृथ्वीच्या उदरातून उफाळत वर आला आणि त्यातून या डाईक व प्लगची निर्मीती झाली. डाईकची भिंत आणि प्लग यामुळे धोडप किल्ला फार दूर अंतरावरून सहजपणे ओळखू येतो. या प्लगच्या अर्थात, सुळक्याच्या पोटात दक्षिण मुखी अनेक गुहा कोरण्यात आल्या आहेत. यातील बहुतांशी गुहा या पाणी साठविण्यासाठी खोदण्यात आल्या आहेत. काही गुहांचा आकार अजस्त्र आहे. यारून धोडपच्या किल्ल्यावर मोठा राबता असल्याचे अनूमान निघते.

देवी टाक्याची अविट गोडी...
धोडपची मुख्य गहा याच प्लगच्या पोटात मधोमध कोरली आहे. त्यात गडाच्या देवतेची जुनी कातळातली मुर्ती पूर्वीभिमूख आहे. या मंदिराच्या तळाशी पाण्याचे विशाल टाके आहे. यात वर्षभर पाणी उपलब्ध असते. संपूर्ण गडावर इतके स्वच्छ व गोड चविचे पाणी सापडणार नाही. सुरूवातीला बारा पंधरा फुटाचं हे टाकं पुढे अखिल खोल होत जातं. त्याच्या मधोमध एक दगडी खांब कोरण्यात आला आहे. भटकंती व सहलीसाठी येथे येणार्‍यांकरिता पिण्याच्या पाण्याचा हा सर्वात मोठा आसरा. त्यात अनेक दगडी शिळा पडलेल्या दिसतात. कचराही बराच दिसून येतो. प्लास्टिकच्या खाद्यपदार्थाच्या पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या टाकण्यात आल्या आहेत.

सुळक्याच्या दक्षिण बाजुला एक फार मोठी नैसर्गिक गुहा आहे, धेाडपचे हे दिसरे भौगोलिक आश्चर्यच म्हणायला हवे. सुमारे पन्नास फुट लांबीच्या या गुहेचे तोंड दक्षिण बाजूने उघडते गुहा पूर्वेकडे अरूंद होत जाते आणि अचानकपणे दक्षिण बाजुला वळसा घेत डोंगरातून आरपार जाते. म्हणजे दक्षिण बाजूने किंवा पश्चिम बाजूने या गुहेतून आरपार बघितले जाऊ शकते.


  सातमाळ डोंगरांच्या परिसरात अनेक डाईकच्या अश्मरचना व नेढी बघायला मिळतात. धोडपची ही गुहा म्हणजे आतून वळसा घेतलेलं एक प्रकारचं नेढच आहे. सर्वात मोठं नेढं अर्थातच धोडपच्या वायव्य दिशेला असलेल्या पिंपळागड उर्फ कंडाळ्यावर आहे. सप्तश्रृंगीगडा समोरच्या मोहनदरी किल्ल्यावरचे नेढे चौकोनी आकाराचे आहे. पिंपळागडचे नेढे मधल्या भागात उंचावलेले तर दोन्ही बाजुला अरुंद होत जाणारे आहे. त्याचा आकार पन्नास फुटाहून मोठा आहे. याच परिसरातल्या रामजी पांगेराच्या हौतात्मासाठी ओळखल्या जाणार्‍या कण्हेरगडावरही नेढं आहे. धोडप नंतरचा सर्वात मोठा डाईक म्हणजे कळवणची मोठी भिंत होय!

धोडपच्या डाईकवरून उत्तर दिशेला बंड्या, रवळ्या-जवळ्या, मार्कंडेय व सप्तश्रृंगीगड दिसत होते. कळवण शहर दूरवर दिसत होते, त्यापलिकडच्या डोंगर रांगा मात्र अस्पष्ट दृष्यमानतेमुळे निरखता आल्या नाहीत. पूर्वेकडे इखारा, लेकुरवाळा, कांचना, कोळदेर, इंद्राईच्या पलिकडचे डोंगर दिसत नव्हते.

जंगल भलेही खुरटे...रखरखीत झाले असेल...पण त्यातले सौंदर्य कितीतरी पट अधिक आहे...हे सागणारा हा पळस...त्याची कित्येक भावंडे सद्या धोडपच्या परिसरात बहरली आहेत...मावळतीला जंगलावर अचानक नजर फेरली तर याच्या ज्वाळांचा आभास होतो...म्हणूनच तर इंग्रजीत याला, जंगल फ्लेम म्हणतात...
 बहरले जंगल
भौगोलिक आश्चर्या सोबतच या हंगामात काही नैसर्गिक चमत्कार बघायला मिळाले. त्यातला पहिला चमत्कार म्हणजे पुर्ण जोमात बहरलेला पळस. धोडपची चढाई करताना अंधारत आम्हाला भर रस्त्यात पळस लागला, तेव्हाच स्पष्ट झाले की आम्ही वहिवाटीची वाट सोडून आडवाटेने चाललो आहोत. यंदा पळस थोडा लवकर बहरला आहे. धोडपच्या डाईकवरून उत्तर दिशेच्या जंगलात सर्वत्र अग्नीलोळ दिसत होते...तो पळस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर बहरून आला आहे. आमच्या नाशिकला रंगाच्या पेशवेकालीन रहाडीत याच पळसाचा रंग करण्याची प्रथा अनेक वर्षांपर्यंत कायम होती.

करवंदाची फुले छान बहरली आहेत. 'त्या पांढर्‍या फुलांचा वास घेऊन बघ', असे गार्गीला सांगितले, तेव्हा 'त्याचा गंध म्हणजे परफ्यूम पेक्षाही सुंदर' असल्याची प्रतिक्रिया तिने व्यक्त केली. या जंगलातही वनखात्याने आवर्जुन गिरीपुष्पाचे मोठ्या प्रमाणावर रोपण केले आहे. त्याची निळसर पांढरी फुले बहरली आहेत. रूईची फुले फार टवटवीत पणे बहरल्याचे दिसून येत होते. बाकी झुडपांचेच या जंगलात अधिराज्य आहे. इथला बाभूळ मात्र पूर्वी फार दिसायचा, आता औषधापूरताही तो दिसून आला नाही.

या औदुंबर वृक्षातून सद्या पाणी झिरपतेय...इथल्या जीव सृष्टीच्या पोषणासाठीच परमेश्वराने तो पाझरवला असावा...

तलवारी गेल्या...हाती झारे कढाया
पायथ्याच्या हट्टी गावात जिर्णशीर्ण अवस्थेतले चिरेबंदी वाडे लक्ष वेधून घेतात. त्यांचा चौसोपी दगडी पाया, मोठमोठे लाकडाचे खांब, चुन्यातल्या विटांच्या भिंती, वैशिष्टपूर्ण खिडक्या नी दरवाजे गतकाळात येथे केवढे वैभव नांदत असेल याची साक्ष देतात. गावात बहुतांशी परदेशी मंडळी राहतात. हे प्रामुख्यान राजस्थानातून आलेले राजपूत आहेत. बरेच राजपूत सरदार मोगलांच्या चाकरीत असताना त्यांच्या सोबत राजस्थानातून आलेले राजपूत कालांतराने बांगलाणच्या विविध ठिकाणी स्थायीक झाले. हट्टीत मात्र त्यांची संख्या सर्वाधिक आहे. लढवैय्या राजपूतांनी कोणत्या कालखंडात आपल्या तलवांरी सोडून गुराख्याचे व खव्याचे काम हाती घेतले याचा निश्चीत काळ समजण्यास मार्ग नाही.

आज त्यांचा खव्याचा उद्योग मान टाकण्याच्या स्थितीत आहे. अशीच अवस्था इथल्या अहिरांच्या काचेच्या बांगड्यांच्या उत्पादनाची झाली व कोळशाच्या अभावामुळे व काचेच्या बांगळ्यांची बदलत्या काळात मागणी घटल्यामुळे हा व्यवसाय केव्हाच बंद झालाय. धोडंब्याचा कातडी कमावण्याचा व्यवसाय अखेरची घटका मोजतोय. या परिसरात गेल्या दशकात टोमॅटो सॉस व विदेशी दारू निर्माण करण्याचे कारखाने मात्र उभे राहिलेत.


हट्टीत आम्ही चारच्या सुमारास पोहोचलो. आम्हाला ज्याने सोडले होते ती जीप आम्हाला वेळेवर घ्यायला आली. सकाळी नऊ वाजेपासूनच त्याचा आम्हाला फोन येत होता, तसा आम्ही त्याला आमचे बेत व ठिकाण सांगत होते. आम्ही येई पर्यंत त्याच्या वडाळीभोई पर्यंतच्या फेर्‍या सुरू असल्याने त्याला आमच्यासाठी वाट बघत थांबावे लागले नाही. आमचा ट्रेक खरेतर हट्टीत संपला होता...परंतू?


'आधार', बसचा लहान गावांसाठी नाही?
वाटेत जीपवाल्या काकांनी त्यांच्या गावचा रानमेवा चाखायला दिला. एका बोरीवरची अनेक फळे पिकलेली होती. झाड गदागदा हलवून त्याने बारांचा सडा पाडला. त्यांची अविट गोडी चाखत आम्ही वडाळीभोईला अर्ध्या तासाच पोहोचलो. पुलावरच तुम्हाला बस मिळेल अशी माहिती मिळाल्याने आम्ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३च्या द्रुतगती मार्गिकेच्या बाहेर बसची वाट बघू लागलो. पोटातले कावळे  वडाळीभोईच्या लोकप्रिय पदार्थांकडे खुणावत होते. आम्ही एक एक प्लेटची पटकन ऑर्डर दिली, तोच एक खच्चून भरलेली बस येऊन थांबली. त्यात आमच्याकरिता जागा नसल्याने व या मार्गावरून भरपूर बस नाशिकला जात असल्याने आम्ही पोटपूजा आटोपून बसथांब्यावर येऊन पोहोचलो. गावातली मंडळी मात्र बसची वाट न बघता जीपमध्ये बसून प्रवासाला लागत होती. बसचा प्रवास सर्वात सुरक्षित व सुखकर, ही मंडळी का बरं अवैद्य, असुरक्षित प्रवास करतात? असे प्रश्न मनात उपस्थित व्हायला वेळ लागत नाही, त्याचे उत्तर मात्र थोळ्याच वेळात आम्हाला मिळाले.

नाशिकची पाटी लागलेली एक बस आमच्या समोरून निघून गेली, त्यात जागा असूनही बस का थांबली नाही. वडाळीभोई तर या मार्गावरचे महत्वाचे गाव आहे! या विचारात असताना दोन पाठोपाठ बस आमच्या समोरून गेल्या, त्याही थांबल्या नाहीत. जीपगाड्याही नसल्याने काही गावकरी आमच्या सोबत बसची वाट बघू लागले, तोच एका जीपने प्रवासी भरायला सुरूवात केली. आम्हाला तर त्याने ऑफरच दिली, तुम्हाला एकाच ठिकाणी बसवतो. मागे चार आसने होती, त्यात सात जण जमले की, लगेच नाशिकला स्वस्तात घेऊन जातो! त्याची जीपगाडी प्रवाशांनी भरत नव्हतीव आमची पावले तिथे वळत नव्हती, दरम्यान नाशिकला जाणारी एक एक बस आमच्या डोळ्यादेखत निघून जात होती.

हट्टी गावात असे काही वाडे अजून आपल्या गतवैभवाच्या खुणा टिकवून आहेत...काहींनी चांगली आर्थिक प्रगती साधली तेव्हा यांचे जतन न करता सिमेंट कॉंक्रिटची घरे मात्र उभारलीत...

 तब्बल दिड तास आम्ही वडाळीभोईच्या बस थांब्यावर होतो, पण एकही बस आमच्या समोर थांबली नाही. काही बसमधून वडाळीभोईला उतरणारे प्रवासी असायचे त्या बसही बस थांब्या पासून दोनशे मिटर दूरवर थांबायच्या व प्रवाशांना उतरवून निघून जायच्या. बस तर कधीही प्रवाशी नाकारत नाही, हा काय प्रकार आहे? या समजण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा एकाने सांगितले की या विनावाहक बसेस आहेत. एका स्थानपावरून सुटल्या की थेट दुसर्‍या स्थानकाला जातात, मध्ये थांबत नाही. पण येथे तर वडाळीभोईचे प्रवासी उतरत होते, मग रिकामी बस नेण्या ऐवजी ते प्रवासी का नेत नाहीत? या प्रश्नावर त्या ग्रहस्थाकडे कोणतेच उत्तर नव्हते.

शेवटी सूर्य क्षितीजापलिकडे निघाला तसा आमचा संयम सुटला. आता आम्ही महामार्गाच्या वर येऊन नाशिककडे जाणार्‍या बसेसना हात देत होतो व हाका मारून थांबण्याचे विनवत होते. गावतली काही मंडळी रस्त्यावर आली होती. महामार्गावर असे उभे राहणे खरे तर असूरक्षित, पण बस गाड्या प्रवाशांना नेणार नसतील तर त्यांनी प्रवास तरी कसा करायचा? आता आम्हाला कोडे उलगडले होते की, राज्य परिवहन खात्यातल्या कोणा सुपिक डोक्याने बसतो तोटा भरून काढण्यासाठी विनावाहक बसेसचा जसा घाट घातला, त्याच प्रमाणे महत्वाच्या गावांमध्ये वेगवान वाहतूक करून प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी मधली गावेच्या गावे वगळण्याचा अजब नियम केला, त्यामुळे ग्रामीण मंडळी बसची वाट बघण्याच्या भानगडीत न पडता थेट जीपच्या प्रवासाला पसंती देत होती. अशाने एसटी बसचा तोटा तरी कसा भरून काढणार.

भटकंतीत अशी बक्षिसं मिळण्याचा हा हंगाम आहे...हट्टी बाहेर बहरलेल्या एका बोरीवर ते आम्हाला प्राप्त झाले...
बस थांब्यावर आमच्या मागे उभ्या असलेल्या एका महिलेने गमतीशीर किस्सा सांगितला की, ती नाशिक ते लासलगाव बसमध्ये बसली. ती थेट बस होती. वाटेतले किमान दहा थांबे वगळून थेट नाशिकते लासलगाव धावणारी, त्यात आम्ही फक्त तीन प्रवाशी होतो. वाटेत जर ती थांबली असती तर भरून गेली असती. तीन प्रवाशांवर बसला कसे काय परवडते? हा तिने उपस्थित केलेला प्रश्न बस खात्यातल्या अधिकार्‍यांसमोर उपस्थित झाला नसेल.

अखेरीस वडाळीभोईवरून बारा किलो मिटर अंतरावरच्या पिंपळगाव डेपोला जाणारी एक बस आली आणि आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्यात स्थानापान्न झालो. आमच्या सोबत नाशिकला जाण्याकरिता तेथे आलेल्या ग्रामस्थांनी हीच बस पकडली. पिंपळगावला पोहोचलो, तेव्हा चित्र फारसे बदलले नव्हते. तिथेही बसचे काही खरे नाही, असे चौकशी अंती समजले व नाईलाजाने आम्हाला एका मारूती व्हॅनमध्ये बसावे लागले. ड्राईव्हरसह ११ जण त्यात विरजमान झाले. आमच्या बॅंगा टपावर ठेवण्यात आल्या व आम्ही नाशिकला सुखरूप पोहोचलो. बसने आम्हाला जो हात दाखवा, तो अगदी अनपेक्षीत होता. बिकट अवस्था बघायला मिळाली ती लहान खेड्यातल्या प्रवाशांची. त्यांच्यासाठी तर वडाळीभोई-पिंपळगाव बस सुद्धा थांबली नाही. आमचा प्रवास तर एक दिवसाचाच, त्या ग्रामीण जनतेची बसच्या बदललेल्या धोरणामुळे कोण ससेहोलपट होत असणार?

दिड तासात सोळा एसटी बसेसनी आम्हाला दुरूनच रामराम ठोकला...त्यातल्या कित्येक तर अर्ध्या रिकाम्या...पण बिचार्‍या करणार काय? नियम सांगाते...मधल्या गावात थांबण्यात वेळ दवडू नका!
ज्या पद्धतीने ग्रामीण जनतेची बस खाते फरपट करत आहे ती, पाहता भटक्यांनी आपल्या जीवाभावाच्या एसटीबसवर भविष्यात भरवसा ठेऊन भटकंतीची आखणी करणे योग्य ठरणार नाही. आमचा एक प्रयोग फसला, परंतू एखाद्याला बसच्या भरवशावर भटकंती करायची असेल तर प्रवासातील सर्व टप्प्यावरच्या बसच्या वेळांबद्दल अगोदरच बस स्थानकातून खात्री करून घ्यावी लागेल आणि विशेष म्हणजे त्या वेळांना तिथे हजर रहावे लागेल, अन्यथा स्वत:चे वाहन घेऊन येणे किंवा खासगी वाहनांचा आधार घेणे इष्ट ठरेल.

तसेही महाराष्ट्रात शेकडोंच्या संख्येने असलेले दर्दी भटके स्वत:च्या खासगी वाहनांनी ट्रेकचा प्रवास करण्यास पसंती देऊ लागले आहेत. त्याचा खर्च हा जवळ पास बसच्या तिकीटा इतकाच येतो. बसची सेवा ही स्वस्त राहिलेली नाही, आता हेच बघा, नाशिकहून वडाळीभोई ६७ रूपये. तिथून समजा हट्टी पर्यंतच्या १२ किलो मिटर करिता १५ रूपये पडतील म्हणजे एका माणसाला दोन्ही बाजुचे बस भाडे १५८ रूपये. पाच जणांच्या गटाला एका वेळी ७९०/- रूपये. यात बस थांब्या पर्यंत ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीचा दोन्ही बाजींचा खर्च किमान २००/- रूपये.

औदुंबर वृक्षाचा पाझर रखरखत्या उन्हातही गायीगुरांची क्षुधा शांत करतो...गायीची पाणी पिण्याची पद्धत फारच चमत्कारीक...एका वेळी ती अर्धाधिक लिटर तरी पाणी शोषून घेते...
बसने ६० ते ६५ किलो मिटर अंतराचा ट्रेक करायचा झाल्यास हजारच्या आसपास खर्च येतो. त्या ऐवजी सहभागींपैकी कोणा एकाची एक कार नेल्यास १८ किलो मिटर प्रति लिटर पेट्रोल धरल्यास १४० किलो मिटरकरिता लागेल सुमारे ८ लिटर पेट्रोल म्हणजे आजच्या ८० रूपये लिटर प्रमाणे ६२२/- रूपये त्यात टोलचे (पथकर) सरासरी अडीचशे रूपये पकडल्यास ९००/- रूपये होतात. याचाच अर्थ बसने ट्रेक करण्यापेक्षा स्वत:च्या वाहनाने ट्रेक केला तर वेळे बरोबरच पैशांची बचत होते. असंही एसटीने आपल्या धोरणात अनेक बदल केले आहेत. त्यामुळे कायमच सजग राहणारी ट्रेकर मंडळी खर्चिक आणि वेळकाढू बसच्या नादाला लागण्याची शक्यता तशी कमीच.

काळ्या पिवळीला प्रोत्साहन...लहान पिढीवर संस्कार घडवणार?
एक वेळ ट्रेकर मंडळी वेळ व पैशाची बचत करणारा प्रवासाचा सर्वोत्तम पर्याय निवडतीलही, परंतू महाराष्ट्रात खेडोपाडी दररोज शेकडो प्रवाशांचे काय? त्यांना तर काळ्या पिवळ्यांवरच विसंबून राहवे लागणार. अधिकाधीक पावले ही खासगी सार्वजनिक वाहतूकीकडेच वळणार. आता खासगी प्रवाशी काळ्या पिवळ्या गाड्या या ग्रामीण बरोबरच शहरी प्रवासाकरिता उत्तम पर्याय म्हणून समोर आल्या असल्या तरी शासनच खासगी प्रवास करू नका! बसनेच प्रवास करा! अशी जाहिरात करत असतं. त्या जाहिरातीला अर्थ तरी काय उरतो.


याचा सर्वात वाईट परिणाम हा लहान मुलांच्या मनावर होणार, हे निश्चीत. वडिलधारी मंडळी काळ्या पिवळ्या गाड्यातून प्रवास करतात. जमेल तितके प्रवासी त्यातून वाहून नेले जातात, म्हणजे 'असे करणे बेकायदा नाही, त्यात काही वावगे नाही', असेच त्यांच्या मनावर बिंबणार? पुढे जाऊन ते त्यांच्या अंगवळणी पडणार! आणि ज्या भारतात युद्धा पेक्षा जास्त मृत्यू रस्ते अपघातात होतात, तिथे प्रवासाचा स्तर अधिकाधीक खालावणार...अशी ही व्यवस्था निर्माण करण्याची अवदशा तरी कोणाला आठवली? देव त्या अधिकारी व मंत्र्यांना सुबुद्धी देवो. ट्रेकरची लाल डब्ब्या सोबत तुटलेली नाळ पुन्हा जुळो', सह्याद्रीची पुढची भेट लवकरच घडो या सदिच्छेसह आमच्या भटकंतीला सहाय्य करणार्‍या सर्वांना धन्यवाद!


https://www.facebook.com/abpmajha/videos/10160027177210271/

(ट्रेक संपल्यानंतर हा वृत्तवाहिनीवरचा वृत्तांत हाती आला...आता त्यातली भाषा मोठी चमत्कारीक वाटते. 'वृक्षरोपणामुळे गाव आले संकटात', असा संदेश त्यातून प्रसारीत होतोय...प्रत्यक्षात तसे नाही. वनखात्याने महाराष्ट्रात बेफामपद्दतीने एक प्रजातीचे रोपण अक्षरश: उरकले...त्यात गिरीपुष्पाचा समावेश होतो...प्रत्यक्षात वृक्षारोपण करणे केव्हाही चांगलेच, पण ते एक प्रजातीचे कधीच नसावे, नाही तर अशी नैसर्गिक आपत्ती ही ओढवू शकते.)

(धोडप ट्रेक वृत्तांत समाप्त)

https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/

Thursday, February 1, 2018

Dhodap 2: इथली अन्न साखळी खंडित होतेय?

धोडप भाग २:
(उत्तरार्ध) 
''आपण महाराष्ट्रातील दुसर्‍या सर्वात उंच किल्ल्याच्या शिखराच्या पोटात एका प्रशस्त गुहेत आज मुक्काम करत आहोत'', ही भावनाच अधिक सुखावणारी होती. नाशिकहून धोडपच्या गुहेपर्यंतचा प्रवास प्रत्येक क्षणाला आनंद देणारा. जिवाभावाच्या एसटीने ऐनवेळी धोका दिल्याने, माझ्याकडे 'काय म्हणते तुमची एसटी? अशा अविर्भावात कटाक्ष टाकण्यात आला, असे केव्हा केव्हा घडते...घडू शकते असे इशार्‍यातले उत्तर दिल्यानंतर सर्वांना धोडपची गुहा कशासाठी प्रसिद्ध आहे तर ती तिथल्या उंदरांमुळे...रात्र उंदरांची जागा रहा या उक्ती नुसार सर्वांना सहजग होऊन आजची रात्र काढावी लागणार याची कल्पना दिली. गुहेतले उंदीर लोकप्रिय आहेत, तेव्हा भोजन केल्यानंतर उरलेला भात आणि गुळाच्या शिर्‍याच्या पातेल्यावर मोंठे दगड ठेवून आम्ही शुभरात्री केली. उद्या याचाच नाष्त्यासाठी उपयोग होणार होता. धुळीचा त्रास जाणवू नये व उंदरांची भिती नको, म्हणून आम्ही गुहेच्या आत दोन तंबु लावले. 
हे मूषकराज मोठे धीट...खिशातून मोबाईल फोन काढून बॅटरीच्या उजेडात त्यांना कॅमेराबंद करे पर्यंत पठ्ठ्या जागचा हलला नाही...'इथे आमचेच अधिराज्य', असेच जणू तो सूचवत असावा!

रात्र उंदरांची जागा रहा
सोबतचा शिधा आम्ही तंबुत घेतला. मध्यरात्र उलटी तोच, उंदीर पातेले उचकटण्याचा प्रयत्न करण्याचे आवाज येऊ लागले. थकव्यामुळे कुणीच उठण्याच्या मन:स्थितीत नव्हते. गुहेतल्या मिट्ट काळोखात उंदराचे चिरकणे व इकडून तिकडे पळणे जाणवत होते. त्यामुळे नम्रताची झोप उडाली होती. गार्गी व तिची मैत्रिण गाढ झोपेतुन जाग्या झाल्या त्या उंदरांच्या पळापळीमुळे. अजय बाहेर झोपला होता, त्यांच्या पांघरूणावरून उंदीर पळत होते. तंबुवरून ते इकडून तिकडे जाताना जाणवत होते. आमच्या बाहेरच्या बॅंगांकडे त्यांनी केव्हाच मोर्चा वळवला होता. दोन एकदा उठून उंदरांना हटकले, पण ते बरेच धीट भासले...हटकण्याचा त्यांच्यावर फार काही उपयोग झाला नाही.

'उंदीर काही तरी कुरतडतोय!' असे सांगुन नम्रताने मला उठवले. हो...नाही करता मी परत एकदा उठलो, बॅगा उलथून बघितल्या तर त्या खालून उंदीर पळाले. आम्ही बॅगांमध्ये काहीच खाण्याचे पदार्थ ठेवले नव्हते हे बरे केले. थोड्या वेळाने नम्रताने पुन्हा उठवून उंदीर काही तरी कुरतडत असल्याचे सांगितले. आम्ही बाहेर जाऊन तपासले, तेव्हा गार्गीच्या तंबूला एक बारीक छिद्र दिसून आले. उंदरांच्या प्रतापामुळे आपसूकपणे मध्यरात्री उठण्याची संधी मिळाली, परंतू ज्या पद्धतीने दिसायला हवी ती मंदाकिनी आकाशगंगा तितकी काही स्पष्ट दिसला नाही? काही वर्षांपूवी रतनगडवर मात्र असा अवर्णनीय नजारा बघितल्याचे स्मरत होते. काळ्या ढगांच्या पार्श्वभूमीवर लखळकणार्‍या अब्दावधी चांदण्या, ग्रह...जणू प्रकाशमान हिरे लखलखताहेत, असा तो अवर्णनीय नजारा होता. पुन्हा गुहेत शिरून आम्ही सोबतच्या सामानाची सुरक्षा ठेवण्याच्या कामाला जुंपलो. थोडी झोप लागली असेल, तोच तंबूत उंदिर शिरल्याचे गार्गी आपल्या मैत्रिणीला मोठ्यांदा सांगु लागली. बॅगेतही उंदिर शिरल्याचे ती म्हणाली, पुन्हा झोपमोड...पुन्हा सामानाची राखण... 

आमच्या अगोदर गुहेत डेरा टाकणारा मुंबईच्या भटक्यांवर मात्र उंदरां काहीच प्रभाव नसावा, मंडळी निपचीत घोरत पहुडली होती. त्यांची भटकंती सप्तश्रृंगीकडापासून सुरू झाली होती. तिथून रवळ्या, जवळ्या, बंड्या करून तो धोडपवर आले होते, त्या थकव्याचा हा परिणाम असावा...पहाटे केव्हा तरी झोप लागली, परंतू तोवर अजयने सूर्योदय बघण्यासाठी उठवले. गुहेच्या बाहेर तांबड फाटलं होतं, तेव्हा भराभर सगळ्यांना उठवून आम्ही गुहेच्या बाहेर आलो. तोवर मुंबईकर ट्रेकर्सच्या बोलण्यातून, कुणाचा पेला गायब तर कुणाचे काय पळविण्यात आलेले. त्यांच्या राशनपाण्यावर मुषकराजांनी चांगला डल्ला मारला होता. माझ्या नव्या कोर्‍या सॅकचा एक पट्टा कुरतडण्यात आला, तर गार्गीच्या सॅकचा पट्टा व तिची टोपी कुरतडण्यात आली होती. या धोडपच्या गुहेत एकदा अंधार दाटला की काहीच सुरक्षित राहू शकत नाही, तिथे फक्त मुषकराजांचे अधिराज्य. त्यावर आजघडीला तरी काही पर्याय नाही. 

महाराष्ट्रातल्या गडकिल्यांवर, गुहांमध्ये मुषकराजांचे अस्तित्व अनेक ठिकाणी आहे, परंतू धोडपवर ते जास्त मोठ्या प्रमाणावर आहे. ज्येष्ठ लेखक आनंद पाळंदेंच्या एका वर्णनात धोडपच्या गुहेतल्या उंदरांबद्दल वाचण्यात आले होते. ते प्रमाण आता अफाट वाढले आहे. त्याच्या सपाट्यात काय सापडेल अनं काय नाही'. मागच्या वेळी धोडप सुळक्याच्या उत्तर धारेच्या प्रथम आरोहण मोहिमेच्या वेळी आमच्या चमुने आरोहणाचे साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी गुहेच्या छताला बोल्ट मारून आपल्या सॅक त्यांस अडकविल्या होत्या, त्यावेळी त्यांच्या दोरावरून कुशल आरोहणाचे किस्से या निमीत्ताने ताजे झाले...येथे मुक्काम करायचा तर उंदरांची जोखिम पत्कारूनच.
रात्रीच्या अंधारात धोडपच्या एका नैसर्गिक गुहेत हा पक्षी रात्रीच्या निवार्‍याला थांबला होता...त्यांचे घर म्हणजे संपुर्ण दरीचा परिसर सहजपणे दिसू शकणारे एक prime location...

अन्न साखळी खंडलीय...
असे का घडतेय की, सह्याद्रीतल्या डोंगरांवर उंदरांचे प्रमाण वाढतेय? जिवो जीवस्य जीवनम्‌...येथे निसर्गातली अन्न साखळी कशी काय खंडित झालीयं? मला वाटतं, याचं मुळ सह्याद्रीत अफाट प्रमाणावर कत्तल केलेल्या झाडांच्या मुळाशी असावं. शिवकाळात झाडे सहजासहज तोडण्याची परवानगी नव्हती. मोठमोठाले वृक्ष होते, तेव्हा त्यावर वाढणारी नानाविविध प्राणी, पक्षी, किटकांची दुनिया आबाद होती. प्रत्येकला त्याचे अन्न व निवारा मिळत होता. आता वृक्षच राहिले नाही तर त्यावर उदरनिर्वाह करणारे जीव तरी कुठून येणार उंदरांसारखे फार थोडे जीव आहेत जी, कमालीच्या विपरीत स्थितीतही आपले अस्तित्व टिकवून आहेत. तीच गोष्ट बिबट्यांची व काही प्रमाणात माकडांची. 

वाघ, चित्ते, अस्वल, तणमोर, माळढोक आपल्या महाराष्ट्रातल्या सह्यासृष्टीत कोणे एकेकाळी अस्तित्वात होते. इंग्रजांच्या काळात वृक्षतोड आणि प्राण्यांची शिकार केवळ छंद म्हणूनही वाढीस लागली. इंग्रज गेल्यावर आपल्या लोकांनी, 'आपलीच मालमत्ता', या अविर्भावात या अनमोल जीवसृष्टीवर असा काही डल्ला मारला की आता त्यांतले फार थोडे जीव शिल्लक आहेत. त्यांना वाचविण्यासाठी कायदे, नियम बनवावे लागत आहेत, तरीही माणसाला अजून भानच नाही, तो आपल्या क्षणिक, क्षुल्लक गरजांकरिता उरले सुरले जीवही कवडीमोल लेखून वागत आहेत. त्यामुषकांना दोष देण्याचा येथे हेतू नाही, फक्त काय स्थिती आहे सह्याद्रीतल्या डोंगरांची व कशा प्रकारे सह्याभ्रमंती प्रभावित झाली आहे. मुक्कामाच्या निमीत्ताने काय काळजी घेतली जावी, याकरिताच हा प्रपंच! आमची तारांबळ कशी उडाली हेच यातून सूचित करायचेय!
दमदार चढाईनंतर ताजे गरम जेवण म्हणजे ट्रेकवरचे सर्वात मोठे आमिषच...इथे तर गुळ नी साजूक तुपाच्या शिर्‍यांचा बेत...जोडीला रशाची भाजी नी मसाले भात...

तो येतोय!

'तसा तो राजच येत असतो', आपले कधी लक्ष जाते किंत्येकदा आपल्या गावीही नसते, पण डोंगरावर त्याचे येणे आणि जाणे या दोन्ही कमालीच्या सुखावणार्‍या गोष्टी. अगदी रोज जरी हा योग आला तरी त्याचं नित्य नूतन दर्शन हे घडणारच! आजही तंबुच्या बाहेरची लगबग ऐकुन, 'तो येणार', याची गंधवार्त पसरली. रात्रभर मुषकराजांच्या सानिध्यामुळे पहाटे उशिरा झोप लागली होती, परंतू ती तोडण्यातच शहाणपणा होता. तो काही क्षणच थांबतो ना! नंतर मात्र त्याचे संसारी माणसाला फार अप्रुप नसते. सर्व वृक्षवल्लींना तो आपल्या हलक्या स्पर्षाने अन्न पुरवतो...
निसर्ग मोठा कलाकार...धोडपवरच्या जीर्णशिर्ण अवशेषातूनही इखारा सुळक्याचे लोभस दर्शन घडत होते...

पूर्वेला काळ्याशार पार्श्वभूमीवर हलकेच एक भलामोंठा लालेलाल गोळा वर आला. तो जस जसा वर येत होता, तस तसे त्यात कधी तांबूस तर कधी पिवळा रंग मिसळत क्षणाक्षणाला आपले रूप पालटत होता. मंद छटांकडून लखलखीत होतानाचा सूर्य पाहणे केवळ विलोभनिय. हे दृष्य आयुष्यात कितीदा बघितले असेल! पण त्याची रंगत जराही कमी नसल्याचे जाणवत होते. इखार्‍याच्या आडून हळूहळू वर येणार्‍या भास्कराच्या विविध रंगी छटांमध्ये आसपासची अनेक खेडी आता ऊठून दिसत होती. सातमाळाच्या डोंगररांगेतली ही गावे एकमेकांपासून तशी बरीच दूरवर वसली आहेत, परंतू त्यांनी गुंफुन ठेवणारा एक समान धागा दिसत होता, तो म्हणजे शेतीचे असंख्य चौकोनी आयाताकृती आकार. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असलेल्या नाशिकच्या चांदवड तालुक्यातल्या या भागात कैक संख्येने शेततळी बांधण्यात आली आहेत, उगवत्या सूर्या बरोबर त्यातले पाणी चमकत असल्याने एक वेगळेच दृष्य दिसत होते. 


पूर्व सपाटीपर्यंत जाऊन आम्ही सूर्योदयाचा मनमुराद आनंद घेतला. गुहेत माघारी परतून अगोदर चहा आणि नंतर नाष्त्याची तयारी असा क्रम सुरू असताना मुंबईकर भटक्यांच्या आवराआवरीने चांगलाच वेग घेतल्याचे दिसत होते. त्यांच्या दीर्घ भटकंतीचा आज समारोप होणार होता, त्यांची ती लगबग. आमची छावणी मात्र, 'कोणतीही घाई नाही', अशा अविर्भावात यथावकाश तयारी करत होती. 'गड चढताना होते तशी दमछाक उतरताना होत नाही, तेव्हा दिड दोन तासात खाली पोहोचू', अशी अटकळ बांधली जात होती. आम्ही सोबतच्या सर्व बाटल्या देवी टाक्याच्या कमालीच्या चविष्ट पाण्याने भरून घेतल्या. दिवसा उजेडी देवीच्या टाक्यातले दृष्य मात्र मन खट्टू करणारे होते. धोडपवर वर्षभर पुरेल इतके अतिशय चवदार व स्वच्छ पाणी या टाक्यात साठते. गडावरचे बाकी सर्व टाके शेवाळेलेले, हिरवट तेव्हा किमान देवी टाक्याची स्वच्छता राखण्याची जबाबदारी येथे भेट देणार्‍या प्रत्येकाचीच...प्रत्यक्षात तसे काही घडत नव्हते. या टाक्यात प्लास्टिकची खाद्यपदार्थांची वेष्टने, पाण्याच्या बाटल्या व अन्य घाण टाकून ठेवल्याने पाणी काळजीपूर्वक उपसावे लागत होते. बरं, टाके कमालीचे खोल असल्याने व पुढच्या भागात पाण्याची खोली जास्त असल्याने त्यातून पाणी उपसणेही सोपे नाही.
हीच का सौंदर्यदृष्टी...भुगोलातला चमत्कार प्रत्यक्षात दर्शविणार्‍या धोडपच्या डाईकच्या अश्मभिंतीला अशा प्रकारे कठडे बसविण्याची खरच आवश्यकता नाही...

तुमच्या डाईकला आमचे संरक्षण?
सर्व सामानाची आवराआवर करून आम्ही गडाचे पश्चिम टोक गाठले. या ठिकाणी दोन्ही बाजुंला वनखात्याने लोखंडी पाईपची कैक मिटर लांब अशी अखंड रेलंगची, अर्थात सुरक्षा कड्याची रांग खडकात सिमेंट कॉंक्रिटच्या सहाय्याने बसवली आहे. अशा प्रकारचे सुरक्षा कडे नितांत सुंदर सह्याद्रीला अभिषाप ठरावेत इतक्या बेढब पद्धतीने जिथे अजिबात गरज नाही, तिथे उभारण्यात आले आहेत, त्याला धोडपही अपवाद नव्हता. जिथे हजारोंच्या संख्येने लोक येत नाहीत, जिथे अतिशय धोकादायक असे कडे नाहीत, अशा ठिकाणीही लोखंडी पाईपचे सुरक्षाकडे उभारून ठेवलेत. गडाचे संवर्धन कशा पद्धतीने करावेत, या संदर्भात महाराष्ट्रातील अनूभवी दुर्गसंवर्धक, गिर्यारोहण संस्थांची मते विचारात घेतली जातात की नाही, की त्यांना केराची टोपली दाखविली जाते. दुर्ग संवर्धन समित्या महाराष्ट्रात अलिकडच्या काळात सरकारमार्फत स्थापिल्या जात आहेत, परंतू तरही गडांना अशी अवकळा आणण्याचे काम अव्ह्यातपणे सुरू आहे. त्यावर जो मोठा खर्च होतोय तो अनाठी ठरत आहे. अशी बांधकामे, असे सुरक्षा कडे डोंगरांवरच्या कमालीच्या विपरीत हवामानात टिकू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झाले आहे, तरीही हा अट्टाहास सुरूच राहणार असेल आणि महाराष्ट्रातीली जनता त्याकडे असहाय्य पणे बघणार असेल तर त्या सह्याद्रीतल्या गडकोटांच्या दोन पाच टक्का उरलेल्या अवशेषांच देवच रक्षण करो!
गडांवरच्या प्रतिकुल हवामानात आजच्या युगातले बांधकामतंत्र किती कुचकामी ठरते...संरक्षक कठडे दोनेक वर्षातच मान टाकू लागलेत...त्याची दूरूस्तीही आता परवडणारी नाही...

सुळक्याच्या मध्यावर गुहा
विशाला अशी धोडपवरची डाईकची अश्मरचना बघून आम्ही परतीचा रस्ता धरला. तिथून दिसणारी गावे, शहरे, डोंगर, किल्ले याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला, परंतू हवामानात धुसरता खूप होती, त्यामुळे दृष्यमानता स्पष्ट नव्हती. गुहेतल्या देवीची यथासांग पुजा करण्यात आली व आम्ही मुक्कामाची जागा सोडली. सुळक्याच्या पूर्व कड्याला मध्यावर एक चौकोनी गुहा आहे. तिथपर्यंतचा मार्ग मोठा बिकट, तो आम्ही काळजीपूर्वक पार केला, परंतू शेवटच्या कातळटप्पा कठिण असल्याने नव्या गड्यांना खालीच थांबण्यास सांगून आम्ही दोन खांबांची गहा बघितली. त्यात माणूस कसा बसा बसू शकतो, उभे राहण्याचा प्रश्नच नाही. त्यातही भिंतीवर काहींनी आपली नावे लिहून ठेवली आहेत.  या गुहेचा उपयोग कशाकरिता करत असावेत? टेहाळणी, संपत्ती ठेवण्यासाठी की दारूगोळा की आणखी काही? इथून पूर्व कड्याचा व इखारा सुळक्याचा नजारा फार सुंदर दिसतो.
पूर्व कड्या लगत वाड्याचे भग्नावशेष विखुरले आहेत. तिथे शेवाळेली पाण्याची दोन टाकी आहेत. वाड्यांच्या चिरेबंदी भिंती ढासळल्या आहेत. तर एकेठिकाणी चिरेबंदी छत अजूनही टिकून आहे. त्याचे स्थापत्य, त्याची सांधणी थक्क करून सोडते. इथल्या बांधकामाला चौकोनी आकाराचे दगड छताला अजूनही सुस्थितीतपणे टिकून आहेत, त्यांची बांधणी तरी कशी करत असावेत? मनात उठणारा हा सवाल चक्रावून टाकतो. 

त्यावेळचे बांधकामशास्त्र काय अजोड होते! काही ठिकाणी हिन्दू पद्धतीची मंदिरे पाडून वाड्याचे बांधकाम करण्यात आले असावे, असे काही चिरे बघून जाणवते. धोडप अधिक काळ मोगलाइत होत्या, त्यावेळी गडावरची मंदिरे पाडण्यात आल्याचे जाणकार मंडळी सांगतात. एके ठिकाणी आम्हाला कळसाच्या आतील बाजूची मोरपट्टी दिसली, त्यावरून येथे कोणे एकेकाळी फार मोठे मंदिर हिन्दू राजांनी बांधले असावे, याचा बोध होतेा. 
या ठिकाणी प्रामुख्याने गडाच्या प्रमुख अधिकार्‍यांची निवास्थाने असावित. एकाच परिसरात मोठ्या प्रमाणावर वाड्याची जोती आढळतात. काहीं जोती तर असंख्य उन, वारे नी आक्रमकांच्या धडका सोसूनही आजही सुबकपणा टिकवून; त्यांच्या आकारमानावरून तिथे कचेर्‍या असाव्यात असे वाटते. या पडक्या अवशेषांच्या मागे पाण्याचे मोठा बांधिव तलाव असून त्याला मोठी तटबंदी आहे. त्यातून खालच्या गावात गुरूत्वाकर्षण पद्धतीने लोखंडी पाईपच्या सहाय्याने पाणी उपसा केले जातो.
असे बांधकाम आजच्या पिढीच्या हातून घडणे नाही...धोडपच्या पूर्व टोकावरच्या या पडक्या वाड्याचे छप्पर दगडी चिर्‍यांचे बनले आहे...चारेकशे वर्षातही ते टिकून आहे...छताला असे चिरे बसवतात तरी कसे? हा प्रश्न आजच्या अभियंत्यांना पडायलो हवा...असे चिरकाळ टिकणारे बांधकाम नव्याने साकारण्याचा प्रयत्न करून बघायला हवाच हवा!

प्रमुख दरवाजा उतरताना, इतक्या उंचीवर, ओबड धोबड मार्गाने रात्री आपण या ठिकाणहून वर आलो? असे आश्चर्यमिश्रीत उद्‌गार कानी पडत होते.  मान उंचावून मागे नजर फेरली, तेव्हा तट व बुरूजाचे बेजोड बांधकाम आज शेकडो वर्षे उन वारा पाऊस सहन करत कसे काय टिकून आहे, हा विचार आपल्याला आपल्या गत वैभवाच्या आठवणीत घेऊन जातो. आपल्या पूर्वजांचे त्याकाळचे स्थापत्य, बांधकामातील अचूकता, विज व उपकरणांच्या शिवाय अफाट मोंठी बांधकामे करण्याची हातोटी पाहून आश्चर्य झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा बुरूज ओलांडत असताना आमची भेट ओतुरहून आलेल्या युवकांशी घडली, त्यांच्यापैकी एकाने लोखंडी सुरक्षा कड्याचा एक खांबच खेचून आणला होता. गावाकडची ही मंडळी अक्षरशा माकडागत कड्याच्या पोटातल्या टाक्यापर्यंत पोहोचली, आता यांच्या संरक्षणासाठी या लोखंडी कठड्यांचे काय काम...आणि सह्याभटक्यांकरिताही हे संरक्षक कठडे गरजेचे नाहीत. येथे मोठी जत्राही भरत नाहीत, ज्यामुळे गडावर एकच गर्दी उसळते, मग हा खर्च अनाठायीच नाही का ठरत?
छाती दडपणारा अफाट कातळकडा
थोडी खाली उतरल्यावर मुख्य वाट सोडून उजवीकडे लोखंडी सुरक्षाकड्यांची रांग पश्चिम दिशेला जात असल्याचे दिसत होते. हा काय प्रकार म्हणून आम्ही ती वाट धरली, पण रस्ता संपता संपेना. कड्यालगत वळणावळणांची चारशे मिटर पेक्षा अधिक अंतराचा हा टप्पा प्रत्यक्षात धोडपच्या अजस्त्र अशा घळीत घेऊन जातो. वर शेकडो फुट उंची व विस्ताराचा कडा, त्यावर नजर ठहरत नाही. यापूर्वीच्या भटकंतीत हा भाग बघण्याचे राहून गेले होते. धोडपवरचे गायीचे नैसर्गिक शिल्प येथे असावे या अपेक्षेने आम्ही ही वाट धरली, ती आम्हाला पाण्याच्या धारेच्या मार्गावर घेऊन गेली, तिथे सुट्ट्या दगडांची वाट खाली उतरते व तिथून डावीकडे पुन्हा लोखंडी सुरक्षाकडे थेट धोडपच्या कातळ टप्प्याच्या पायर्‍यांखाली घेऊन येतात. 
पुर्वी धोडपच्या बिकट कातळ  टप्प्याला हा मार्ग पर्यायी असावा! आता मात्र दोन मोठ्ठे लोखंडी जिने बांधल्याने या पर्यायी मार्गावर इतके अफाट रेलिंग कशासाठी? हा सवाल आपल्या डोक्यात उपस्थित झाल्यावाचून राहत नाही. सिमेंट व लोखंडात इतके लांबलचक सुरक्षाकडे उभारण्यामागचे कारण तरी काय?

वीस फुटांचा सरळ सोपा उतरण्याचा मार्ग असताना हा लक्षावधींच्या खर्चाचा लांबलचक वळसा कशासाठी तयार केलायं? तो करण्यामागे कोणती सुपिक कल्पना असावी? या बेबंद खर्चाचा ताळेबंद कोणी तपासत नसेल? अशा अनेक प्रश्नासह आपला पूढचा मार्ग सुरू होतो, तो आश्रमाच्या दिशेने. वीस मिनीटात खडतर उतार पार करून आश्रमाच्या टप्प्यावर दाखल झाल्यानंतर आम्ही सुंदर स्थापत्याचे नमुना असलेली बारव डोळे भरून बघितली.

 ही बारव खालच्या भागात दगडात व वरच्या भागात विटात घडवली आहे. अनेक प्रकारचे कमानी बांधकाम लक्ष वेधून घेते. बारवचे पाणी कमालीचे थंड आहे, परंतू त्यात फार मोठ्या प्रमाणावर घाण साठली आहे, ते न केवळ पिण्यासाठी उपयोगाचे, हातपाय धुण्यासही सुरक्षित नाही. इथून उजवीकडे दहा मिनीटांच्या अंतरावर दोन पुरातन मंदिरे आहेत, तर डावीकडे गडाचे पूर्व टोक. तिथे गडाच्या वस्तीची वेस व त्यावरचा देवनागरी शिलेलेख असलेला दगडी दरवाजा बर्‍याच प्रमाणावर सुस्थितीत उभा आहे. 

या प्रवेश दरवाजाच्या आतील बाजुला ठिकठिकाणी जुन्या बांधकामांचे अवशेष आहेत. काही ठिकाणी तर जमिनीच्या पोटात पायर्‍यांची पाण्याची टाकी, तर काही ठिकाणी झाडीच्या आत लपलेले खाली उतरण्याचे मार्ग, जणू चारवाट असावी. मारूतीचे एक पडझड झाल्यामुळे काहीसे कललेले मंदिर आहे, त्याचा अर्धवर्तूळाकार घुमट इतका गोल कसा? असे गोल घुमट मुसलमानी बांधकामात अधिकतर बघायला मिळतात. 

या दरवाजाला बाहेरच्या बाजूने दोन मोठे बुरूज आहेत. तिथून पाचच मिनीटात नैसर्गिक तलाव आणि त्या वाटेवर राखण करण्यासाठी उभा असलेला धोडप किल्ल्याचा सर्वात देखणा व सुथितितला बुरूज उभा आहे. त्याच्या वरच्या मार्गावर मात्र मोठा कडा कोसळा आहे. 

इथुन घळीच्या वाटेने हट्टीकडे उतरता येते. हा मार्ग प्रचलित व जास्त सोपा, आम्ही मात्र आश्रमात परतलो, कारण आमचे दोन गडी तिथल्या औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेत होते. वाटेत लहान बाळाला कडेवरून घेऊन जाणारे एक जोडपे भेटले. वळाळीभोई इथल्या एका खेड्यातून ते जुन्या घाटवाटेने कळवळला जात होते. लक्षात घ्या धोडप ते कळवण हे अंतर रस्ता मार्गा दहा किलो मिटर आहे. हे जोडपे घाटा, जंगल, डोंगर असे अंतर पायी कापणार होता. गाव तेथे एसटी बस सेवेचा लाभ त्यांच्या गावाला होत नसावा, किंवा एसटीचे भाडे आवाक्या बाहेर जात असावे किंवा दोन्ही कारणे असावीत!

या तलावाच्या काठावर लष्करी छावणी असावी. बुरूजाच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर घरांची जोती व दगडी बांधकामांचे असंख्य अवशेष येथे विखुरलेले आहेत. येथे मोठी सपाटी असल्याने लष्करी तळासाठी ही जागा योग्य वाटते. दुसर्‍या सूरत मोहिमेवरून परतताना छत्रपती शिवाजी महाराजांनी धोडपला भेट दिल्याचे ऐतिहासिक उल्लेख आहेत. परंतू धोडप हा सर्वाधिक ओळखला जातो तो राघोबादादा आणि माधवराव या पेशवाईतल्या युद्धामुळे ज्यात पुतण्याने काकांचा जुन १७६८मध्ये पराभव केला. भारतात इंग्रज सत्तेची पाळेमुळे घट्ट रोवण्यात या लढाईचे महत्व मानले जाते. धोडपचे पेशवाईतले प्रसिद्ध युद्ध कोठे झाले असावे? याचा काही बोध होत नाही.


अनं खवा आटला...
या आश्रमा समोर असलेल्या औदूंबर वृक्षाखाली पाण्याचा जिवंत झरा वाहतोय. येथे लोखंडाची दोन अजस्त्र घमेली आहेत. बर्‍याच वर्षांपासून या किल्ल्यावर गाईचे दूध आटवून खवा तयार केला जायचा. सातमाळा रांगेतले हे नेहमीचेच चित्र. गडांचे राजनैतिक महत्व इंग्रजांनी देशावर कब्जा केल्या पासून संपले. १८१८च्या सुमारास इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतांशी गडांचे मार्ग तोफा, सुरूंग लाऊन उध्वस्त केले आणि कोणे एकेकाळी तलवारींचा खणखणाट करणार्‍या योध्यांनी नंतर हातात चक्क डाव घेऊन कुटुंबाचा गाडा चालविला, त्याचे उत्तम उदाहरण हट्टीत बघायला मिळते. आता तेही मिळायचे असे म्हणावे लागेल, कारण वनकात्याने गडावरचा लाकुडफाटा तोडून खवा आटविण्यास बंदी घातली आहे. हे एक प्रकारे चांगलेच झाले असे म्हणावे लागेल. 

इंग्रजांनी तयार केलेल्या दार्शनिकेत धोडपवर मोठ्या प्रमाणावर जंगल असल्याचे व त्यात अर्जुन, सादडा, जांभूळ, आंब्याचे असंख्य वृक्ष असल्याचा उल्लेख आहे. आज घडीला त्यातले पाच टक्के सुद्धा मोठे वृक्ष शिल्लक नाहीत. गडावर अफाट मोठे सुरक्षाकठडे आणि लोखंडी जीने बसविण्यापेक्षा हा खर्च जर ढासळलेल्या तट, बुरूजांच्या डागडुजीवर किंवा मोठाले वृक्ष वाढवून पुन्हा नव्याने सजिवसृष्टी साकारण्यावर खर्च करण्यात आला असता तर? आम्ही ट्रेकर अशा स्वप्नरंजनात पटकन शिरतो!

हट्टीची खवा एक्सप्रेस
इंग्रजांकरवी १८१८मध्ये गडांचे प्रमुख मार्ग उध्वस्त करण्यात आले असले तरी सातमाळा रांगेत गडांवर वहिवाटीची उत्तम व्यवस्था असल्याने पायथ्याच्या लोकांनी गडांवर गायी, म्हशी शेळ्यांची चराई सुरू केली. मुबलक चारा, ठिकठीकाणच्या इतिहासा काळातील व नैसर्गिक तलावातील पाणी गुरांना उपलब्ध होऊ लागले, त्यामुळे सहाजिकच भरपूर प्रमाणात दूध तयार होऊ लागले. परंतू आसपास मोठी वस्ती नसल्याने हेच दुध आटवून त्यापासून खवा तयार करण्याचा उध्योग उभा राहिला. या खव्याला चांदवड, कळवण, वडाळीभोई अशा बाजारपेठे मिळू लागल्या. या बाजार पेठांमध्ये पूर्णत: नैसर्गिक चार्‍यावर वाढलेल्या गाईंच्या दुधा पासून बनविलेला उत्तम दर्जाचा खवा व त्या पासून पेढे तयार करण्याचा उध्योग सुरू झाला. अगदी तीनेक वर्षांपर्यंत हा व्यवसाय बहरत होता. धोडपवर तर इतका खवा तयार व्हायचा की, त्याला नाशिकमध्ये बाजारपेठ मिळावी याकरिता परिवहन महामंडळाने खास हट्टीसाठी खवा एक्सप्रेस बस सुरू केली. ही बस आजतागायत सुरू आहे. संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर खवा एक्सप्रेस हट्टी गावात दाखल होते व रात्रभर मुक्काम करून सकाळी ७-०० रवाना होते. ट्रेकर्स करिता अजिबात सोयीचे नसली तरी काही रात्रीच्या चढाईकरिता अगदी सोयीची आहे. 


साहस पर्यटन केंद्र
वनखात्याकडे भरघोस निधी आला आणि तत्कालिन वनखात्याचे प्रधान सचिव प्रविणसिंग परदेशी यांनी स्थानिकांना रोजगार मिळावा व वनांचे संरक्षण व्हावे या उदात्त हेतूने सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून धोडपच्या पायथ्याला हट्टीच्या वेशिवर साहस पर्यटन केंद्र सुरू केले. येथे निवास व भोजनाची व्यवस्था होऊ शकते. बाकी साहसी खेळांचा दर्जा उद्‌घाटनाच्या दिवशीच स्पष्ट झाला होता. आज हे साहसी पर्यटन केंद्र कसेबसे तग धरून उभे आहे. एखादा मोठा अधिकारी मोठे स्वप्न रंगवून चांगल्या योजना राबवितो, परंतू हाताखालची नोकरशाही जर कुचकामी असेल तर काय घडू शकते याचे धोडप हे उत्तम उदाहरण. हे साहसी केंद्र चालविण्याचा हट्टीच्या रहिवाशांना कोणताही अनूभव नाही. त्यांना त्याचे पुरेसे प्रशिक्षण नाही. साहसी खेळाची उपकरणे सुमार दर्जाची, त्यामुळे या चांगल्या उपक्रमाला आता घरघर लागली आहे. गडावरही विकासीची जी कथित कामे केलीत, ती गडाचे गडपण राखण्याच्या योग्यतेची नाही. 

इंग्रज गेल्यानंतरही धोडपवर वेगवेगळ्या राजवटीतल्या तोफा होत्या, त्या अक्षरशा ओरबडून न्याव्यात अशा पद्धतीने उतरवून नाशिकच्या तोफखाना केंद्रात ठेवण्याचा घाट घातला गेला. त्या नादात तोफांचे अतोनात नुकसान झाले. गडावरच त्यांचे जतन झाले असेत तर आज धोडपचे रूप अधिक बहरले असते. अनेक तट, बुरूज, दरवाजे ढासळलेतर; वन, पर्यटन, सार्वजनिक बांधकाम, पुरातत्व या खात्यानी त्यावर बेफाम वाढलेली झाडे काढण्यावर, त्याचे निखळलेले दगड सांधण्यावर खर्च केला असता तर धोडपच्या सौंदर्याला केवढी उंची प्राप्त झाली असती. 
(पुढील भाग...)
-------------
https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/

Wednesday, January 31, 2018

Dhodap 1: डाईक अन प्लगचा धोडप मुक्कामाला म्हणतोय 'ना'


धोडप भाग १:
''तटबंद माच्या, विशाल बुरूज, देखणी बारव अशा विपुल प्रमाणात विखुरलेल्या ऐतिहासिक वारशा बरोबरच तिथली अनोखी भौगोलिक रचना जिज्ञासूंना खुणावतात ती सर्वोत मोठी डाईकची अश्मरचना, भला मोठा व्होल्कॅनिक प्लग आणि डोंगरातून आरपार गेलेली विशाल गुहा'', एकाच ठिकाणी तीन भौगोलिक आश्चर्ये असेला नाशिक जिल्ह्यातल्या अजिंठा सातमाळा रांगेतला धोडप सह्याद्रीतला दुसरा सर्वात उंच असा किल्ला...कळसुबाई आणि साल्हेर नंतरचे महाराष्ट्रातले तिसरे सर्वोच्च शिखर मिरविणारा धोडप म्हणजे भटकंतीची एक मस्त मेजवानीच...अशा या सर्वांगसुंदर किल्ल्यावर आज घडीला मुक्कामी भटकंतीचा बेत होऊ शकतो का? खरोखरच हा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. त्याच बरोबर भटक्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची एसटी, अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन सेवा यापूढे भटक्यांच्या सेवासाठी तत्पर राहील का? हाही प्रश्न सतावू लागला आहे. 
किल्ले धोडपचा अजस्त्र डाईक...सुमारे ७०० मिटर लांबीची ही प्रस्तरभिंत... प्रत्यक्षात ती तीस पस्तीत मिटरच रूंद आहे...फक्त पगडी सारखा भासणारा प्लगचा भागच जास्त रूंदीचा आहे.
ट्रेक म्हटला की माझा उत्साह कमी झालाय असे आजवर कधीच घडले नव्हते. स्वत: चांगली ट्रेकर असूनही, माझ्या बेशुमार भटकंतीला वैतागलेल्या सौभाग्यवती नम्रताने, 'चल ना! कुठे तरी ट्रेकला जाऊ? असा आग्रह धरला होता. गेल्या काही दिवसांपासून ती त्यासंबंधी विचारत होती, परंतू माझं मन, हा प्रश्न खरा आहे! हे मानायला तयार नव्हते. सुरूवातीला मी रतनगडचा विचार करत होतो, परंतू शनिवार व रविवार तिथे अक्षरश: जत्रा भरते, तेव्हा अहिवंत, मुल्हेर, पिसोळगड असे वेगवेगळे बेत मनामध्ये ठरत असताना शेवटी आम्ही वणीच्या सप्तश्रृंगी गडावर मुक्कामी जाण्याचे ठरवले. योगायोग म्हणजे माझ्या तिघा ट्रेकर मित्रांनी नुकताच रडतोंडूच्या मार्गाने सप्तश्रृंगीगडाचा ट्रेक केला होता. कोणी एखादा ट्रेक केला की, त्याच्या मागोमाग अनेकांचे ट्रेक तिथे होत असतात, हा योगायोग मी यापूर्वी अनेकदा बघितला आहे. 

सप्तश्रृंगीगडाच्या बाबतीतही मला तसेच वाटत होते. शनिवारी दुपारी उशिरा रडतोंडीच्या कातळकोरीव पायर्‍यांची दमदार चढाई करून जिथे देवीचे कारण केले जाते त्या वनात किंवा शितकड्या लगत मार्कंडेय पर्वताच्या समोर डरा टाकावा असा निर्णय ठरला. परंतू सप्तश्रृंगी गडावर गेल्यानंतर भटकंतीची काहीज मजा येत नाही. गडाला गडपण असे नाहीच, गडावर बकाल गावच वसले आहे. उलट तिथल्या कचर्‍याने आणि गडाच्या निसर्गाची वासलात लावणार्‍या बेफाम वाढलेल्या लोकवस्तीची दशा बघून त्रासच होतो, त्यापेक्षा धोडप करूया! एकतर धोडपला जाण्यासाठी वाहतूकीचे भरमसाठ पर्याय आहेत. शिवाय गडाचे असंख्य अवशेष, गुहेतला मुक्काम आणि देवी मंदिराच्या टाक्यातले चवदार, थंडगार पाणी चाखण्याची ओढ यामुळे आमचा शोध धोडपच्या भटकंतीवर येऊन थांबला.


कोणे एकेकाळी असंख्य मोठमोठ्या वृक्षांचा हा परिसर पूर्णपणे निष्पर्ण झालाय...इथली शेवटची वृक्ष प्रजाती म्हणजे बाभुळ...पंधरा वीस वर्षांपर्यंत तिचे अस्तित्व टिकून होते, ते ही जंगलमाफियांनी लूटून नेले...आता खुरटी झाडेही फार थोडी शिल्लाक राहिली आहेत...परंतू शहरी माणसाला त्या परिस्थितीतही कमालीचे समाधान देणारे इथले वातावरण आजही अस्तित्वात आहे...

शनिवारी दिनांक २७ जानेवारी २०१८
'ट्रेकवर जाताना आम्हाला सांगत जा ना राव', असे नेहमी म्हणार्‍यांपैकी निम्म्याधिक जणांशी फोनवरून संपर्क साधला, परंतू काहींचा संपर्क होऊ शकला नाही, तर बाकीच्यांनी या ना त्या कारणामुळे नकार दिला. आमची भटकंती ठरलेलीच होती. कलावंत मित्र अजयला या भटकंतीची कल्पना दिली आणि काही मिनीटात त्याने घरातून परवानगी घेऊन होकार कळवला. आता मी, आमची सौ. नम्रता, थोरली कन्या गार्गी आणि तिची एक मैत्रिण असे पाच जण झालो. धाकटी कन्या मैत्रेयी आमच्या मातोश्रींच्या सोबत बाहेरगावी गेल्यामुळे आमच्या सोबत येणार नव्हती.

ट्रेकला जाणार कसे? ''महाराष्ट्रात दुर्गम, अतीदुर्गम भागाला जोडणारा एसटीचा लाल डब्बा ट्रेकर्सच्या खासा जिवाभावाचा'', अशी स्तूती सादर केल्याने सर्वांनी त्याला तात्काळ होकार भरला. 'आम्ही पाच' वडाळीभोईला जाण्यासाठी शनिवारी (दिनांक २७ जानेवारी २०१८) दुपारी तीनच्या सुमारास नाशिकच्या ठक्कर बाजार बसस्थानकावर पोहोचलो. नम्रताचं म्हणणं होतं, द्वारका सर्कलवर जाऊ, तिथून सगळ्याच बसेस जातात; बस नाही मिळाली तर काळी पिवळीने जाता येईल. मी म्हटलं, एसटीचा प्रवास सर्वात सुखकर, एैसपैस जागा, सुरक्षेचा जरा जास्त भरवसा, शिवाय आपल्या बॅंगा ठेवण्याची अडचण येणार नाही. 

धोडप म्हणजे हट्टी गावापासून दोन तासांची चढाई. ५-०० वाजे पर्यंत हट्टीला पोहोचलो तर लागोलाग चढाईला सुरूवात करून सूर्य मावळण्याच्या आत गुहेत डेरा टाकता येईल व रात्रीच्या स्वयंपाकाची व लाकुडफाट्याची तयारी करता येईल, अशी आमची योजना होती. बसस्थानकावर गेल्या गेल्या बस मिळेल, असा विश्वास ठेऊन आम्ही ठक्कर बाजार बसस्थानकाकडे निघालो. आमच्या सोमवार पेठेतल्या रिक्षास्टॅन्डवर एका रिक्षाचे ५०/- रूपये दर सांगण्यात आले. पाऊण किलो मिटर अंतराकरिता हे दर खुपच होतात. मिटरचा एकही फ्लॅप पडत नाही, परंतू शासकीय पंधरा रूपये टप्प्याचा दर नाशिकमध्ये कुणीही आकारत नाही. मुंबईतली टॅक्सी त्यापेक्षा स्वस्त पडते. 'आम्ही गल्लीवाले' म्हणून मोठ्या उदार मनाने आम्हाला खास १०/-रूपये सूट मिळाली.

एसटीचा नवा अवतार
बसस्थानकात धुळे बस लागली होती, बसायला एैसपैस जागाही मिळाली. वाहक आला, तेव्हा शंका नको म्हणून मी, वडाळीभोईला थांबणार ना? असा उत्तरवजा प्रश्न केला व बैठक मारणार, तोच ही बस वडाळीभोईला थांबत नाही, असे त्याने सांगितले. 'अहो, बस तर त्याच मार्गाने जाते, आम्हाला महामार्गावरच उतरायचे आहे', असे सांगितले, तेव्हा त्या स्थानकाचे या यंत्रात तिकीटच नाही', असे उत्तर मिळाले. त्यानंतर आम्ही नंदूरबार, नवापूर, मालेगाव अशा त्या मार्गावरून जाणार्‍या प्रत्येक बसची चौकशी केली, परंतू कोणीही वडाळीभोईला थांबत नाही, असे सांगितले. यातील काही बस या विनावाहक होत्या, म्हणजे एका स्थानकावरून दुसर्‍या स्थानकावर थेट धावणार्‍या. मध्ये त्यांना थांबा नव्हता, परंतू लांब पल्ल्याच्या बसनी, गाडीत पुरेशी जागा असताना चक्क प्रवाशी नाकारले'; माझ्यासाठी हा अनूभव जसा नवा होता, तसाच तो चक्रावून टाकणारा होता. 

अखेर वैतागून, 'चांदवड पर्यंतच तिकीट द्या, पण आम्हाला वडाळीभोई पर्यंत घेऊन जा', असे एका चालकाला सांगितले तेव्हा त्याने, अर्ध्या तासात मनमाड बस येईल, त्याने तुम्ही जाऊ शकता असा सल्ला दिला. आमची स्पर्धा त्या भास्करा सोबत होती. वडाळीभोईहून जाणार्‍या अनेक बस अर्ध्या रिकाम्या जात होत्या, पण त्या आम्हाला नेऊ शकत नव्हत्या? अखेरीस ३-३० वाजेची मनमाडला जाणारी एसटी आली आणि आम्हाला घेऊत ती लागोलाग रवाना झाली. नाशिक-वडाळीभोई ४८ किलो मिटर अंतराकरिता तिकीट लागले ६७/- रूपये.

हट्टी...हटाने हटो!
वडाळीभोईला पोहोचलो खरं, परंतू तिथून हट्टीला जायचे कसे? हा मोठा प्रश्न होता. आठ किलो मिटरवरच्या धोडंबे गावापर्यंत प्रवासी जीपची ये-जा सतत सुरू असते, तिथून ४ किलो मिटरवरच्या हट्टीला पोहोचणे हे खरे आव्हान होते. सायंकाळी ६-००ची नाशिक-हट्टी बस आमच्यासाठी तशी सोयीची होती, परंतू आमच्या वेळापत्रकात ती बसणार नव्हती. धोडंब्यापर्यंत दहा रूपयात जीपगाड्या प्रवासी घेऊन जातात. ‍एकाने, जीप फुल्लं भरल्यावर निघेल, पण तिथून हट्टीचे २००/- रूपये पडतील? असा प्रस्ताव ठेवला. आमची थोडी बाजार खरेदी बाकी होती, तोवर ती जीप रवानाही झाली. मागच्या जीपला विचारले, तर पहिल्याने ३००/- रूपयांचा आकडा सांगितला, तर त्याच्या मागच्याने ३५०/- रूपये. शेवटच्या ४ किलो मिटर टप्प्यासाठी १४०/- ते २९०/- रूपये जादा पडणार होते, तेही एकाच थांब्यावरून. या तफावतीत फार न गुंतता आम्ही ३००/- वाल्या जीपमध्ये स्थानापन्न झालो. अधिक प्रवाशांची वाट न बघता तो आम्हाला घेऊन हट्टीच्या दिशेने आपली जाप दौडू लागली. जीप कसली तो संपुर्णपणे खिळखीळा झालेला चालताफिरता सांगाडाच होता, तरीपण तो आमच्या मदतीसाठी वेळेवर धावून आला होता. 

'धोडपच्या पायथ्याला वन खात्याने महाराष्ट्रातील पहिले साहस पर्यटन केंद्र तब्बल दिड कोटी रूपये खर्च करून उभारले आहे. त्याठिकाणी दिवसातून केवळ एकच बस जाते ती देखिल संध्याकाळी आणि मुक्काम करून ती सकाळी ७-०० वाजता परतते. स्वत:चे वाहन असेल तर श्रेयस्कर अन्यथा हट्टीला ये-जा करायची तर खिशाला मोठी चाट तयारी असायला हवी'.
धोडंब्याहून हट्टीचा रस्ता खुपच खराब असल्याने चालक आम्हाला वणी रस्त्यावरून हट्टी फाट्याकडून घेऊन गेला. वनखात्याच्या निसर्ग पर्यंटन केंद्राच्या जवळ त्याने आम्हाला सोडले. गावात एकाने, गाईड हवा का? विचारले, त्यास नकार देऊन आम्ही वेळ न दवडता किल्ले धोडपकडे रवाना झालो. 



सूर्य डोंगराआड कलायला अवघी काही मिनीटे शिल्लक होते. वाटेतल्या नैसर्गिक तलावात काही मोठे पक्षी आमची चाहुल लागल्याने पोहोत पलीकडे गेले, मावळतीच्या मंद प्रकाशात त्यांचे ते विहरणे मोठे रम्य भासत होते. खुरट्या परंतू एकही मोठे झाड नसलेल्या त्या प्रदेशाचा आब गावगर्दी नसल्याने मोठा विलोभनीय वाटत होता. हट्टी हे गाव दुर्गम भागात, त्यात डोंगराकडच्या बाजुला खुरटे जंगल असले तरी जंगलाचे अशा प्रकारचे मन प्रसन्न करणारे वातावरण भटक्यांच्या नेहमीच वाटेला येते. गार्गी आणि तिच्या मैत्रिणीकरिता हा अनूभव तसा नवा होता, तेव्हा त्यांच्यातली उत्सुकता व आनंद बघण्याजोगा होता. 

दहा पंधरा मिनीटेच चाललो असेल तोच पश्चिमकड्यावर सूर्यराज दिसले. आता काही क्षणात ते गुडूप होणार, हे स्पष्टच होते. त्याची एक छानशी छबी टीपून आम्ही कोरड्या पडलेल्या नेत्रावती नदीचे पात्र ओलांडले. पलिकडून एक आजी, हा रस्ता नाही, असे ओरडून सांगत होत्या. गार्गीनेही, आजी हा रस्ता योग्य नाही, असे सांगताहेत असे माझ्या नजरेत आणून दिले. लांबचा रस्ता घ्यायचा नाही, हे ठरवल्याने आपण हा लघु मार्ग पत्कारत असल्याचे तिला समजावून सांगितले. एके ठिकाणी गायीचा कळप व गुराखी भेटला, त्याने उजव्या मार्गाने जाण्याचा सल्ला दिला. योगायोग म्हणजे तोही परदेशी नावाचा (तसे अवघे हट्टी गाव ही परदेशींची जुनी पुरानी वस्ती) त्यामुळे नाशिकची परदेशी मंडळी आपल्या गावात आल्याचे बघून त्याने हसून आमचे स्वागत केले. 


गोधन हे कुठल्याही गावचे वैभव...हट्टीत आजही बरेच गोधन टिकून आहे...परंतू खव्या करिता आता जगलतोडीस बंदी घालण्यात आल्याने या गोधनाचा या पामर वस्तीत निभाव कसा लागणार? गावानेच आता देवराई तयार करावी व गुरांकरिता वेगळे चराई क्षेत्र निर्माण करून आपल्या गावाचा लौकिक राखायला हवा!

आता आमचे पहिले उद्दीष्ट होते ते म्हणजे डोंगराच्या मध्यावर लागणारा कुठल्याशा साधूचा आश्रम. मागच्याच महिन्यात आम्ही मेट पिलावरेहून तोरण्यावर गेलो होतो. त्या मार्गाचा घसारा अजूनही मनातून गेलेला नाही. काहीशी तशीच अनूभूती या सूरूवातीच्या टप्प्यात येत होती. पाठीवरची सॅक बॅग तर शिगोशिग भरलेली होती. एक तंबु, तीन पातेले, ताटं, त्यात स्वयंपाकाच्या काही वस्तू आणि माझ्या काही वस्तू असे भरपूर ओझे असूनही चढताना ओझ्याचा फार काही त्रास जाणवत नव्हता, याचे एकमात्र कारण म्हणजे मागच्या भैरवगड ते कात्रा ट्रेकवर झालेली दमछाक ध्यानात घेऊन मी मला कमी पडणारे मिठाचे प्रमाण नियंत्रणात ठेवले होते. (सोबतच्या डॉक्टर मंडळींनीच तेव्हा तसे निदान केले होते)



'मुले कशी पटकन शिकतात'...तिव्र उतार नी घसारा कसा पार करायचा, याचे कोणतेही प्रशिक्षण नसताना भटकंतीच्या दुनियेतल्या नवख्या गार्गीने बरोबर सर्वात उत्तम आधार घेतला...

मार्गदर्शक कचरा
चंद्राच्या प्रकाशात आमची सावली दिसत होती. बॅटरीच्या उजेडाची आवश्यकताच नव्हती. रस्ता बरोबर आहे का, ही चिंता मनात अधून मधून उत्पन्न होत होती, परंतू कोणत्या दिशेने जायचे आहे, हे ठाऊक असल्याने मी पुढे जाऊन वाट शोधत होतो. नम्रता मात्र, 'रस्ता बरोबर आहे ना?' असे अधुन मधून विचारत होती. वाट बर्‍यापैकी मळलेली होती, वाटेत अनेक ठिकाणी पाण्याच्या बाटल्या व कचर्‍याच्या पिशव्या दिसत होत्या. त्यामुळे आपला मार्ग चुकलेला नाही, याची जणू पावती मिळत होती. महाराष्ट्रात गुटखाबंदी नव्हती, तोवर गुटख्याच्या पुढ्यांची वेष्टने भटकंतीचा मार्ग दाखवायच्या. आता गुटखाबंदी असल्याने त्यावर बरेच नियंत्रण आले आहे, परंतू गडकिल्ल्यांवर जाणार्‍या सहलबाजांची संख्या वाढल्याने ठिकठिकाणी दिसणारा कचराच तुम्हाला आपसूकपणे मार्ग दाखवतो. 

एके ठिकाणी उजवीकडे जाणारी वाट आणि कातळात काहीसा आव्हानात्मक टप्पा लागला. सोबत दोन नवख्या ट्रेकरमुली असल्याने हा 
लहानसा कातळ टप्पा अवघड ठरणार होता, तेव्हा अजयला उजवी वाट बघायला सांगून मी कातळटप्प्याला भिडलो. उजवी वाट बरोबर
असल्याचे त्याने सांगितले. पुढे त्यांना पाण्याचे नैसर्गिक टाके दिसले. मी कातळ चढून वर येतो तो काय? साधूबाबाच्या आश्रमाचे ते अंगण होते. आश्रम कसला, त्याची शेणाने सारवलेली ती छोटी कुटीच. आमचा पहिला टप्पा आम्ही अंधारात गाठला होता. तिथे आम्ही पहिली विश्रांती घेण्यासाठी थांबलो. याठिकाणहून खरी चढाई सुरू होते. अंधारात दिड तास तरी लागणार? अस अंदाज होता. वनखात्याने याठिकाणी मजुरांकरिता तात्पूरता निवारा बनवलाय, शिवाय पश्चिम बाजुला काही ओटे बनवले आहेत, ज्यावर पर्यटकांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्याचा त्यांचा मनोदय असावा. परंतू तूर्तास काही ओटे मोडकळेले दिसले. 

आश्रमवजा झापापासून ओबडधोबड दगडांची पायवाट बनविण्यात आला आहे ती थेट कातळातल्या पायर्‍यांपर्यंत घेऊन जाते, तिथून वरच्या बाजुला कोठे तरी कातळात धोडपचा सर्वात आव्हानात्मक टप्पा लागेल अशी माझी कल्पना होती. त्यावर काही वर्षांपूर्वी वनखात्याने शिडी बसवल्याचे ऐकिवात होते. प्रत्यक्षात तो लोखंडाचा भला मोठा जीना आहे. दोन टप्प्यातला हा जीना तयार करण्यासाठी मोठाच खर्च आला असणार? मनात प्रश्न उभा राहिला, 'या जीन्याचे आयुर्मान किती असणार? उत्तर मिळाले, ज्या अधिकार्‍याने तो बांधला त्याच्या सेवा निवृत्ती पर्यंत टिकला तरी खुप काही मिळवलं!' ही उभी चढण पार करून आम्ही या जीन्यावर दुसरा विश्रांती अवकाश घेतला. हवेत भरपूर गारवा होता. चंद्रप्रकाश बर्‍यापैकी असल्याने रात्रीच्या भटकंतीचा भरपूर आनंद घेत आम्ही हळू हळू उंची गाठत होतो. धोडपच्या मुक्कामाच्या गुहेपर्यंत ही चढण अशीच कायम राहणार होती. 


मुक्कामाची गुहा किती दूर...

अनेक राजवटींचा साक्षीदार असलेला धोडपचा किल्ला आपल्या भग्नावशेषातही आपली ऐट दाखवित होता. अंधुक प्रकाशात एक एक तट, बुरूज पाहून, वाहऽऽ काय छान आहे, असे उद्‌गार निघत होते. 'मुक्कामाची गुहा आहे तरी किती दूर? असा प्रश्न सतत येत होता आणि त्यावर आमचे उत्तरही ठरलेले होते, आता फक्त पंधरा मिनीटे! 'यांचे पंधरा मिनीट केव्हा सरतील?' अशा सस्पेन्स सह नवखे गडी थकवा आणि अंधारात चालण्याचा आनंद घेत होते. थोड्याच वेळात कातळात घडविलेल्या जीन्याचा मार्ग दिसला...'आता बस थोडेसेच बाकी'. उर्दू भाषेतला शिलेलेख बॅटरीच्या प्रकाशात बघितल्यानंतर गडाचा मुख्य दरवाजा लागला. इथून आता कोठे? असा प्रश्‌न गार्गीने विचारला,  तेव्हा या दारातूनच, असे सांगितले. एवढ्या भितीदायक, अंधारातुन पुढे जायचे? या प्रश्नावर मग तिला बॅटरीच्या उजेडात रस्ता दाखवला. 

त्याठिकाणी चौकिदाराची उठबैस करण्याची जागा, पहारेकर्‍यांची शस्त्र आदी ठेवण्याची जागा बघून आम्ही त्या गुडूप अंधारी मार्गातून बाहेर पडलो. शेवटचा टप्पा हा नेहमीच कसोटी पाहणारा असतो. इथेही मुख्य दरवाजा ओलांडूनही अजून कशी मुक्कामाची गुहा येत नाही, अशा प्रश्नांनी महिला मंडळ चिंतीत झाले होते. एकदाचा धोडपचा सुळगा दृष्टीपथात आला आणि आता पाचच मिनीटात देवीच्या गुहेत पोहचणार, असे त्यांना सांगितले. गेल्या तास दिडतासापासून पंधरा मिनीटे, पंधरा मिनीटे ऐकून झाल्याने त्यांना मात्र इतक्या लवकर ही चाल संपेल असे अजिबात वाटत नव्हते. 


वरच्या टप्प्यावर बर्‍यापैकी सपाटी लागल्याने आम्ही झपाझप पावले उचलली. उजव्या हाताला बॅटरीच्या उजेडात एक एक गुहा बघत आम्ही पुढे सरकत होतो. 'यातली मुक्कामाची गुहा कोणती', हे गुपित मात्र अजूनही कायम होते. अंधारात दुरूनच गुहेतला उजेड आणि काही सावल्या बघून, आणखी कोणी तरी मुक्कामाला असल्याचे लक्षात आले. एकदाचे आम्ही देवीच्या गुहेपाशी येऊन थांबलो. धोडपला मुक्कामासाठी एैसपैस जागा असल्याने तशी चिंता नव्हती. परंतू एक चूक लक्षात आली. आम्ही छोटी गॅसची टाकी भरून घेऊ शकलो नव्हतो, त्यामुळा वाटेत लाकूडफाटा गोळा करायला हवा होता, परंतू दमछाक करणार्‍या चढाईमुळे त्याचे स्मरण कोणालाच राहिले नव्हते. 


लाकुडफाटा अत्यल्प...

'तुम्ही स्वयंपाकाची तयारी करा, आम्ही लाकूडफाटा घेऊन येतो', असे सांगून अजय व मी शोधमोहिमेवर निघालो. वाटेत दोन ठिकाणी उंदीर आडवे आले, त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही सुळक्याच्या मागच्या बाजुला येऊन पोहोचलो. या सपाटीवर सगळकडेच वाळलेले गवत असल्याने आम्ही वाड्याच्या अवशेषाच्या मागे पसरलेल्या जंगलात शिरलो. अंधारात पायाला सारखे काटे टोचत होतो, हा आखरा असल्याचे लक्षात येत होते, यातून वाट काढणे नव्हे तर अशक्यच, तेव्हा आखर्‍याची झुडपे टाळून आम्ही वाळलेल्या काटक्या शोधण्याचा प्रयत्न केला, परंतू तरीही आखर्‍याचे काटे पायांना टोचत होता. आम्हाला एकाही झाडाला वाळेली काटकी मिळाली नाही. सरपण गोळा करणारी मंडळी फांद्या तोडून ठेवतात व त्या वाळल्या की घेऊन जातात, त्यावर डल्ला मारण्याचा आमचा प्रयत्न सुरू होता. अखेरीस महत्प्रयासाने तो सफल ठरला. 

थोडाफार लाकुट फाटा मिळाला, परंतू अंधारात अंजयच्या पायाला काही तरी चावल्याची जाणिव झाली. त्याला सापाची शंका वाटत होती, परंतू पायाचे आवाज व गप्पा मारण्याच्या आवाजामुळे मला तशी शक्यता वाटत नव्हती. मी बॅटरीच्या उजेडात बघितले, तर वेदना होत असलेल्या ठिकाणी रक्ताचे थेंब नव्हे, मी त्याल हा आखर्‍याचाच प्रताप असल्याची हमी दिली. 


गार्गी आणि तिच्या मैत्रिणीचा हा पहिलाच मुक्कामी ट्रेक. चुलीवर स्वयंपाक करायचा, गुहेत मुक्काम करण्याच्या कल्पनेने त्या हरखून गेल्या होत्या. घरात कधीही कोरा चहा न घेणार्‍या 'त्यांनी' गुळ टाकलेला ग्रीन टी काय छान लागतोय! अशी पसंतीची मोहोर उमटवली. चहाचे घोट घेऊन महिला मंडळाने भाज्या चिरून मसाला खिचडीची व गुळाच्या शिर्‍याची तयारी केली. धोडपची गुहा मोठी प्रशस्त, गुहेच्या बाहेरच देवी मंदिराच्या तळाला पाण्याचे टाके आहे. याचे पाणी मोठे चविष्ट, परंतू गुहेतला अंतर्भाग कमालीची धुळीचा, त्यामुळे आम्ही गुहेबाहेर चांदण्या प्रकाशात भोजनाचा बेत हाणला. या ताज्या जेवणा सोबत अजयने छान मेथीचे धपाटे तर गार्गीने आजीकडून खास बनवू घेतलेले लोणचे आणले होते. जेवणाचा बेत फक्कड रंगला. 


सभोवतालची सर्व गावे विजेच्या लखलखाटात न्हाऊन निघाल्यासारखी भासत होती. रस्त्यांवरच्या दिव्यांच्या उभ्या आडव्या रेषा एक वेगळ्या प्रकारची नक्षी तयार करत होत्या. नजर जाईल तिथपर्यंत हे दिव्यांचे पुंजके दिसत होते. पश्चिमेला वणीच्या सप्तश्रृंगीगडाचा लखलखाट मोठा भारी दिसत होता, तर उत्तर दिशेला दिव्यांचा मोठा पुंजका म्हणजे कळवण. नैऋत्य दिशेला सुदूर पिंपळगाव बसवंत, ओझर, अडगाव ही मोठ्लया लोकवस्तीची गावे. 


एव्हाना थंडीने चांगला जोर धरला होता. भोजन पश्चात अर्धाधिक तास वेगवेगळे किस्से, हास्यविनोदात जात होते. उद्याचा दिवस डाईक व व्होल्कॅनिक प्लग म्हणजे नेमकं काय? ते बघण्यात त्याच प्रमाणे विविध राजवटीत तयार झालेले तट, माच्या, बुरूज, गुहा, पाण्याची टाकी, कातळातल्या पायर्‍या असे कितीतरी अवशेष बघण्याकरिता अनेक तास जाणार होते, त्यामुळे आम्ही लवकर झोपण्याच्या तयारीला लागलो. शिवाय अनेक छायाचित्रकारांनी टिपली ती आपली मंदाकिनी आकाशगंगा बघण्याकरिता मध्यरात्री उठायचे होते व सकाळचा सूर्योदय तर चुकवायचा नव्हता! 

(पूर्वार्ध)

--------------


https://www.facebook.com/SahyadriTrekkersBloggers/


Saturday, June 3, 2017

कुंभ येऊ घातलाय...तुमच्या मुलांना तयार ठेवा पवित्र डुबकी मारण्यासाठी!

आव्हानांची नवी व्याख्या करण्याची आवश्यकता नाही...आव्हान कशाला म्हणतात हे दाखवलं तरी पुरे! मुलांनी आव्हाने झेलावीत...ती पेलण्याची क्षमता विकसीत करावीत...जोखिम पत्कारणे म्हणजे नेमके काय? हे त्यांना दाखवून दिले तर ते तासनतास मोबाईलवर चिकटणार नाहीत...मोठमोठ्यांदा हॉर्न वाजवात आपल्या गाड्या हाकणार नाहीत...लहान सहान गोष्टींवरून हिंसक होणार नाहीत, जर त्यांना खर्‍या साहसाचा अर्थ समजला तर! हा अर्थ समजणार तरी कसा...शिक्षकांवर, पालकांवर, प्रशासनावर टिका करून? केवळ टिका केल्याने प्रश्न थोडीच सुटतात...ते तर तुमचे तुम्हालाच सोडवायचे आहेत...त्यासाठी आपल्या परिसरातल्या या काही ठळक गोष्टी...याचे तुम्ही भाग बना...मागे राहू नका...यश तुमच्या पासून दोन पावलेच दूर आहे!

- बंगल्यात राहणारे...फ्लॅटमध्ये राहणारे...चाळीत राहणारे...झोपडीत राहणारे...उच्चपदस्थ...हात मजुरी करणारे...अल्पशिक्षित...उच्चशिक्षीत सारे...सारे जण तयार रहा या कुंभात डुबकी घेण्यासाठी!

कसला कुंभ? कुठली डुबकी? प्रश्न पडला अेसल नाही? बरोबरच आहे...आम्हा नाशिककरांना एकच कुंभ ठाऊक आहे...तो म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा...तो तर नुकताच सरून गेलाय! मग आता हा कोणता नवा कुंभ?
तुमच्या मनात निर्माण झालेला गोंधळ दूर करण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करून सांगतो, हा कुंभच आहे फक्त १२ वर्षातून येणारा धार्मिक, आध्यात्मिक नाही...तरी पण हा कुंभच. कुंभ ही संकल्पनाच मुळात उर्जेशी, शुद्धीशी, दिशा देण्याशी...काही तरी मोठ्या स्वरूपात साजरे करण्याशी निगडीत आहे.

तुम्ही बघतच आहात...आपल्या आसपास काय चाललय आहे ते! धडाधड खुन पडताहेत...कुठे स्त्रियांच्या गळ्यातल्या सोन साखळ्या खेचल्या जाताहेत. आर्थिक फसवणूकी सुरूच आहे. पोलिस काय झोपलेत का? जनप्रतिनिधी काय उन्हाळ्याची सुट्टी घालविण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणची सैर करताहेत का? प्रशासकीय अधिकारी होरपळणार्‍या उन्हात वातानुकूलित कक्षात थंड हवेची मजा घेत आहेत का? एक ना अनेक प्रश्न लोक उपस्थित करत आहेत.

नाशिकच्याच मुंबईस्थित एका पोलिस अधिकार्‍याच्या तरण्या मुलाने तर चक्क आपल्या आईचीच हत्या केली. केवढी मनं सुन्न करणारी घटना. लग्नासाठी दोन दिवस पाहुण्याघरी आलेल्या शाळकरी मुलावर नाशिकरोड परिसरात सपासप वार करून ठार करून टाकण्यात आले. काय तर म्हणे गैरसमजूतीतून हा प्रकार घडला. तप्त उन्हा बरोबरच समाजात ही कोणती अंधाधूंदी सुरू झाली आहे?
या अंधाधुंदीत अधिकार्‍यांना, शासकीय खात्यांना टिकेचे लक्ष्य करणार आहोत का? सगळेच सरकारी अधिकारी, कर्मचारी सुस्तावलेले अजगर नाहीत, भ्रष्टाचाराच्या चिखलात माखलेले नाहीत, तेव्हा अगोदर आपल्याला आपल्यात डोकावून बघावं लागेल!
आपण आपल्या मुलांसाठी काय करतो? आपल्या म्हणजे स्वत:च्या किंवा कुटुंबातल्याच नव्हे तर ज्यांच्यावर आपण प्रेम करतो, ज्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये आस्था आहे किंवा ज्यांचा आपल्याशी अर्थाअर्थी संबंध नाही, परंतू जे या शहराचे रहिवाशी आहेत, त्यांना आपण योग्य दिशा देत आहोत का? त्यांना उत्तमरित्या गुंतवून ठेवत आहोत का, जेणे करून त्यांना नवनवी आव्हाने झेलायला मिळतील, जोखिमा पत्कारायला मिळेल. स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल!
नाशिक परिसरात काही संस्था, काही अधिकारी हे कार्य कर आहेत, अगदी इमानेतबार! म्हणूनच म्हंटलं, आपल्या मुलांना या कुंभात पवित्र डुबकी मारायला घेऊन येणार आहात का?
येऊ घातलेले पंधरा ते विस दिवस मुल्लांच्या सुट्ट्यांने अखेरचे दिवस. त्यानंतर शाळा, महाविद्यालये सुरू होतील. पावसालाही सुरूवात होईल. सुट्ट्यांच्या याशेवटच्या टप्प्यात नाशिकमध्ये काही महत्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत. त्यातील मुलांना डुबकी मारण्यासाठी घेऊन जाण्याचे काही प्रमुख कार्यक्रम बघू या!
यातला सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे वैनतेय गिर्यारोहण गिरीभ्रमण संस्थेने आयोजित केलेला माऊन्टन फिल्म फेस्टिव्हल.
नाशिकमध्ये माऊन्टन फिल्म फेस्टिव्हलचे हे तिसरे वर्ष आहे. भारतातील प्रसिद्ध असा हिमालयन क्लब वैनतेयवर या महोत्सवाची जबाबदारी सोपवली आहे. कॅनडातल्या अल्बर्टा प्रांतातले बांफ राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध अशा रॉकी पर्वतमालेतले काही महत्वाचे डोंगर यात समाविष्ट होतात. बर्फाळ डोंगर, उंचच उंच पर्वतकडे व खोल खोल दर्‍या, वेगवान पांढरे शुभ्र पाणी खळकळत नेणार्‍या वेगवान नद्या, दाट जंगले अशी निसर्गातली काही सर्वोच्च आव्हाने झेलत जगभरातले साहसविर आपल्यातल्या असाधारण कौशल्याला नवनव्या उंचीवर नेऊन ठेवतात. बांफच नव्हे, जगात आपआपल्या भागातले साहसवीर पर्वतारोहण, सायक्लिंग, माऊन्टन बायकिंग, पॅराग्लायडींग, पार्कोर, अल्ट्रा रनिंग, स्लॅक लायनिंग, जंगल भ्रमंती अशा एक ना अनेक विषयांवरील खर्‍या खुर्‍या साहसावर आधारलेले खरे खुरे चित्रपट बांफ चित्रपट महोत्सवाकरिता पाठवतात. त्यातून परिक्षक व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणारे पंचवीस निवडक चित्रपट जगाच्या प्रवासाकरिता निघतात. तो हा बांफ चित्रपट महोत्सव. खर्‍या खुर्‍या साहसावरचे खरे खुरे चित्रपट बघण्याची ही अपूर्व संधी. अवघ्या काही सेकंदांपासून ते तास दिड तासाचे सुद्धा काही चित्रपट असतात. अशा भन्नाट, डोक्याला गरगरून टाकणार्‍या या कलाबाजींचा हा महामेळा नाशिकमध्ये येत्या ३ जुनला अवतरणार आहे. हा कुंभ योग!
या पर्वणीत आपण डुबकी घ्यायची म्हणजे काय तर आपण स्वत: तो बघायल यायचं, सोबत आपल्या सगेसोयर्‍यांना, हितसंबंधिंना, इतकेच काय काही संबंध नसला तरी एक सामाजिक बांधिलकीने सुद्धा आपण लोकांना या महोत्सवाच्या निमीत्ताने जगातील सर्वोत्तम असे काही दाखविण्यासाठी घेऊन येऊ शकतात.
१९७६ साला पासून बांफ चित्रपट जगातल्या प्रमुख शहरात दाखविले जात आहेत. नाशिकला त्या मानाने अंमळ विलंब झाला, तरी आता तिसरे वर्ष असल्याने हा आता नाशिकचा वार्षिक सोहळा ठरू पाहत आहे. लोकही या महोत्सवाची आता आतूरतेने वाट बघत आहेत. ३ जुनला सायंकाळच्या सत्रात कालिदास कलामंदिरात भव्य अशा अल्ट्रा एचडी स्क्रिनवर उत्तम ध्वनीच्या सोबतीने तुम्ही बांफ चित्रपट महोत्सवाची रंगत अनूभवू शकता.
वैनतेयने यंदा त्यात आणखी भर टाकली, इंडियन माऊन्टन फिल्म फेस्टिव्हलची. भारतात सुद्धा अचाट, अफाट साहसाची काही कमी नाही. हे साहस कदाचित चित्रपटाच्या चौकटीत बसविण्याचे लोण आपल्याकडे अजून पसरलेले नाही, परंतू इंडिटन माऊन्टेनिअरींग फाऊन्डेशनचा हा पहिला प्रयत्न. त्यामुळे भारतीय भूमितल्या खर्‍या साहसावरचे चित्रपट या महोत्सवात ४ जुनला म्हणजे रविवारी सकाळच्या सत्रात बघायला मिळेल.
याशिवाय ३ जुनलाच नाशिकमध्ये राष्ट्रीय मोटरसायकल रॅलीची चौथी फेरी विल्होळीच्या परिसरात रंगणार आहे. देशातील उत्तमोत्तम दुचाकी चालक व स्कुटर चालक आपल्या थरारक ड्रायव्हिंगचे कसब पणाला लाऊन जेतेपदाकरिता झुंजताना दिसतील. सासळ्या डोंगराच्या दगड खाणींच्या परिसरात एबी इव्हेंट्‌सचा हा उपक्रम म्हणजे आपल्याकरिता कुंभातले दुसरे शाही स्नानच.
तिसरे शाही स्नानही लगेच, ५ जुनला होणार आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आपलं पर्यावरण संस्थेने वृक्षांच्या वाढदिवसाचा भव्य असा कार्यक्रम सातपुर जवळच्या फाशीच्या डोंगराच्या पायथ्याला आयोजित केला आहे. आपल्याला विदित असेलच, की तीन वर्षांपूर्वी हा डोंगर गिरीपुष्ट या एकमात्र विदेशी प्रजातीच्या झाडांनी व्यापला होता. आपलं पर्यावण संस्थेने संमिश्रवृक्ष प्रजातींचे रोपण करण्याचा मोठ कार्यक्रम आयोजित केला होता. सुमारे पाच हजार नागरिकांनी याठिकाणी येऊन वेगवेगळे वृक्षांचे रोपण केले होते. आपलं पर्यावरणने त्यानंतर सतत तीन वर्षे हे या वृक्षांची काळजी घेतली. परिसराचे कुंपण मजबुत केले, नियमीतपणे पाणी, छाटनी अशी तिन वर्षे अथक मेहनत घेतली. आज हे जंगल कसे बहरलेय! हे बघण्याचा हा योग.
या तिन शाही पर्वण्यांमध्ये सहभागी व्हा! मुलांना जरूर घेऊन जा. कारण त्यांना आव्हाने म्हणजे काय हे कळेल. काही वेळेला मुलांचा मार्ग चुकतो, संगत चुकते व मरण्या मारण्याला ते कचरत नाही. परंतू जाणारा जिवाशी गेल्यावर खरा खेळ सुरू होतो. त्याचे कुंटुंब तर प्रभावित होते, परंतू मारणार्‍याच्या कुटुंबाची अवस्था तिकीच बिकट होते. रागाचे, बदला घेण्याचे ते काही क्षण असतात, ज्यांचे ते सरत नाहीत, त्यांच्या हातून काहीतरी मोठं, अघटीत घडून जातं व परिणाम दोन्ही बाजुच्या लोकांना भोगावे लागतात; आयुष्यभरासाठी. बर्‍याचदा नंतर उमगते, आपण जन्म यासाठीच घेतला होता का?
आपल्या परिसरात चांगले काही घडत आहे तर त्याचा तुम्ही भाग बना. नव्या पिढीला तर त्याच्याशी जरूर जोडा, म्हणजे त्यांना कळेल, आयुष्याच खरं साहस हे रस्त्यावर वेडीवाकडी वाहने चालविण्यात नाही, लहान सहान गोष्टींवरून मारामारी करण्यात नाही. खरे साहस तर याहून वेगळा आहे, खुप मोठे आहे, हे त्यांना अशा कार्यक्रमातून समजू शकेल.
आव्हाने पेलायची तर या अफाट पसरलेल्या सह्याद्रीतल्या डोंगरात काही कमी नाही. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे कितीतरी पराक्रम या नाशिकभूमीत घडून गेलेत, त्या एक एक पराक्रमाच्या कथा त्यांना अवगत करून द्या. त्या धारातिर्थांच्या भेटी घडवा. वैनतेय सारख्या काही संस्था या सारखे उपक्रम वर्षभर राबवितात.
सायक्लिंग, दीर्घ पल्ल्याचे धावणे, पोहणे या क्षेत्रात नाशिकच्याच मंडळींनी केवढी मोठी झेप घेतली आहे. महाजन बंधूंनी जगातील सर्वात खडतर रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा पूर्ण केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आणखी चार वीर नाशिकमधून तयार झालेत. अम्मार मियाजी हा आयर्नमॅन पूर्ण करून आला. तीन-चारशे किलो मिटर सायकल चालविणार्‍यांचे जणू पिक नाशिकला आले आहे.

दीर्घ पल्ल्याच्या शर्यतीत नाशिककरांचा सहभाग शेकड्यांनी नव्हे तर हजारांनी वाढला आहे. पूर्वी नाशिकमध्ये औषधालाही न सापडणार्‍या मॅरेथॉन, लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांचे आता पिक आले आहे. जगातील सर्वात लांब पल्ल्याच्या पोहण्याच्या मुर्शिदाबाद येथील स्पर्धेत नाशिकची मंडळी सातत्याने सहभागी होत आहे. 
या अशा प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या व मुलांचे आयु्ष्य कायमचे घडविणार्‍या उपक्रमांकडे मुलांना वळविणे गरजेचे आहे, तसे नाही केले तर त्यांचे आयुष्य बिघडविणार्‍या अनेक गोष्टी सावज टिपण्यासाठी सज्जच आहेत. म्हणूनच या साहसाच्या या तिन पर्वण्यांमध्ये त्यांना डुबकी मारून आणा. मग बघा अशा कुंभांची त्यांना कशी चटक लागते ती.
बरं यातले सर्वच उपक्रम खर्चिक आहेत का? तर नाही. धावणे तर अगदी बिनखर्चिक. सायकल तर तुम्ही कोणतीही घेऊन तूमच्या क्षमता वाढवू शकतात व भल्या भल्यांना टक्कर देऊ शकतात. पोहणे म्हणाल तर ते एकदा नीट जमू लागले तर तुम्ही नैसर्गिक ठिकाणी तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली सराव करू शकतात व स्पर्धांमध्ये सहभाग घेऊ शकतात. 
यासाठी तुमची आर्थिक स्थिती, वय व शारिरीक क्षमता असा कुठलाही अडसर येऊ शकत नाही! होय! मी हे खात्रीपूर्वक सांगतोय. विश्वास नसेल बसत तर उत्तम जोशीचं उदाहरण बघा! नाशिक मुंबई सायकल शर्यत जिंकण्याचा त्याने भिम पराक्रम केला. कविता राऊत तर आदिवासी मुलगी आज तिने थेट ओशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेत पदके जिंकून ऑलिम्पिक गाठले. 
सेरेब्रल पाल्सी सारखा निम्म्याहून अधिक अपंगत्व असलेल्या आजाराने ग्रांसलेल्या हंसराज पाटीलने जलतरणातील सर्वोत्तम कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती पुरस्कार पटकायलाय. निट जेवत नाही व शरीर सुद्रुढ नाही, म्हणून आईने व्हॉलीबॉल खेळण्यासाठी पाठविलेली वैशाली फडतरे पुढे जाऊन भारतीय व्हॉलीबॉल संघाची कर्णधार बनली. या सारख्या कितीतरी यशोगाथा नाशिकमध्ये विपुलप्रमाणावर सापडतील. अशा कितीतरी जणांना फार सन्मानाच्या कायम स्वरूपी नोकर्‍या देखिल मिळाल्यात. तुम्ही बांफ चित्रपट महोत्सवातला पहिला चित्रपट बघा!, पुन्हा कधी कोणी, ' अपंग आहे...वृद्ध आहे', असं म्हंटलं तर तुम्ही त्याला जगातले सर्वोच्च आव्हान पेलणारे वीर आम्ही बघितलेत, नका गाऊ ते रडगाणे', असे म्हणाल! नाशिककरांना उर्जा देणारा, तरूणाईला दिशा देणारा, भरकटलेल्यांना, खर्‍या आव्हानांची जाणिव करून देणारा हा जुन महिन्यातला कुंभयोग! तो साधण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा!!
(सर्व छायाचित्रे बांफ सेंटरच्या सौजन्याने)