Sunday, May 12, 2019

सुक्ष्म सिंचन: बिनखर्चाची जलक्रांती

सुक्ष्म सिंचन...काळाचा पडदा बाजूला सारून जगवा
बिनखर्चाची जलक्रांती
तु्म्हाला ठाऊक आहे का, तुम्हाला हवे असलेले पाणी तुम्ही खुप सोप्या पद्धतीने मिळवू शकता! कुठल्याही जटिल तंत्रज्ञानाचा वापर न करता! कुठल्याही मोठमोठ्या यंत्रणांची मदत न घेता!
या लेखात वाचा: आयुष्यभरासाठी उपयुक्त ठरेल असे जलसिंचन, त्यासाठी करावे लागणारे उपाय हे जवळपास फुकटच आहेत. सुरूवातीला मेहेनत आहे. तुमच्या वेळेतला एखादा टक्काच वेळ खर्च होईल पण नंतर तेही आवश्यक राहणार नाही. हा उपाय खात्रीशीर आणि दीर्घकालीक असेल!

जलसंकट? अखिल मानवजाती समोर उभी ठाकलेली ही समस्या; प्रत्येक वर्षी अधिकाधिक बिकट बनत जाणारी आहे. ''पावसाचे पाणी अडवायचे, त्याकरिता लहान, मध्यम व मोठी धरणे बांधायची. तलावात, तळ्यात, टाक्यात पाणी साठवायचे'', माणूस बर्‍याच काळापासून हे उपाय करत आला आहे, असे केल्याने जलसंकट कधी थांबले आहे का? मोठे किंवा छोटे, सगळेच कृत्रिम जलसाठे गेल्या काही वर्षांपासून कोरडे पडत आहेत. पाऊस कमी किंवा अनियमीत झाला तर या साठ्यात पाणी येणार कुठून? आणि समजा पडलाच तरी जितका पडतो त्याच्या पाच टक्के पाणी सुद्धा कृत्रिमपणे साठवणूक केले जाऊ शकत नाही, इतकी अफाट गरज माणसाची आहे. धरणे दर पावसात वाहून येणार्‍या गाळाने भरत आहेत तशी त्यांची पाणी साठवण क्षमता कमी कमी झाली आहे. हा गाळ उपसण्याचे जेवढे म्हणून प्रयत्न झालेत ते अल्पजीवी ठरले; कारण गाळ काढणे अव्यवहार्य आहे. 'मोफत गाळ घेऊन जा, शेतजमिन सुपिक बनवा', अशा घोषणा केल्यानंतरही गाळ खोदून काढणे व त्याची वाहतूक करून तो पसरविणे याबाबी अव्यवहार्य ठरल्याने या योजनेला फार अल्प प्रतिसाद मिळाला. तोही काही काळा पूरताच.

यंदाच्या वर्षी महाराष्ट्रासमोर जे जल संकट उभे राहिले आहे ते १९७२च्या दुष्काळापेक्षाही भिषण आहे. फरक इतकाच आहे की, ७२च्या दुष्काळाच्या वेळी खायला अन्न नव्हते, ती स्थिती यावेळी नाही. ७२च्या दुष्काळापेक्षा यंदाचा दुष्काळ आणखी एका कारणासाठी वेगळा आहे, त्यावेळेला पाणी वाहून नेण्याची साधने मर्यादीत होती, यंदा त्यात बरीच सुधारणा झाली आहे. ७२च्या दुष्काळात विहीरींना पाणी होते, यंदा विहीरींनी तळ गाठले आहे, ही चिंतेची बाब.
तोरणमाळ: मोठाली झाडे तोडलीत. खुरट्या झाडांचेच साम्राज्य...पाणी कसे टिकणार?

दुष्काळावर मात करण्यासाठी महाराष्ट्रात अलिकडच्या काळात जलयूक्त शिवार अभियान, वॉटर कप स्पर्धा अशा विविध उपक्रमांनी जोर धरलेला दिसतो, यात गाव परिसरातील नद्या, तलाव, तळी टाकी यातला गाळ काढणे, नव्याने जमिन खोल खोदून घेणे ज्या योगे पावसाचे पाणी जास्त प्रमाणावर साठून राहील. काही ठिकाणी पाणी साठविण्यासाठी बांधही घातले जात आहेत. हजारो हात याकरिता झटत आहेत. सर्वसामान्यांपासून ते महत्वाचे, अती महत्वाचे व्यक्ती, शेतकरी, मजूर अशा अनेकांच्या सहभागातून जलसंकटावर मात करण्याची लढाई गेल्या तीन चार वर्षांपासून महाराष्ट्रात वेग घेत आहे. अल्पावधीत काही गावांना त्यामुळे पाणी मिळू लागले आहे.

जलयुक्त, वॉटर कपची कामे अशीस अखंडपणे सुरू राहो! त्याने होईल तर तो फायदाच. या दोन योजनांच्या पुढचे काय? जलक्रातीतले हे घटकमात्र आहेत. आपली पाण्याची गरज याहून कितीतरी अधिक आहे. विशेष करून शेती क्षेत्राचा विचार केला तर या उपाययोजना पुर्‍या पडणार नाहीत. शेती आणि जंगल या दोन अत्यंत महत्वाच्या घटकांसाठी पाण्याचा वेगळा विचार करावा लागणार आहे.

जमिनीवर पडणार्‍या पावसापैकी ७० टक्के पाणी समुद्रात तर ३० टक्के जमिनीवर पडते. या ३० टक्क्यांपैकी सुमारे २८ टक्के पाणी हे गोठलेल्या स्थितीत असल्यामुळे किंवा समुद्रात वाहून जात असल्यामुळे माणसासाठी सहजासहजी उपलब्ध होत नाही. 'पृथ्वीवरच्या अखिल मानव जातीला रोजच्या वापरासाठी केवळ २ टक्केच पाणी उपलब्ध आहे', अशी अभ्यासकांची निरीक्षणे उपलब्ध आहेत.

प्रभावी जलक्रांतीसाठी माणसाने बांध बांधणे, कृत्रिम जलसाठ्यांतले गाळ काढणे हे फार प्रभावी उपाय नाहीत कारण यात उर्जा, मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर खर्च होणार आहे. त्यासाठी पैसाही लागणार आहे. (जगभरातले जलतज्ज्ञ धरण, नद्यातला गाळ उपसणे हा अव्यवहार्य व पुरा न पडणारा म्हणून त्यास त्याज्य मानत असले तरी काही ठिकाणी मोठ्या कष्टाने गाळ उपसल्याने पाण्याची साठवणूक सोपी झाली आहे, एक मात्र खरे ती मोठ्या प्रमाणावर यशस्वी ठरलेली नाही. याचा अर्थ हे उपाय बंद करावे असे मुळीच नाही. ज्याने त्याने यथा मती, यथा शक्ती हे प्रयोग करीत रहावे, ते करताना एक काळजी घ्यावी लागेल ती म्हणजे नद्या, तळी, टाकी प्रमाणापेक्षा जास्त खोल करून चालणार नाही, अन्यथा पावसाळ्यानंतर भूगर्भातले पाणी नद्यात येऊन त्यांचे बाष्पीभवन होण्याचा धोका राहील. शिवाय पाणलोटाच्या वरच्या विहरी व शेतीवर त्याचा परिणाम होईल.)

यशाचा मार्ग मोठ्या अडचणींतूनच जातो, घोर तपश्चर्येतूनच यश साध्य केले जाऊ शकते असे अजिबात नाही, त्याच्या काही वाटा सोप्या, सहज साध्यही असतात...तुम्ही त्याकडे डोळसपणे बघण्याची आवश्यकता असते. सुक्ष्म जलसिंचन हे त्यातलेच.
घोरवड: वडाची उंचच उंच झाडे राखलीत. या पालापाचोळ्याखाली जमिनीत पाणी मुरविण्याचे नैसर्गिक कारखाने.


आपला देश फार मोठ्या प्रमाणावर मोसमी पाण्यावर अवलंबून आहे. आपल्याकडे पावसाच्या पाण्यावरचे पिक हे सगळ्यात महत्वाचे मानले गेले आहे.  मोठी धरणे, बंधार्‍यांच्या सहाय्याने आपण केवळ दहा पाच टक्का पाणी कृत्रिमरित्या साठवून ठेवू शकतो. त्याने केवळ पिण्याच्या आणि दैनंदिन वापरासाठी लागणार्‍या पाण्याची काही अंशी गरज भासू शकते, ती देखिल सर्व प्रदेशाची पाण्याची समान गरज भागवू शकत नाही. शेती आणि जंगल या साठी लागणार्‍या पाण्याचे काय? पाऊस आणि पर्यावरण समतोल त्यावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. जमिनीवर पडणार्‍या पावसापैकी फार मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते व फार थोड्या प्रमाणात जमिनीत मुरते. सातत्याने खालावत चाललेल्या भूजलस्तरामागचे हे एक महत्वाचे कारण आहे. अर्थात वाढलेली जनसंख्या, पाणी वापर करणारे मोठे उद्योग, जास्त पाणी लागणारी पिके आणि उद्योगधंदे ही देखिल कारणष आहेच.

रासायनिक शेती, बेसूमार वृक्षतोड, शहरे व गावात सर्वत्र पसरलेले पक्क्या रस्त्यांचे जाळे, या मुळे जमिनीत मुरणार्‍या पाण्याचे प्रमाण हे वाहून जाणार्‍या पाण्यापेक्षा कितीतरी पट कमी झाले आहे. जास्त पाऊस झाला की, नद्यां, नाल्यांना मोठमोठे पूर येऊ लागलेत, आजवर कधीही नव्हते इतके मोठे पूर अलिकडच्या काही वर्षात बघायला मिळाले. याचे कारणच जमिनीत पाणी मुरविणारी नैसर्गिक यंत्रणा माणसाने आपल्याच हातून मारून टाकली.

पाणी मुरवायचे कसे?
कुठल्याही साधनांचा व फार मोठ्या मनुष्यशक्ती शिवाय इतके अफाट पाणी जमिनीत मुरवायचे कसे? नैसर्गिक पद्धतीने? ज्याकरिता ना मोठ्या यंत्रांची ना यंत्रणांची गरज भासेल, असे काही आहे का? सुक्ष्मसिंचन म्हणजे काय?
सुक्ष्मसिंचनात सगळेच घटक नैसर्गिक आहेत! मग ते आणायचे कुठून? त्यासाठी काय करायचे. किती खर्च येणार?
जमिनीच्या जलस्तराचा विचार करताना वरील प्रश्न सतावतात, त्यावर मग जमिनीच्या जलाचे पुनर्भरण करण्याचा विचार पुढे आला. त्याकरिता नव्या इमारती बांधताना घराच्या छपरावरचे पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्याची यंत्रणा असेल तरच बांधकाम पूर्णत्व द्यायचे असे नियम आले.
काही गावांनी व  वनखात्याने आपआपल्या हद्दीत जमिनीला चर घातले, खड्डे खोदले. अटकळ ही की, पावसाचे पाणी उतारावरून वाहताने या चरात समावून जमिनीत मुरेल. खड्ड्यात पावसाचे पाणी साठूत ते सरतेशेवटी जमिनीच्या पोटात जाईल.
कमळगड: 'गर्द झाडी', जावळीच्या खोर्‍याचे हे पूर्वपार वैशिष्ट्य. हल्ली पंधरा ते वीस टक्केच गर्द झाडीं शिल्लक.

सु्क्ष्मसिंचनासाठी
सु्क्ष्मसिंचनासाठी कुठेही दूरवर जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या परिसरातच ते तुम्हाला करायचे आहे. झाडाखाली जो पालापचोळा पडतो ते सुक्ष्मसिंचनाचे कारखाने आहेत. त्याची ताकद बघा! जमिनीवर जो पाला पाचोळा पडलेला असतो त्याला हलवले नाही तर त्याखाली उन्हातही आद्रता राहते. हाच पाला पाचोळा झाडाखाली असेल तर तिथे त्याला सावली मिळते व झाडीच्या सोबतीने जमिनीच्या वरच्या थरातले पर्यावरण अबाधित राहते. जमिनीत ह्यूमस तयार होतो तसे एक ग्रॅम मातीत सुमारे ३३ कोटी जिवाणूंचे चलनवलन होते असा या क्षेत्रातल्या अभ्यासकांचे निष्कर्ष आहेत. या जिवाणूंच्या नित्य क्रीयांमुळे जमिनीला सुपिकता येते, जमिनीत त्यामुळे पाणी मुरायला होते. पावसाचे पाणी त्यातून जमिनीच्या आत जाते. जमिन कडक न राहतो भूसभूशीत राहते, त्यामुळे त्यातून पाणी तर मुरतेच, पण ती जास्त काळ ओली राहते, जमिन जास्त पाणी धरून ठेवते. झाडांच्या मुळ्या देखिल पाणी वाहून जाण्यास अवरोध निर्माण करतात व त्याही सतत पाणी मुरविण्यास मदत करतात. अशा ओल्या जमिनीत मग गांडूळासारखे जीव तयार होतात, तसे ते जमिनीत खोलवर जाऊन खड्डे करतात, माती सुपिक करण्याबरोबरच पाणी मुरविणारे छिद्र अहोरात्र तयार करत राहतात.

झाले काय की, बेसूमार वृक्षतोड, पाश्चात्य शेती पद्धती यामुळे आपण आपल्या हातून नैसर्गिकपणे सुरू असलेली नैसर्गिक जलसिंचनाची साखळी पिढी दर पिढी तोडली गेलो. अन्न सुरक्षा प्रदान करताना हरितक्रांतीने जमिनीच्या पर्यावरणाचे अतोनात नुकसान केले. त्यावर सुरूवातीच्या काळात व्यवस्थितपणे अभ्यास झाला नाही, पिक येतेय, म्हणून त्याकडे दुर्लक्ष झाले.
ज्याला त्याला जास्तीत जास्त उत्पन्न हवे होते. त्यासाठी वाणांचे संकर विकसीत केले गेले. त्यातून कमकूवत वाणांची पिढी येत राहीली ती विविध रोगांचा मुकाबला करण्यास सक्षम नव्हती. त्यावर नी किडींवर फावरण्यासाठी रासायनिक औषध कंपन्या सरसावल्या. त्यातून उत्प्नाची हमी मिळाली, पण जमिनीचे आरोग्य बिघडत गेले. जमिनीच्या वरच्या थराच्या पर्यावरणाचे नुकसान गुणाकार पद्धतीने वाढत गेले. सुक्ष्मसिंचन करणारी सुक्ष्म जिवाणूंची अफाट हानी अगोदर वरच्या थरात आणि मग जमिनीच्या खालच्या थरात झाली तशी भूजलपातळीत घट होत राहीली.
पूर्वी विहीरींना वर्षभर पाणी रहायचे. आता दोन, अशीचशे, तीनशे फुटाच्या विंधन विहीरींना देखिल पाणी लागत नाही. काही ठिकाणी हजार, बाराशे फुटाचे बोर घेतले गेलेत, त्यांनाही पाणी नाही.
कोळेश्वर:  पठारावर वनसंपदा कमी वहिवाट व मनुष्यवस्ती असल्याने  टिककून पण त्याला वणव्यांचा धोका आहेच.

यावर काही उपाय आहे का?
- यावर शंभरटक्के शाश्वत व कमी खर्चाचा उपाय आहे. हा बिनखर्चाचा, थोड्याशा मेहनतीचा व आयुष्यभर पूरू शकेल असा हा उपाय असेल.

सुक्ष्म जलसिंचन कशा पद्धतीने करायचे? कुठल्या संस्थेची मदत घ्यायची? सरकारी मदत कशा पद्धतीने घ्यायची?
- एव्हाना तुमच्या लक्षात आले असेल नैसर्गिक पद्धतीचे जलसिंचन हेच सूक्ष्म जलसिंचन आहे. त्यात झाडांची भूमिका अनन्यसाधारण महत्वाची आहे.
आज उपलब्ध असलेल्या झाडांच्या मदतीने ते करता येईल. दैनंदिन गरजेच्या किती पट पाणी, मुरवायचे, वेगवेगळ्या भूस्तरात त्याचे प्रमाण वेगवेगळे राहील हे त्याकरिता ध्यानात घ्यावे लागेल. किती झाडे असतील तर किती पाणी मुरेल, किती क्षेत्रातल्या नैसर्गिक शेती पद्धतीने पाणी मुरण पुरेशी ठरेल हे वेगवेगळ्या ठिकाणांसाठी वेगवेगळी सूत्रे लागू पडतील. यासाठी सरकारच्या मदतीवर विसंबून राहून चालणार नाही. त्याकडे आर्थिक देवाण घेवाणी करतात तशा दृष्टीकोनातून बघून चालणार नाही. सरकारे किंवा कुठल्या संस्था त्याकरिता पुढे येऊ शकतील की नाही ठाऊक नाही. पहिल्या प्रथम तुमचे तुम्हीच काम सुरू करावे लागेल. पाणी हा प्रश्न तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा आहे, त्यामुळे सामुहीक प्रयत्नातून, विषयाची निकड ओळखून सगळ्यांना या ना त्या प्रकारे या कार्यात झोकून द्यावे लागणार आहे. तसे नाही केले तर पाण्यावाचून नामांकीत वसाहती, गावे किंबहूना शहरातील लोकांवर स्थलांतराची वेळ येऊ शकेल. २०१९च्या दुष्काळी परिस्थितीने तसे संकेत दिले आहेत.

हे अगदी खरे आहे की, तुम्हाला फुकटाच्या जलसिंचनासाठी झाडांची आवश्यकता आहे. बहूतांशी ठिकाणी झाडे नाहीत. जिथे आहेत, तिथे आपल्याला हवे त्या प्रकारचे जलसिंचन होत असेलच असे नाही. आपल्याला काम तर करायचे आहे आणि त्याचे मोजमापही ठेवायचे आहे. त्यासाठी आपण सुरूवातीला, 'माणशी दहा झाडे', असे उद्दीष्ट ठेवू या.
कोळेश्वर: डोंगरमाथ्यावर पालापोचाळा सदैदित पडलेला, माणसाचा हस्तक्षेप कमी, भरपूर पाणी येथे जमिनीत मुरते.

झाडांच्याशिवाय तुम्हाला पाणी मिळणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ आहे तेव्हा प्रत्येकाने दहा झाडे लावायची आणि त्यांचे पुढील पाच वर्षांसाठी संगोपन करायचे किंवा दहा झाडे निवडून त्याखाली सुक्ष्म सिंचनाचे उपाय राबवायचे. ही कामे एकट्या दुकट्याने न करता समुहाने करायची आहे. म्हणजे गाव पातळीवर, वस्ती पातळीवर, पंचक्रोशीच्या पातळीवर. 'पुढच्या पाच वर्षात आपल्या भागातले पाणी आपल्याला साठवाचे आहे, त्यासाठी आपल्याला सुक्ष्मजलसिंचनाचा आधार घ्यायचा आहे', या मुद्दयावर एक बैठक बोलावून सगळ्यांने हा प्रकार लोकांना समजून सांगायचा आहे. यात अस्तित्वात असलेली झाडे आणि नव्याने लागवड करायची झाडे असे दोन भाग असतील.

आज घडीला उभ्या असलेल्या झाडांखाली महिन्या पंधरा दिवसात एकदा पाला पाचोळी झाडलोट करून झाडाच्या घेर्‍यात ढकलून द्यायचा, त्यावर गाईचे शेण, गोमुत्र आणि गुळ (१+१+पावकिलो) या प्रमाणात ७२ तास १० लिटर पाण्यात मुरवून ते गाळून घ्यायचे. त्यात चार पट पाणी टाकून तयार होणारे जीवामृत झाडाखालच्या पाला पोचोळ्यावर शिंपडायचे. झाडांवर सुद्धा जमल्यास फवारायचे जेणे करून रोग, किडीवर ते उपयोगी ठरू शकेल. किड, रोग असेल तर दशपर्णी अर्क सुद्धा फवारला जाऊ शकतो.

तुम्ही संगोपनासाठी निवड केलेले झाड जंगलातले असेल तर त्यावर किडनाशकांच्या फवारणीची कसरत करायची गरज नाही, बांधावर, घराच्या जवळ किंवा गावाच्या जवळ असलेल्या झाडांवरच दशपर्णी अर्क फवारावे. आवड असल्यास जंगलात व डोंगरावर सुद्धा किड नियंत्रणासाठी हा उपाय केला जाऊ शकतो, तथापी जंगलात झाडांना सहसा फार मोठा किडीची प्रादूर्भाव आढळत नाही, असला तरी समिश्र पद्धतीची झाडे असतील तर त्याचे नियंत्रण निसर्गत: आपोआप होते, फक्त त्यासाठी काही काळ जावा लागतो. जिथे एकाच पद्धतीची झाडे लावली आहेत तिथे मात्र एखाद्या रोगरार्ईच्या सपाट्यात जंगलच्या जंगल बांधित झाली आहेत. (यंदाच्या वर्षी अती विषारी म्हणून ओळखल्या जाणार्‍या ग्लिरिसीडीया या वनखात्याच्या आवडत्या झाडांवर फार मोठ्या प्रदेशात रोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे बघायला मिळाले.)

झाडाखालच्या पालापाचोळ्यावर जीवामृत पाण्याची सुरूवातीला दोनदा पंधरा दिवसांनी, नंतर महिन्यातून एकदा व नंतर तीन महिन्यांनी एकदा अशा स्वरूपात केलेली शिंपण आदर्शवत राहील. एका छोट्या झाडासाठी एक पेला इतके. पाच वर्षांनंतर याची काहीच आवश्यकता राहणार नाही.
कोळेश्वर: ऐन एप्रिलच्या महिन्यात इथल्या जमिनीचे जलस्तर सुद्रुढ.  सहा वस्त्यांना पाण्याचा असा वाहता प्रवाह उपलब्ध
सुक्ष्म जलसिंचनाचा दुसरा टप्पा अतिशय मत्वाचा आहे, यात तुम्हाला झाडे लावायची आहे. जमल्यास रोपे तयार करावी किंवा बीजरोपण करावे. बीज रोजण जास्त फायद्याचे. ज्या बिया वापरणार त्यांना हलक्या हातांनी अगोदर सांगितलेल्या जीवामृतात घोळून दुसर्‍या दिवशी या बिया, कोयी जमिनीत रोवायच्या. (बिया गोळा करणार असाल तर त्या सावलीत वाळविणे व माठात राख टाकून त्यात संरक्षित करणे).
साधारण बी किंवा कोय मावेल इतका अल्पशा आकाराचा खड्डा करून घ्यावा. फार मोठे खड्डे करण्यात वेळ व श्रम वाया घालवू नका.

तुमच्या समोर दहा झाडा लावण्याचे उद्दीष्ट आहे. सुरूवातीला पहिले तीन महिने आठवड्यातून एकदा पाणी टाकावे. तीन महिन्यानंतर या झाडांच्या घेर्‍याच्या बाहेर पाण्याची बाटली उपडी करून त्याला खाली लहान छिद्र करून त्यात सुतळी किंवा कपड्याची चिंधी लावावी. ही सु्क्ष्म झिरपण या झाडांना जिवंत ठेवण्याचे काम करील. झाड जसजसे मोठे होईल तसतशी त्याची नियमीतपणे छाटणी करावी. छाटणीचे प्रमाण झाडाच्या आकाराच्या दहा टक्क्यांच्या आतच असावे. छाटणीमुळे झाडे अधिक जामाने वाढतात. छाटणी केलेली पाने, काड्या त्याच्या बुंध्याच्या भोवती पसराव्यात व आसपासचे गवत, काडी कचरा त्याभोवती पंधरा दिवसातून एकदा झाडलोट करून गोळा करून ठेवावा. प्रसंगी पाणी द्यायला जमले नाही तरी या पालापोचोळ्यामुळे झाड पाण्याअभावी मरण्यापासून बचावते.

जिथे बाटली नसेल तिथे निरूपयोगी किंवा फु्टक्या लहान माठांचा वापर केला जाऊ शकतो. झाकणबंद डबे असतील तर त्यांतूनही सुतळी जमिनीवर सोडली तर त्याने पाणी थिबकत राहून सुरूवातीच्या काळात झाडासाठी आवश्यक असलेले पाणी कमी मेहेनतीत दिले जाऊ शकते.

कोरड्या पालापोचाळ्यात दव शोषून घेण्याची क्षमता असेत. त्यात निर्माण होणारे काही जिवाणू झाडांकरिता आवश्यक नायट्रोजन आदी घटक पुरविण्याचे काम करतात. त्यासाठी झाडाखालच्या सृष्टीला चालना देण्यासाठी हे उपाय अतिशय महत्वाचे आहेत.

तसे बघितले तर माणशी दहा झाडे लावायचे आणि त्याची पाच वर्षे देखभाल ठेवायची तर त्यासाठी तसा खर्च काहीच येणार नाही. तुम्ही राहतात त्याठिकाणापासून सुरूवात करावी. तिथून पुढच्या टप्यांवर झाडे लावण्यासाठी जागा निवडत तुमच्या निवासाच्या किंवा शेताच्या चौफेर सुक्ष्म जलसिंचनाचे कारखाने तुम्हाला वसवायचे आहेत म्हणजे तुमच्या वस्तीच्या फार मोठ्या परिसरात पाणी मुरेल तसे आसपासच्या जलस्त्रोतांना आणि शेतीला त्याचा लाभ होईल.
तांबोळ्या: बागलाणातले हे एक प्रातिनिधीक चित्र. कुठेच झाडी शिल्लक नाही. सारे काही निष्पर्ण.

कोवळी झाडे जनावरे खाऊन फस्त करू शकतात. जोराच्या वार्‍यात झाडे उखडू शकतात त्याकरिता उपयोगात नसलेल्या काठ्या, बांबू, गज, तारा, बल्ल्या ते अगदी प्लास्टिकचे पाईक असा कशाचाही वापर केला जाऊ शकतो. त्याला वापरात नसलेले कापड गुंडाळले (जसे वापरात नसलेल्या साड्या, बारदान, निरूपयोगी पोती इत्यादी. त्यामुळे बकर्‍या, गाई आदी गुरांपासून त्यांचे रक्षण करता येईल. हे झाड रक्षक साडे पाच फुटांचे तरी असावे. अर्धा फुट जमिनीत गाडल्यानंतर ते पाच फुट उभे रहावे.

वृक्षपंचायत
तुम्हाला तुमच्या वस्ती पातळीवर, गाव पातळीवर, पंचक्रोशीत संपुर्णपणे कुर्‍हाडबंदी करावी लागेल. 'कुर्‍हाड आली की पाणी गेले', त्यामुळे कुठे नियम करून, कुठे आणाभाका घेऊन तर कुठे देवाच्या नावाने किंवा समाजातील थोर पुरूषांच्या नावाने आव्हान करून शंभर टक्के वृक्षतोड बंदीचा निर्णय अवलंबिणे व प्रसंगी याचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करावी. याकरिता गाव पातळीवर वृक्षपंचायतीचे गठन करावे. त्यात सरपंच, विविध जाती समुहाचे सर्व वयोगटाचे प्रतिनिधी यांची निवड करावी. दर दोन किंवा तीन वर्षांसाठी हे मानाचे पद असावे. या समितीने आपल्या भागातील वृक्षांची गणना करून त्यावर देखरेख ठेवण्याचे काम करावे. सर्व प्रकारची झाडांची छाटणी, फांद्या तोडणे, काटक्या गोळा करणे यासारखी कामे वृक्षपंचायती मार्फत केली जावीत. त्यावर देखरेख ठेऊन त्याचे सर्पण, कुंपण आदी कांमांसाठी लोकांना उपलब्ध करून द्यावे. त्याकरिता शक्यतो कोणतीही रक्कम आकारू नये. ज्यांनी मागणी केली असेल त्यांना मोफत उपलब्ध करून द्यावेत.

गावात डोंगरदेव, होळी आदी झाडे जाळण्यासंबंधीचे उत्सव असतील तर मोठे झाड कापून ते जाळण्यावर पूर्ण प्रतिबंध करावा, त्याऐवजी वृक्ष पंचायतीने छाटणी केलेल्या झाडाच्या काटक्या, गवत किंवा गोवर्‍यांचा वापर करावा.
मार्कंडेय:  काही भागात अजूनही झाडी टिकून आहे. त्यामुळे या उंबरातून वर्षभर पाणी असे सतत झिरपते.

गावात धार्मिक उत्सव असेल किंवा विवाह आदी समारंभासाठी मंडप बांधताना झाड तोडून त्याच्या बल्ल्या वापरण्याची पद्धत असेल तर त्या वापरण्यावर शंभरटक्के प्रतिबंध करावा. गावची गरज भागविण्यासाठी गरजेनूसार काही बांबूची बेटाची लागवड करावी. तीन वर्षात पन्नास ते सत्तर फुटांपर्यंत बांबू वाढतो, त्याचा वापर मांडव आदी कामांसाठी करावा, तसेच टोपल्या, पाट्या, सुपं, गोठ्यांचे, घरांचे छप्पर आदी कामांसाठी तीन वर्ष पूर्ण झालेल्या बांबुवर धूराची अथवा वाहत्या पाण्यात आठवडाभर भिजविण्याची प्रक्रिया करावी म्हणजे असा बंबू दीर्घ काळ टिकेल व त्याला सहजासहजी किड लागणार नाही.

गावाने स्वत:च्या वापराकरिता बांबु लागवड केले तर त्याच्या तोडण्यास कायद्याने बंदी नसल्याने मुक्तपणाने त्याचा रोजच्या गरजांसाठी वापर करता येईल.

''संपूर्ण कुर्‍हाडबंदी, नव्या वृक्षांचे रोपण, त्यांची देखभाल, जीवामृताची नियमीत शिंपडण आणि नानाविविध प्रजातीची झाडे'', अवघ्या पाच वर्षांच्या कालावधीत तुमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणावर तुम्ही सुक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाणी तुमच्या गावाच्या आसपास जमिनीपासून अगदी जवळ उपलब्ध केलेले असेल. याने नद्या, झरे, ओहळी जास्त काळ प्रवाही राहतील शिवाय विहीरींना पाणी राहील, हापशांना पाणी मिळेल. कृत्रिम पद्धतीने धरण, बंधारे, तळी, टाक्यांच्या तुलनेत हा उपाय शाश्वत व कायमस्वरूपी उपयोगाचा.

काही डोंगरपठारावरची गावे व शहरे असतील तर तिथे पाणी टिकत नाही अशा ठिकाणी स्वत:च्या उपयोगापूरते जलसाठे निर्माण करावे लागतील पण त्यासाठी वृक्षारोपण आणि सुक्ष्मजलसिंचन या सारख्या उपायांना फाटा देऊन चालणार नाही, कारण तुमच्या प्रयत्नांमुळे खालच्या भागात पाणी पोहोचणार आहे. झरे, ओहळी, नद्यांवर आसपासचे दगड गोळा करून त्यांचे बांध घालावे. त्याला सिमेंट कॉंक्रिट लावण्याची कोणतीच आवश्यकता नाही. नुसती माती दाबून टाकावी. कालांतराने या बांधाच्या भेगात माती बसेल तशी वाहते पाणी थोपवून धरण्याची क्षमता वाढेल. शिवाय पाण्याचा स्त्रोत प्रवाही राहील, तो दुषित होण्याचा धोका राहणार नाही. खालच्या उताराच्या ठिकाणी त्याचा लाभ होईल. याकरिता पायथ्या पासून माथा अशा क्रमाने कच्चे बांध आणि वृक्षारोपण करण्याची आवश्यकता आहे जेणेकरून डोंगराच्या पायथ्याला त्याचा लाभ मिळेल.
मार्कंडेय: प्राचीन रामतीर्थाला वर्षभर शुद्ध पाणी राहते.

याच्या दुसर्‍या लाभाकडे तुम्हाला लक्ष द्यायला हवे. झाडांमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर फळबहार उपलब्ध होईल जो तुम्हाला व तुमच्या मुलाबाळांना अतीशय उच्च दर्जाचे अन्नस्त्रोत म्हणून अगदी फुकटच उपलब्ध होईल. वृक्ष पंचायतीमार्फत फळबहार काढून त्याची गाव पातळीवर प्रत्येकाला वाटणी करता येईल व अतिरीक्त बहार विक्री करून त्याने वृक्ष व जलसंधारणासाठी काही प्रमाणावर निधी उपलब्ध करता येईल. काही औधषी महत्वाच्या झाडांचा पाला, फुले, फळे, शेंगा, साली यांची आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधने बनविणार्‍या उत्पादकांना विक्री करता येईल. हे करताना झाडांना कायमस्वरूपी इजा होणार नाही याची काळजी घेऊन मर्यादीत प्रमाणावरच झाडांच्या अवयवांची काढणी करण्यात यावी. याकरिता देवराईचा पुरातन कायदा वृक्षपंचायतींनी अंमलात आणावा.

छाटणी, काढणी, निगा राखणार्‍यांना रोख रक्कम देण्याऐवजी, झाडांपासून मिळणारा फाटा, बहार आदींचा वाटा निर्धारीत करून द्यावा. यासाठी काहीजण सेवा कार्य म्हणून सूद्धा सहभाग घेण्यास तयार होऊ शकतील. अशांना प्रोत्साहीत करणे, मानसन्मान देणे या गोष्टींचा अवलंब करावा. यात एका गोष्टीचे कसोशीने पालन व्हावे ती म्हणजे झाडांचा निम्माच फळबहार मानवाने वापरावयाचा आहे व उर्वरत झाडांवर तसाच राहू द्यायाच आहे. त्याचा उपयोग सृष्टीतले प्राणी, पक्षी करतील तसे निसर्गाचे चक्र तुमच्या परिसरात कायम राहील. झाडांमुळे अनेक पक्षी येतील तेव्हा शेतावर येणार्‍या अळ्या व किडींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा तुमच्या दिमतीसाठी हजर असेल. नव्वद टक्यांहून अधिक पक्षी हे मांसाहारी आहेत. ते तुम्या पिकांपेक्षा किटके खाण्याला पसंती देतात. समजा काही शाकाहरी पक्ष्यांची संख्या वाढली तर तुमच्या परिसरात असलेल्या वृक्षांमुळे शिकारी पक्षी येऊ लागतील. मोठाल्या झाडांवर त्यांना निवासाला जागा मिळू शकेल म्हणजे निसर्ग कुणा एकालाच वाढू देणार नाही. त्याची स्वत:ची नियंत्रण यंत्रणा आहेच!

गाव पासून, घरापासून सुरू झालेली सु्क्ष्म जलसिंचनाची योजना हळू हळू गावच्या डोंगरांवर पायथ्या पासून माथ्या पर्यंत, दरी, घाटात अशी तुम्ही पाहिजे तितकी विस्तारू करू शकता. एका माणसाला दहा झाडे संगोपन करण्यासाठी फार मोठे उद्दीष्ट नसेल अन्यथा ब्रम्हपूत्रेच्या काठावर जादव पायेंगने एकट्याने ५०० हेक्टरचे जंगल बीज रोपणातून तयार केले व त्यात पट्टेदार वाघ, एक शिंगी गेंडा अशा दुर्मिळ प्राणी प्रजातीपासून असंख्य जीवांना आश्रय लाभला.
मार्कंडेय: गडावरच्या करिता पाणी शेंदताना पवार मामी...पाणी त्यांना अगदी जवळच उपलब्ध आहे.

आपल्या संस्कृतीत वृक्ष हा देव मानला आहे तो मानवाच्या कल्याणासाठीच. वड, पिंपळ, उंबर ही झाडे तोडणे घोर अपराध व पापकारक मानले आहे त्यामागे देखिल सृष्टीचे व मनुष्याचे कल्याण ही महत्वाची भूमिका राहिली आहे. या वृक्षांच्या खालची माती ही जिवाणू माती म्हणून निसर्गशेतीजगतात त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. देव वृक्ष यांनाच तर म्हणतात, त्याकडे निव्वळ धार्मिक थोतांड म्हणून बघितले जाऊ नये.

या संपूर्ण प्रक्रियेत गाय हा सगळ्यात महत्वाचा प्राणी आहे याचे कारण गायीच्या शेण, गोमुत्रात असलेली अनन्यसाधारण अशी नैसर्गिक रसायनांची जंत्री आणि त्याची असाधारण अशी रोगनिवारक क्षमता.

पाणी तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच हवे आहे. पाऊस पाडणे आपल्या हातात नाही, पण पाऊस पडावा व जमिनीचे जलस्तर राखले जावे हे आपल्याशिवाय इतर कुणाच्याही हातात नाही. माणूस देवभोळ्या वृत्तीचा असला तर तो अशा उपक्रमांकरिता सहजच पुढे येईल. काही मंडळी कदाचित येणार नाही. काहींना शारिरीक व्याधी असू शकेल अशांच्या वाट्याच्या दहा झाडांची जबाबदारी कुणीतरी उचलावी. वृक्षपंचायतीकडे त्याची नोंद करावी. जास्त प्रमाणावर वृक्षांचे संगोपन करणार्‍या, वृक्षतोडीवर कसोशिने नजर ठेवणाचे असाधारण कार्य करणार्‍यांचा जाहीरपणाने सन्मान व्हावा व गावाच्या मंदिरात किंवा समाज मंदिरात 'वृक्षश्रीं'ची नावे बोर्डांवर रंगवावीत....श्रीयूत....यांनी...तारखे पासून...तारखे पर्यंत विक्रमी...झाडांचे संगोपन केले. लाकूड तोड्यांपासून झाडे वाचविलीत...

शेताच्या बांधावर जगात अनेक ठिकाणी मोठमोठाली झाडे आहेत. पिकांचे अन्न हे जमिनीच्या वरच्या दिड दोन इंचातच आहे. त्यासाठी शेतात सेंद्रीय कर्ब जेवढा म्हणून राखाल तितके पिकपाणी निरोगी राहील. सेंद्रीय कर्बाचे महत्व तर पाश्चात्य शेतीतज्ज्ञ देखील मान्य करतात. मोठाली झाडे उभी राहण्यासाठी त्यांच्या मुळ्या झाडांच्या उंचीच्या पाचपट अधिक खोलवर नेतात, तेव्हात ते वादळ वार्‍यात तगू शकतात. शेतातल्या पाण्याची त्यांना गरज नसते, त्यांचे पाणी जमिनीच्या वीस मिटरच्या खाली असते. उलट त्यांचा पालापाचोळा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असा सेंद्रीय कर्ब उपलब्ध करून देतो.
रावळ्या: किल्ल्यावर भरपूर झाडी, तेव्हा पाण्याचे असे नैसर्गिक कुंड पाण्याने लबलब भरलेलेत.

झाडांच्या घेर्‍या खालची मातीही सर्वात सुपिक व उपयुक्त जीवाणूंनी युक्त असते याचा उपयोग शेती पिकांसाठी अनन्यसाधारण महत्वाचा आहे. सशक्त पिक घ्यायचे तर जीवामृत तयार करताना अशी सजीव माती उपयोगाची ठरेल. बांधावरच्या झाडांमुळे शेतात सावली, आडोसा व थंडावा तर राहतोच शिवाय झाडांमुळे शोभा येते. फळबहार तर अमापच मिळतो हा लाभ निराळा.

ढग डोंगरांशी सोयरीक करतात. तेव्हा डोंगरांवरचे वृक्ष तुमच्या परिसरात वर्षभर विहीरींना व जलाशयांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी सगळ्यात महत्वाचे ठरते. सुदूर जंगलातले झाड निरूपयोगी कधीच नसते. ते तुमच्यापर्यंत पाणी आणणारी यंत्रणा असते. त्यामुळे गावापासून दूर जाऊन झाड तोडणे म्हणजे आपल्या लाखमोलाच्या जीवावर घाव घालणे. दूर अंतरावरचे झाडच तुमच्यापर्यंत जमिनीखालून पाणी आणण्यासाठी मोलाची भूमिका बजावत असते. डोंगरावरचे झाड तर कधीच तोडू नये. डोंगरावर पाऊस जास्त पडतो, पाणी दीर्घकाळ प्रवाही ठेवण्यासाठी ही झाडे महत्वाची भूमिका बजावतात. तिथे जमिनीत पाणी मूरू दिले तर ते खाली वाहत तुमच्या पर्यंत पोहोचते.

सह्याद्रीत डोंगरभटकंती करताना आम्हाला पाच दहा टक्केच डोंगरावर थोडी फार वृक्षसंपदा दिसून आली, ती पन्नास टक्क्यांवर आणण्याचे उद्दीष्ट तुम्हाला ठेवावे लागेल, त्याने तुमच्या मुलाबाळांना आणि पुढच्या सगळ्या पिढ्यांना पाण्याची कधीच दादात राहणार नाही. तुमच्या शेतीला पाण्याबरोबरच अनेक महत्वाचे घटक मिळविण्याची फुकटची सोयच त्यामुळे उपलब्ध होईल.
जावळ्या: जुन्या शासकांनी जावळ्या किल्ल्यावर बांधलेल्या या कातळ  टाक्यात पाणी हमखास मिळते. 

एक नियम कसोशीने पाळला जावा, तो म्हणजे झाड पाच वर्षांपेक्षा मोठे झाल्यावर त्याच्या भाराच्या वीस टक्के इतकाच भार छाटणी करून काढून टाकावा. मोठ्या फांद्या तोडू नये. वाळवी लागली असेल किंवा वीजेच्या तारांना, घराच्या छपरावर, मंदिराच्या छपरावर अडसर असेल तरच धोकादायक, तुटण्याच्या बेतातल्या फांद्या छाटाव्या.

तुमच्या मुलाबाळांवर असे संस्कारच होऊ द्या, झाड कधीच तोडायचे नाही. त्याचे उत्पन्न घ्यायचे, म्हणजे फळे, फुले अणि मर्यादित प्रमाणावर सर्पण. झाडा लावा....त्यांना जगवा...त्यांचे संवर्धन करा!
बिनखर्चाच्या...थोड्याशा मेहनतीच्या जुन्याच असलेल्या नव्या जलक्रांतीसाठी तुम्ही सज्ज आहात?

तुम्ही संगोपन केलेले झाड पाच फुटांचे झाले तर त्यापासून पहिल्यावर्षी एक टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरेल. ते तुम्हाला नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतातून मिळेल. दरवर्षी झाड जसजसे मोठे होईल, तसतशी त्याची सुक्ष्मसिंचन क्षमता वाढत जाइल. एक झाड पन्नास ते शंभर टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरविण्याइतके मोठे डौलदार बनविण्याचे सर्वांनी उद्दीष्ट ठेवावे.
पंचक्रोशितली खुरटी झाडे, काटेरी झुडपे, बोर, चिंच आदी झाडे खुप उपयोगाची आहे या सारखी झाडे तोडण्याची कोणतीच आवश्यकता नाही. दोन झाडात झाडाच्या घेर्‍याचा अंदाज घेऊन पुरेशी जागा सोडणे. जसे आंबा, वड, पिंपळ वीस तीस मिटर घेर्‍यात वाढते. त्यामुळे मोकळ्या रानात जास्त अंतर सोडणे. रस्त्याच्या दुतर्फा सात आठ मिटर अंतर ठेवणे म्हणजे झाडांचा घेर पुरेसा वाढू शकेल.

रावळ्या: डोंगर पठारावर असूनही या कुंडात पाणी झिरपत राहते.

आज बर्‍याच भागात वर्षातला बराच काळ पाण्याच्या टॅंकरचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. काही ठिकाणी एखादा हंडाच पाणी मिळते तर काही ठिकाणी दिवसा आड तर काही ठिकाणी अगदी पंधरा पंधरा दिवस पाणी येत नाही.
पाण्याच्या टॅंकरसाठी मागणी करायची. तो आला की त्यातले पाणी भरण्यासाठी झुंबड उडवायची. कुठे नद्या वळविण्याची मागणी तर कुठे धरणाचे पाणी आम्हाला द्या असा रेटा! त्यापेक्षा आपणच आपले पाणी का निर्माण करू नये!

आपल्याकडे आजही आल्या गेलेल्याला प्रथम पाणी देतात. पाणी हे सगळ्यात पवित्र असे दान मानले गेले आहे. आज आपल्यावरच पाण्यासाठी हाथ पसरण्याची वेळ यावी? हे चित्र बदलणार केव्हा?

जगात पर्जन्यछायेतल्या काही शहरांनी मोठी जलक्रांती करून स्वयंपूर्णता मिळविली आहे. आपण इतरांचेच गुणगान गाणार की, स्वत:ही काही तरी भव्य दिव्य करण्याच्या दिशेने पावले टाकणार! आपल्या दहा टक्के इतकाच पाऊस असलेल्या इस्त्रायलच्या शेती यशोगाथेचे आणि जलसंवर्धन यंत्रणाचे किती दिवस कौतूक करणार?

विदर्भ, मराठवाडा या पर्जन्यछायेतल्या भागाची पाण्याची ओरड सातत्याने वाढली आहे. जास्त पर्जन्यछायेच्या गावांनी पाण्याच्या हरेक थेंबाचा वापर करण्याचे उद्दीष्ट ठेवावे. तुमच्या घरात वापरल्यानंतरचे पाणी गटारीमध्ये जाण्यापूर्वी आठ दहा वेळा त्याचा पुनर्वापर करावा. घरात स्वयंपाकीची भांडी धूताना, अर्धेमुर्धे उरलेले पाणी फेकून देण्याऐवजी बादलीत गोळा करायचे. परसात किंवा सोसायटी, बंगल्याच्या आवारात झाडांने ते द्यायचे. काही गोष्टी धुण्यासाठी या पाण्याचा सहजपणे वापर होऊ शकतो. असे साठवलेले पाणी आठवड्यात एक दिवस पाठीवर पाच लिटरची कॅन अडकवायची. सायकल, मोटरसायकलाला पाच दहा कॅन सहज डकवून घेऊन जाऊ शकतात. कुटुंबातील आणखी काही सदस्य सोबत घ्यायचे व आपण लावलेले झाड जगविण्यासाठी एक तास खर्ची घालायचा. झाडींची गरज पाणी, जीवामृत आणि भरपूर सूर्यप्रकाश. यातील सूर्यप्रकाश सोडला तर उर्वरीत दोन गोष्टी तुमच्या हातात आहे आणि सूर्यप्रकाश आपल्याकडे मुबलकच आहे. झाडाचे ते खरे अन्न. पाणी, जीवामृत झाड जगण्यासाठी जमिनीचे पर्यावरण निर्माण करण्यास मदत करतात, तुम्हाला तीच तर काळजी घ्यायची आहे.
बंड्या: गवताची बेसूमार तोड पण वहिवाट कमी झाडी भरपूर मग असे पाणी पायथ्याला साठणारच.

झाड लावताना काळजी घ्यायची, ती म्हणजे कुणाच्या खासगी जागेत परवानगी घेऊनच झाडे लावावी. काहींना जमिनीचा वापर व्यावसायीक कामासाठी करायचा असतो, काहींना आपल्या क्षेत्रात झाडे नको असतात, तेव्हा तंटे बखेडे उभे राहणार नाही याची काळजी घ्यावी, ते करता आले तर अशा जलवृक्ष संवर्धनाला अर्थ राहणार नाही. भांडण तंट्यामुळे अकारण नवी डोकेदुखी उभी न राहो!

तुमचा विठ्ठल पंढरपूरात भेटेल की नाही ठाऊक नाही, पण तुम्हा वृक्षसेवकांना तुम्ही लावलेल्या झाडाच्या आसपास तो असेल. तुमचे तुका, तुमचे माऊली, तूमचे बसवस्वामी, तुमचा वाल्मीकी, तुमचे बाबासाहेब, तुमचे शिवाजी, संभाजीराजे असे अनेक थोर महापूरूष तुम्हा वृक्षसेवाकांना तुम्ही लावलेल्या झाडाजवळ हमखास भेटतील.

५०० लोकसंख्येचे गाव असेल तर तुमच्याकडे उत्तम निगा राखलेली पाच हजार झाडे असतील, त्यातून तुम्ही कमीत कमी ५०० टॅंकर इतके पाणी जमिनीत मुरवलेले असेल. आजच्या उपलब्ध झिरपण क्षमतेत हे अधिकचे ठरेल. शिवाय हे प्रमाण दरसाली वाढतच राहील तशी तुमची पाण्यासाठी स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू होईल. सगळ्यात महत्वाचे म्हणजे हे पाणी तुमच्या गावच्या जमिनीखाली असेल ज्याचा थेट लाभ गावाच्या शेतीला, विहीरींना होईल. म्हणजे 'आंबा तर आंबा कोयीचेही पैसे'. आता कल्पना करा, पाच हजार ऐवजी पंधरा, वीस, पन्नास हजार किंवा एक लाख झाडे तुमच्या परिसरात असतील आणि त्यांची निगा राखली गेली, तोट पूर्ण टाळली तर? काय बिशाद की तु्म्हाला पाणी मिळू शकणार नाही.


हे कदापी शक्य नाही! लोक मानणार नाही! निम्मे लोकच सहभाग घेतील! अशा शंका मनातून काढून टाका. तुम्ही सकारात्मक होऊन सुरूवात करा.
'माणसाने कधी आपल्या सवयी बदलल्या आहेत का?' असा प्रश्न मनाला शिवू देऊ नका. इंदूर शहराचे उदाहरण बघा. तिथले लोक आजही, बार, गुटखा, तंबाखू खातात पण स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाहीत. पुर्वी हे शहर सगळ्यात गलिच्छ शहरात मोडत होते. मागच्या पाच वर्षात तिथल्या प्रत्येक नागरिकाने, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकदिलाने आवाज दिली, 'आमचे इंदूर जगातले सगळ्यात स्वच्छ व सुंदर'. केवळ घोषणा देण्यावर व त्या भिंतीवर रंगवण्यावर ते थांबले नाही. त्याचा परिणाम तुमच्या समोर आहे. इंदूर हे निशंशय भारतातले सगळ्यात स्वच्छ शहर आहे. शहरातले लाखोलोक एक विचार घेऊन एकत्र आले असा चमत्कार तुम्ही का नाही घडवू शकत.


तुमचा गावकूस आणि पंचक्रोशीतल्या डोंगरांना जगात सगळ्यात सुंदर, वृक्षसंपन्न बनविण्याचा विचार मनात रूजवा व तो प्रत्यक्षात साकारण्यासाठी तुमचे उभे आयुष्य वेचण्याचा विचार मनात आणा, तुम्हाला पाण्यासाठी स्वयंपूर्ण होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही,
त्याचे पुढचे पाऊल म्हणजे घातक कृत्रिम रसायनविरहीत शेतीचे तुम्ही पाईक व्हा...विषमुक्त अन्नाचे हकदार व्हा!

आपल्याकडे नद्या हिमालयातल्या नद्यांप्रमाणे बारमाही नाहीत. पावसाळ्याच्या चार महिने व त्यानंतर दोन एक महिने त्यांना पाणी राहते. जमिनीत सगळ्यांनी पाणी मुरवले तर नद्या आणखी काही महिने जास्त प्रवाही राहतील. जमिनीखालच्या 'नद्या' डोळ्यांनी दिसणार नाहीत, त्यांचे पाणी मात्र नेहमीच उपलब्ध राहील, हाकेच्या अंतरावर!



मोठ्या शहरांसाठी...
मोठ्या महानगरातील लोकांना संख्येच्या तुलनेत झाडे लावण्यासाठी कदाचित जवळची ठिकाणे उपलब्ध होणार नाही. त्याकरिता  थोडे दूर जावे लागू शकते. घरा जवळचे रस्ते, बगिचे यांच्या किनार्‍यावर मोठाली झाडे हमखास लावली जाऊ शकतात. शहरातल्या सगळ्याच रस्त्यांच्या दुतर्फा झाडे लावली जाऊ शकतात. इतकेच काय तुमच्या कार्यालया समोर किंवा दुकाना समोर तु्म्ही झाड लाऊ शकतात. अगदी रहदारीच्या रस्त्यांच्या दुतर्फा अनेक ठिकाणी जुनी, मोठाली झाडे आहेतच, मग नव्यानेही लावली जाऊ शकतात. महामार्गांच्या दुतर्फा झाडे लावली जाऊ शकतात. त्याने प्रवास करताना मिळणारी सावली आणि रस्त्यांच्या सौंदर्यात पडणारी भर काय वर्णावी! आपल्याच प्रयत्नांनी पाणीच पाणी निर्माण करू शकलो तर? स्वप्नवत वाटते, पण अशक्य नक्कीच नाही. हे पाणी केवळ पाणी नसेल, ते असेल प्रगतीचे दार. व्यापार, उद्यमाला त्याने चालना मिळेल. कित्येक उद्योग त्याच्या मुळे बहरतील. याचे लाभ अमर्याद!

तुमच्यासाठी आरोग्य जीतेपणीच. स्वर्गही जीतेपणीच!

टीप:
यातील एक शब्द सुद्धा माझा नाही. विविध शेती तज्ज्ञ, वनांचे संवर्धक, थोर शास्त्रज्ञ, संतसाहित्य यातील उपयूक्त माहितीचे संकलन करून मी फक्त वाढप्या प्रमाणे तुमच्या समोर माहिती वाटायला आलो आहे. तुम्ही हा प्रसाद मनोभावे ग्रहण करा. सकारात्मक होऊन कार्य करा. यश तुमचेच.


- तुमच्या मातापित्यांचा जयजयकार
या राष्ट्राचा जयजयकार,
भरतभूमीचा जयजयकार.
धोडप: गवळीवाडीची वेस सुरू होण्यापूर्वी डोंगरउतारावरून झिरपणारा अविट गोडीच्या पाण्याचा झरा...
ममदापूर: काळविटांसाठी बंधारा बांधणार्‍या नाशिकच्या सामाजिक संस्थेचे पत्रक.



सूर्यमाळ: महाकाय आकाराचे आंम्रवृक्ष परिसरातल्या वाड्यांना वर्षभर पाणी पूरविण्याकरिता अनन्यसाधारण महत्वाचे...

मेळघाट: या अती उष्ण पट्ट्यात पाऊस भरपूर पण जमिनीचे जलस्तर पूर्वपार खोलवर

पेठेचीवाडी: भरपूर झाडी हरिश्चंद्रगडाची उत्तरबाजू समृद्द करणारी...

कात्रा: एकेकाळी येथे वाघ असायचा, आता मेाठी झाडी नाहीत तरीपण गवती कुरणे इथल्या गुराख्यांचा मुख्य आधार

कळसुबाइ ते हरिश्चंद्रगड पट्ट्यात वृक्षसंपदा निम्म्याने घटली तरी परिसराला ती अजूनही भरपूर पाणी देते...

राजापूर: पण या जमिनीत पाणी टिकत नाही...ते खोलवर मुरते व खालच्या भागाला वरदान ठरते.

गवळदेव: जमिनीत मुरलेले पाणी असे झरा बनून वाहते.

ममदापूर: पाण्याच्या प्रवाहावर असे कच्चे बांध घालयचे...त्यावर माती टाकली की पाणी अडूनही राहते व प्रवाही राहते.

भूपतगड: खडकात पावसाचे पाणी साठले, पण ते पिण्यालायक राहीले नाही.

रतनगड: झाडी भरपूर असल्याने दीर्घकाळ जमिनीत मुरलेले पाणी खिंडीतल्या कुंडातून मिळत राहते.

ब्रम्हगिरी: झाडी अफाट तोडलीत तरी पंचलिंगवर टिकून...त्याच्या झिरप्यात असे कुंड आपसूक भरतात.

कुडपन: प्रतापगडाच्या घेर्‍यात जावळीच्या खोर्‍यात झाडी मुबलक पाणी मुबलक.

डहाणू: झाडे काही फक्त पाणीच देत नाहीत...घरांना अमुल्य दागिन्यांनी सजवतात...

डहाणू: भूरपूर पावसाच्या डहाणून हिरवा साज ल्यायलेले विश्रामगृह.

सोनगीर: निझामशाहीत खापराच्या नळीतून पाणी वाहून नेण्याची सुविधा.

ब्रम्हगिरी: माउलींच्या इतके झाडांचे महत्व आणखी कोण समजावणार! आमच्या मात्र अजून ते गळ्यात नाही उतरत.

सोनगिर: किल्ल्यावर जुनी कोट्यावधी लिटर पाणी साठवण व्यवस्था...पायथ्याचे गाव तहानलेले

सोनगिर: महाराष्ट्रातले हे प्रातिनिधीक चित्र...मोठी झाडी गायब खुरटी झाडे काय जलपूनर्भरण करणार

देहेरी: हे मानव निर्मीत जंगल. दहा वर्षात बहरले...कुर्‍हाडबंदीमुळे टिकले.

चांदोरी: नांदूरमध्यमेश्वर धरण गाळाने आकंठ भरल्याने पाणथळ हे जगप्रसिद्ध पक्षीआश्रयस्थान बनले.

फाशीचा डोंगर: पाणी मुरवण्यासाठी अशी चर म्हणजे अमाप खर्च व मनुष्य शक्तीचा व्यय...ती पुरणार तरी किती.

नाशिक: म्हसरूळ देवराईत झाडे लावण्यासाठी दोन हजार लोक लोटले...पाचवर्षी भरपूर वनसंपदा उभी.

राजगड: अती उंचीवर साठवलेले पाणी...महाराजांचा महाराजांनी झाडे तोडू नका हा संदेश कोण मानतो.

राजगड: चंद्रकोराच्या आकारातला हा देखणा तलाव बालेकिल्ल्यावरची शिवकालिन पाणी व्यवस्था.

नाशिक: अशी महाकाय झाडे म्हणजे पिढ्यान पिढ्यांची पाण्याची तरतूद...

राजदेर: मोठ्या मेहनतीने गडावर चर खोदल्यात...आता भरपूर झाडी लावण्याची आवश्यकता.

धोडप: पुरातन पाणी व्यवस्था.

धोडप: गवळीवस्तीतले जुने पाणी टाके.


संदर्भ:
भावार्थ दीपिका,
अमृतानूभव,
चांगदेवपासष्ठी,
बृहतसंहिता,
वृक्षायूर्वेद,
ज्ञानदेवांच्या वनश्रीतील पर्यावरण, गजानन खोले
Tending The Earth, Winin Periera
The One-Straw Revolution, Masanobu Fukuoka
गतीमान संतुलन, दिलीप कुलकर्णी
व्याख्यान:
१) पद्मश्री सुभाष पाळेकर, शुन्य खर्चाच्या शेतीक्रांतीचे प्रणेते.
२) डॉ. अरूण देशपांडे, शेती बॅंकेचे प्रणेते.
३) जीतूभाई कुटमुटिया, जीवनव्रती कार्यकर्ता
४) ज्ञानेश्वर बोडके, अभिनव फार्मर्स,


वृत्तवाहिनीवरच्या मुलाखती:
संजय पाटील, बायफ,
राहीबाई पोपरे




Thursday, April 18, 2019

mohandar: satmaletla chowkidar



मोहनदर...सातमाळेतला चौकीदार
सह्याद्रीतल्या काही डोंगरांमध्ये आर पार पडलेले छिद्र दिसतात. सुईचे नेढे तसे 'डोंगरांचे नेढे' म्हणून यांना संबोधले जाते. डाईकची अश्मरचना आणि त्याच्या मधोमध चौकोनी आकाराचे नेढे म्हणजे मोहनदर उर्फ शिडका किल्ला. आजची रविवारीय भटकंती, 'सातमाळेतला चौकीदार', अशी ओळख असलेल्या मोहनदरी किल्ल्यावर आणि सोबत गिरणा काठच्या पूरातन देवळी कराड शिवमंदिराची भेट...
नाशिकचा कळवण तालूका प्रसिद्ध आहे तो नेढे आणि डाईकच्या अश्मरचना असलेल्या डोंगरांसाठी. मोहनदर, कण्हेरगड, पिंपळा उर्फ कंडाळ्या, जो सह्याद्रीतले सर्वात मोठे नेढे वागवून आहे, असे नेढे असलेले तीन डोंगरं कळवण तालूक्याचे भौगोलिक वैभव. धोडपचा किल्ला देखिल कळवण परिसरातलाच, त्यावर सुद्धा समोरासमोर दिसत नसले तरी आरपार जाणारे भले मोठे नेढे आहेच. या वैभवात भर टाकतात त्या डाईकच्या रचना असलेले डोंगर. धोडप, कण्हेरगड, मोहनदरी, पिंपळा, मोठी भिंत हे या परिसरातले काही प्रसिद्ध डाईकची रचना असलेले डोंगर. 
डाईकचा भला थोरला पसारा मोहनदर गावातून...
डाईक म्हणजे डोंगरांची पातळ पापड सारखा भासणारी लांबसोट भिंत. अर्थात या भिंती फक्त डोंगरमाथ्यावरच असतात असे नाही, त्या जमिनीवर देखिल आढळतात आणि डोंगरांच्या खिंडीतही. (नाशिक शहरात तर गोदावरीच्या मधोमधल भली थोरली डाईकची भिंत आहे). डोंगरमाथ्यावरच्या पातळ कातळ भिंती हा डाईकचा एक प्रकार आहे. दूर अंतरावरून त्या पापडा सारख्या भासत असल्या तरी त्या पुरेशा जाडच असतात. कुठे त्या पाच पंधरा मिटर जाडीच्या आहेत तर कुठे त्यांच्या धारा मिटरभरच आहेत. जुन्या शासकांनी या डाईकचा संरक्षण सिद्धतेसाठी, परिसरात टेहाळणी आदी करण्यासाठी त्यावर किल्ले, चौक्या बांधून काढल्या. 


विलास गावित...बालवयात त्याची समज व अंगातला चटपटीतपणा चकित करणारा...

मोहनदरच्या वाट्याला भौगोलिक, धार्मिक, ऐतिहासिक असे तिहेरी भाग्य लाभले आहे. नाशिकचे प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक तथा संशोधक गिरीष टकले यांनी सर्वात प्रथम मोहनदरवर किल्ला असल्याची बाब उजेडात आणली. नाशिककरांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची व भूषणावह अशी बाब आहे. सह्यभटकंतीची आवड असलेल्यांच्या 'इच्छा यादीत' मोहनदरीचा हमखास समावेश होतो तो त्याच्या सर्वगुण संपन्नतेमुळे. 

मोहनदरच्या माथ्यावरून समुची सातमाळा आणि सेलबारी, ढोलबारी रांगेसह विस्तृत असा प्रदेश दृष्टीस पडतो. उंचीने लहान आणि टेहाळणीसाठी उपयुक्त अशा कारणासाठी मोहनदरी किल्ल्याची निर्मीती झाली असावी.  इतिहास प्रसिद्ध नांदूरी घाटावरचा हा किल्ला उत्तरेकडून येणार्‍या व्यापार मार्गावरच्या देखरेखीसाठी आणि राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला गेला असावा. मोहनदर किल्ल्याची दक्षिण बाजूची धार थेट बलशाली अशा अहिवंत किल्ल्याला जाऊन भिडते, त्यामुळे मोहनदरास टेहाळणी योग्य किंवा युद्ध काळात सहाय्या करण्यासाठी निर्माण केले असावे.
काही अभ्यासकांच्या मते मोहनदर हा अहिवंत किल्ल्याचाच विस्तार आहे. मागच्या डिसेंबरात आम्ही सातमाळा डोंगरयात्रेच्या पाहणीसाठी अहिवंतवरून मोहनदरकडे जाणार्‍या वाटांचा वेध घेतला तेव्हा लहान आणि मोठा सूपा असे दोन डोंगर मोहनदरला अहिवंतशी जोडतात असे आढळले. शिवाय सुप्यावर जुन्या बांधकामाचे कुठलेच अवशेष नाहीत. मोहनदर हा अहिवंताचाच विस्तर असता तर सुप्याला मजबूत तट घालावे लागले असते, तसे काही दिसत नाही.
मोहनदरचा इतिहास जसा अज्ञात तशाच त्यावरच्या राजकीय घडामोडींबद्दल फारशा नोंदी वाचायला मिळत नाही. गडावर मोठ्या संख्येने असलेली जुन्या इमारतींचे भग्न अवशेष, तटबंदी आणि कातळात कोरलेली पाण्याची टाकी यावरून हे महत्वाचे ठाणे असावे याची प्रचिती येते.
मोहनदर हे नाव खुपच वेगळे भासते. व्यावहारात त्याचा वापर सहजगत्या आढळत नाही. कशावरून आले असावे हे नाव? तसा सिंधू संस्कृती सोबत इथला संबंध अद्याप प्रस्थापित होऊ शकलेला नाही. मोहनदर हे नाव मोहंजोदारोशी काहीसा मेळ खाते याबद्दल कुतुहल वाटते.
गोष्टीवेल्हाळ विलास गावित...आशिष सोबत गप्पा मारताना...

उत्तरेतल्या परकीय शासकांची दक्षिण भारत जिंकण्याची लालसा. बहामनी, निझामशाही सत्तांचा प्रदेश राखण्यासाठी संघर्ष यातून सातमाळेतल्या डोंगरांवर किल्ल्यांच्या बांधकामांना वेग आला असण्याची शक्यता आहे. परकीय शासकांच्या अगोदरच्या काळात किल्ल्यांची फार माठी बांधकामे मोजक्याच ठिकाणी झाली असण्याची शक्यता आहे. अधिकतर धार्मिक कारणामुळे या परिसरात कातळातली बांधकामे झाली असण्याची शक्यता आहे. बिलवाडी, देवळी कराड, मार्कंड पिंप्री ही अत्यंत देखणी कातळकोरीव मंदिरांची बांधकामे मुसलमानपूर्व वैभवाची साक्ष देणारी. 


डोंगरावर झाड असते?

१४ एप्रिल २०१९:
'वैशाख वणवा भडकण्याच्या आत जमेल तितकी भटकंती करावी. चैत्रातले सगळेच रविवार काही हाती येणे शक्य नाही, हा रविवार मिळतोय तर संधी सोडण्यात काहीच अर्थ नाही', असा विचार करून डॉ. अजय पाटलांनी घोषित केलेल्या अलंग-मदन-कुलंग परिसराच्या जंगल भटकंतीचा बेत रद्द झाल्यानंतर दुर्गभांडार, घाटघर अशा काही मंडळींच्या फिरस्त्यांची घोषणा झाली होती, रात्री ११-३० वाजता फोन बघितला तर आशिष शिंपीचे तीन मिस कॉल दिसले तेव्हाच ओळखलं काही तरी शिजतयं! आशिषलाफोन करून विचारले तर त्याने छोटेखानी बेत सांगितले, मोहनदर, सकाळी जाऊन दुपारच्या बेताला परतता येईल.
गेल्या आठवड्याभरापासून नाशिकचे दिवसाचे तापमान महाराष्ट्रातल्या तप्त प्रदेशांशी स्पर्धा करत होते, त्यात रात्रीच्या तापमानाची भर पडली. तब्बल ३० अंश सेल्सियस इतकी तप्त रात्र, हवेचा वेग ताशी ८ ते १० किलो मिटर इतकाच, त्यामुळे दिवसभर तापणारी सिमेंट कॉक्रिटची घरे मध्यरात्रीपर्यंत तप्त राहतात. घरात पंखा फिरत असला तरी तो गरम हवा फेकणार. अशा कोंडमार्‍यात रविवारचा दिवस रखरखीत सातमाळेतल्या उघड्या बोडक्या मोहनदरीत म्हणजे जरा धाडसाचेच काम होते, पण मनाने सांगितले, चल! तर निघायचे...मग मागे पुढे बघायचे नाही. 
'वैशाख बरा' इतकी टिपेवर पोहोचलेल्या उन्हात आजची दुपार कटणार होती. पावलोपावली उष्मा एके उष्मा अशी परिस्थिती शरीर थंडावा शोधत होते, त्यावर, 'ट्रेक हा काही उपाय होऊ शकत नाही, त्यापेक्षा एखाद्या नैसर्गिक जलाशयात डुंबणे केव्हाही परवडणारे ठरले असते, गेल्या काही वर्षांपासून पाण्याची भिषण स्थिती पाहता, अशी नैसर्गिक जलाशये आंघोळी करून खराब करायला मन धजत नाही, त्यांचे पाणी कित्येक वाडी वस्त्यांमध्ये पिण्यासाठी, नित्य वापरासाठी उपयोगात आणले जाते, आपण आंघोळ करून ते खराब करण्यात काहीच अर्थ नाही, त्यापेक्षा भटकंती थंडावा शोधलेलाच बरा, 'अंगभर उन्ह खाल्ल्लयानंतर तिथल्या एखाद्या विशाल वृक्षाच्या खाली तास दोन तास पहुडायला मिळेल, कातळातल्या जुन्या टाक्यातले पाणी चवदार, गारेगार असेल; मन आणि शरीर अशा दोघांनाही थंडावा मिळू शकेल तो भटकंतीत! मोहनदर आहे तरी कितीसा? या परिसरात काही जुनी मंदिरे आहेत, त्यातले देवळी कर्‍हाडचे मंदिर करूया! असे ठरवून सकाळी ६-३० वाजता नाशिकहून आम्ही नांदूरीच्या दिशेने कुच केली. 


डोंगरांच्या अंगाखांद्यावर बागडणारी ही मुले ही त्याचीच लेकरे...त्यांना त्यावर कशाची भिती...

दुपारचे खानपान हॉटेलात न करता आपले आपणच बवायचे या बेताने छोटी गॅस शेगडी व शिधा सामुग्री गोळा केली. ज्यात मोड आलेली मसूर, भरपूर भाज्यांचा समावेश होता. आजच्या सुखवस्तू (कथित) जीवनैलीत ५५ किलो मिटरचा प्रवास म्हणजे असा सुरू होतो आणि असा संपतो. दिंडोरी ओलांडताच सातमाळेची रांग गाडीतूनच दृष्टीस पडते. अचला, अहिवंत, सप्तृश्रृंगीगड, मार्कंडेय असा भला थोरला शैल नजारा डोळ्यासमोर उभा राहणार तर त्यातल्या वेगवेगळ्या आठणींना उजाळा मिळणारच. गाडीत होतो तिघेच, त्यात जो तो आपआपल्या नजरेतून या डोंगरांच्या लहान सहान आठवणी कथन करत होता. गप्पांच्या ओघात नांदूरीचा घाट कधी पार केला हे कळलेच नाही, त्यामुळे दरेगावच्या पुढे डाविकडचे वळण चुकले आणि आम्ही नांदूरीत पोहोचलो. तिथून अभोणा रस्त्याने मोहनदरीत जायचे म्हणजे चार किलो मिटरचा हकनाक मोठा वळसा, तो पडलाच! नांदूरीत अभोणा रस्त्यावर वीरगळांची रांग दृष्टीस पडते. यातील बहुतांशी वीरगळांना शेंदरी रंग फासले आहेत. एक जुनी भग्न दशेतली गणपती मूर्ती आणि इतर काही जुन्या पूरान्या कातळात घडवलेल्या मुर्त्या पिंपळाच्या झाडाखाली मुकपणे पहुडलेल्या दिसतात. 
समोर थोड्याच अंतरावर आभोण्याकरिता रस्ता बनविण्यासाठी डोंगर धार कापून खिंडीतून रस्ता बनविण्यात आला आहे. याच्या डाव्या हाताचा डोंगर मोहनदरीचा. येथेही वीरगळ आहेत, त्यातील एका वीरगळावर लेख कोरला आहे.
मोहनदर गावात पोहोचताच आम्ही मोटारगाडी उभी करण्यासाठी झाडाची सावली शोधू लागली. एक दोन ठिकाणी झाडांची सावली मिळू शकली असती, पण गाडी उभी करून गेलो असतो तर या लहानशा गावच्या चिंचोळ्या रस्त्यात वाहतूकीला अडथळा झाला असता त्यामुळे लोखंडी खांबांवर पत्र्यांचे आच्छादन असलेले मोठ्या आकाराचे सभामंडप दिसताच, ही जागा योग्य राहील, असा विचार करून तिथल्या एका काकांना, येथे गाडी लावू का? असे विचारले, लावा की, असे खुल्या मनाने सांगून ते शेतीच्या कामासाठी निघून गेले. एका कोपर्‍यात गाडी उभी करून आम्ही नको असलेल्या गोष्टी पाठपिशवितून बाहेर काढल्या...पाण्याच्या दोन बाटल्या, दोर असे कमीत कमी वजन घेतले. एक शाळकरी मुलगा बाकावर येऊन बसला, कुठे किल्ल्यावर जाणार का? दोन वाटा आहेत, एक सरळ आणि दुसरी जरा लांबून पण सोपी वाट आहे. वाटाड्याची तशी आवश्यकता नव्हती. आशिष म्हणाला आपण वाटाड्या घेऊ, त्यामुळे त्यांना काही रोज तरी मिळेल. मुलाने २००/- रूपये घेईन असे सांगितले. लहान मुलाला
अकारण इतकी रक्कम देऊन त्यांची सवय बिघडविण्यात काही अर्थ नाही, असा विचार करून आम्ही चालू लागलो. तोही, गरज नाही, अशा अविर्भावात त्याच्या घरात निघून गेला. थोडे पुढे गेल्यावर त्याने आवाज देऊन, वाटांची चुकामुक होईल, किती देणार? त्याला बोटानेच एकचा आकडा दाखवला, तो तयार झाला. 


 नेढ्यावरचे पाण्याचे टाके पूर्णपणे गाळाने भरलेय...

८-४७: आम्ही गावातून सरळ नेढ्याकढे चालायला सुरूवात केली. वरच्या भागात चढाई उभी होईल, दमछाक होणार, शिवाय उन्हं चांगलीच चटका देणारी होती. मुलगा मोठा चुणचुणीत निघाला, त्याने आपले नाव सांगितले, विलास गावित, तो गावातल्याच आश्रमशाळेत सहावीत शिकतोय. आमची तिघांची नावे त्याने विचारली. त्यानंतर त्याची बडबड सुरू झाली ती शेवट पर्यंत सुरूच होती, जी एैकायला बरी वाटत होती. त्याच्या आमच्या बद्दल सारी माहिती विचारून घेताना आपल्याबद्दल माहिती सांगितली. गावच्या चाली रिती त्याच्या बोलण्यातून समजत होत्या.

आशिषने, गावात पाण्याची परिस्थिती कशी आहे! कुठून पाणी आणतात, असे विचारले तर, दोन विहीरी आटल्यात, हात पंपाला पाणी नसते, गावाबाहेरून एक हातपंप आणि एक विहीर आहे. तिथून भरून आणावे लागते, त्याला गाव परिसराची उत्तम माहिती होती, तसेच रोजच्या जगण्यात येणार्‍या अडचणींमुळे
त्याच्या उत्तरात हताशपणा जाणवत होता. 


गवत कुठे गेले...अगदी सफाचट!

'पावसाळ्यात मोहनदरच्या डोंगरावरून दोन मोठे झरे गावाच्या दिशेने वाहत येतात, एखादा मोठा खोल खड्डा जमिनीत केला तर गावाला वर्षभर पूरेल इतके पाणी त्यात साठवले जाऊ शकते', अशी आमची चर्चा सुरू होती. 'गावकरी मदतीला येतील', गावचे लोक कुठल्याही कार्यासाठी एकत्र येतात, लग्न असो, आश्रमशाळेसाठी बांधकाम मजूरी गावकर्‍यांनीच केली अशी माहिती देताना त्याचा अभिमान दाटून येत होता. 

गावामधून थेट नेढ्याच्या दिशेने गडावर जाणारी वाट स्पष्ट दिसते, ती समोर जातेय असे वाटत असताना, विलास नेमके कुठे वळायचे हे सांगत होता. आपण कल्पना करू शकत नाही, इतकी फसवी वळणे होते. म्हणजे वाट समोर दिसतेय, पण ती डावीकडून घसार्‍याने वर गेल्यावर समजायचे की, समोर गेलो असतो तर वाट चुकली असती. या रणरण उन्हात अशा चुका काही कामाच्या नाहीत. विलासला सोबत घेतले हे बरोच केले.

जस जसे वर जात होतो, तसतसे मोहनदरचे नेढे मोठे होत होते. ''देवीने राक्षसाचा पाठलाग केला, तो लांब पळाला तर त्याला त्रिशुळ मारला, त्यामुळे ह्या डोंगराला असे भोक पडलेय.'', 'तुम्ही धोडपवर गेला आहात का'? 'डोंगरदेवाच्या उत्सवाला याल का'? दोन वर्षांनी चैत्रात हा उत्सव असतो, तेव्हा मोहनदरवरच्या टाक्याचे पाणी दुध होते, ते बाटलीत भरून आणायचे व आजारी माणसाला पाजायचे, 'पुढच्या महिन्यात ताईचे लग्न आहे', तुम्ही याल का? 'आज आभोन्याला बाजार आहे, तिथून कपडे घ्यायचे आहे', विलासचे अखंड बोलणे ऐकता ऐकता ९-५५ वाजता नेढ्या जवळ पोहोचलो. 


पाण्याची कातळातली टाकी मुबलक प्रमाणावर...मोहनदरवर  सैन्याच्या महत्वाच्या हालचाली होत असाव्यात...

वाटेत पाच सहा ठिकाणी मोठ्या मोळ्या बांधून ठेवल्या होत्या. मोहनदरच्या डोंगरावर एकही झाड हिरवं असावे असे वाटत नव्हते, सगळीकडे कोरडे शुष्क लहान झुडपे व बारीक बुंध्यांची वाळकी झाडे. काहीच शिल्लक नसलेल्या रानातून सर्पण? शासनाची उज्वला मोहिम यांच्या पर्यंत पोहली नाही का? स्थानिक नेते मंडळी, स्वयंसेवी गटांनी इथल्या घराघरात गॅस जोडणी मिळवून देण्यात पुढाकार घेतला नाही का? 
जास्त पावसाच्या या प्रदेशात जंगल संपदा अशी नाहीच, त्याला कारण झाडांची बेसुमार कत्तल. ही कत्तल आपल्या जीवावर बेतणार! शेतीच काय, प्यायला पाणी महाग अशी स्थिती. यावर गावकर्‍यांना त्याचे काहीच वाटत नाही का?
विलास सोबत चर्चेतून असे समोर येणारे वास्तव चिंतेत टाकणारे होते, 'गावात प्यायला चांगले पानी नाही, लोक जार विकत घेतात. प्यायला ते पानी आनी वापरायल हापसा नाही तर विहीर, ते देखिल गावाबाहेरून आनायचे म्हनजे लई ताप होतो'. आता हे जार काय प्रकरण आहे हे शहरी माणसाला सांगण्याची आवश्यकता नाही. शहरात लग्न असो की कुठलाही समारंभ संपन्न मंडळी जिथे शुद्ध पाणी म्हणून मिनरल वॉटर, आर ओचे पाणी पाहुण्या मंडळीसाठी बाटल्य वा प्लास्टिकच्या पेल्यातून पिण्यासाठी उपलब्ध करून देतात तिथे थोडी कमी आर्थिक क्षमता असलेली मंडळी जार विकत घेते. शहरात महापालिकेच्या नळांचेच पाणी क्लोरिनचा वापर करून कथितरित्या शुद्ध केले जाते व ते जारमधून देतात. यात थंड पाणी देण्याची सुविधा असते. पन्नास, शंभर रूपयांना असे जार म्हणजे तात्पुरती सोय. यात पाणी शुद्द करण्याचे तंत्र अर्थातच शास्त्रशुद्ध नसते, जो तो ज्याच्या त्याच्या अनूभया प्रमाणे पाणी साफ करून विकतो. यात कधी क्लोरिनचे प्रमाण खुप अधिक असते तर कधी आरओ तंत्राच्या सहाय्याने तमाम उपयुक्त, घातक जिवाणू मारलेले असतात. दुर्गम भागातल्या जारच्या दर्जाबद्दल तर विचारायलाच नको!
येथे लाकूड तोडायला कोण येते, यावर माहिती मिळाली, गावात कुठलाही समारंभ असला की मंडपासाठी बल्ल्या येथून तोडून आणल्या जातात. त्यांचा पूनर्वावर होतो पण आता बल्ल्या मिळावे अशी झाडे सुद्धा शिल्लाक राहिली नाहीत. दर दोन वर्षांनी डोंगर देवाच्या उत्सवासाठी तिन दिवस झाडाची लाकडे पेटविण्याची जूनी प्रथा आहे. त्यासाठी झाड येथूनच तोडले जाते. आता गावकरी म्हणतात सीताफळ, आंबा आदी झाडांचे रोपण करूया. 

 

जारचे पाणी
भरपूर पावसाच्या सातमाळेत आदिवासी मंडळी जारचे पाणी विकत घेताहेत', हा विचार ऐकून डोकं काम करेना. 'कुठे नेऊन ठेवलाय सह्याद्री आपला'! भर उन्हात मेंदूला चटका देणारी स्थिती ऐकत असताना विलास पुढे सरसावला आणि नेढ्याचा लहानसा कातळटप्पा सरसर वर चढून गेला. येथे मागची एक आठवण त्याने सांगितले, एक मानुस एकटा आला होता, तवा इथं बल्ली उभी केली होती, त्यावरून चढताना तो घसरला. आंग थरथरत होते. तुम्ही या, तुम्हाला जमेल, सोपं आहे. एक एक खाच तो सांगत होता. खुप अवघड नसला तरी हा टप्पा सोपा नक्कीच नाही. विना हेल्मेट, विना सुरक्षादोर वर चढून जाताना पुरेशी सावधानता बाळगावी, वरून घसरला तर खाली फार थोडी सपाटी, त्यापुढे  चार एकशे फुटांची सरळसोट दरी, चुकीला अर्थात कोणताच वाव नाही!
वर पोहोचल्यानंतर सोबतच्या दोराने अगोदर सगळ्यांच्या पाठपिशव्या ओढून घेत सुरक्षा दोर खाली सोडला. निलेशने नेढे उतरून पलिकडून दोर धरून वर खेचून घ्या असा सांगितले. त्याच्या सांगण्यात तथ्य होते. वर दोर बांधायला काहीच आधार नव्हते. पलिकडून दोर खेचणे सुरक्षित होते, पण त्याने आरोहक दिसू शकत नाही, मग खाली एका दगडाला दोर अॅंकर करून तो खाली सोडला. दोघे वर चढले. इथून उतरताना मोठी कसरत करावी लागणार होती. शेवटच्या माणसाला खालून सुरक्षा दोर देण्यासाठी कातळाला कुठून दोराला वळसा द्यायचा याची पाहणी करत असताना, विलासने आता इथून उतरायचे नाही, पलिकडून जायचे असे सांगितले.
मोहनदरच्या नेढ्यात पाच सहा जण आरामात बसू शकतात. पलिकडच्या बाजूने उतरणे त्या मानाने सोपे आहे. समोर साल्हेर, सालोटा आणि टकारा सुळक्याचे दर्शन घडल्याने आम्ही आनंदात होतो. डाव्या कोपर्‍यावर अचला, तौल्याची उत्तुंग शिखरे शानदार दिसत होती. नेढ्याला वीस एक फुटांवर एक आग्या मोहोळ दृष्टीस पडले. विलासने त्याच्या आजोबांनी सांगितलेली हकिकत कथन केली, एकदा पुन्याचे लोक आले होते, त्यात एकाने झाडावर लागलेल्या आग्या मोहोळाला गलोल मारली तर आग्यामाशा उठल्या, लोक इकडे तिकडे पळत होते. पळता पळता काही गावात पाहोचले व आमच्या घरात लपले, आग्यां घरात घुसून त्यांना चावल्या.



'तुम्हाला ते घर माहित आहे का? कितीला येते? आम्हाला पन तसे घर घ्यायचे आहे. आम्ही येथे येऊन त्यात मुक्काम करू'! मागे पुन्याचे लोक आले होते. त्यांनी दोन घरे तयार केली, एकात आम्ही झोपलो होतो'. 
'तसे लहान घडीचे तंबू सात आठशे रूपयांपासून मिळतात! काय करायचे घेऊन, त्याचा तितका उपयोग होईल का'? निलेशला काही बोध झाला नाही. इतका खर्च त्याच्या कुटुंबियांच्या आवाक्यात असेल असे वाटत नव्हते, त्याच्या निरागस प्रश्नांना कारूण्याची झालर वाटत होती. 
आमच्या सोबत एक डॉक्टर आहे हे त्याला कळाले होते, त्याने थेट प्रश्‌न केला, बाबांचा पाय लई दुखत हाये, तुम्ही तपासाल का? डॉक्टरांनी तो कापायला सांगितला आहे. त्याच्या बोलण्यात अतिश्योक्ती वाटत होती. डॉ. गोसावींनी त्याला बघतो असे सांगितल्याने त्याच्या चेहर्‍यावर समाधानाने हास्य उमटले, क्षणभराचीच ती प्रतिक्रीया लाखमोलाची ठरली होती.


Add caption

१०-३८ वाजता आम्ही नेढे सोडले आणि पश्चिम बाजूच्या पायवाटेने शिडक्याला वळसा मारून पंधरा मिनीटात वरच्या सपाटीला पोहोचलो. नेढ्या पासून वरच्या बाजूची उत्तर बाजू पर्यंत पसरलेल्या या लहानशा सपाटीतच मोहनदरी किल्ल्याचे अवशेष आहेत. हा खरे तर टेहाळणीसाठी वापरात असावा. वरच्या भागात उधवस्त तटबंदी अजूनही आपले अस्तित्व टिकवून आहे. पाण्याची कातळात खोदलेली जुनी टाकी ठिकठीकाणी असून वाड्यांची जोती मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडतात. आज घडीला एकाही टाक्यात पाणी टिपूसभर सुद्धा शिल्लक नव्हते. सगळी टाकी, गाळ मातीने भरलेली. पावसाळ्यात यात मुळातच फार थोडे पाणी साठत असावे जे भाद्रपतानंतर किती महिने टिकत असेल कुणास ठाऊक?
मोहनदरवर इतक्या मोठ्या संख्येने पाण्याची कातळात खोदलेली टाकी बघून वाटते की, त्यावरून तिथे सैन्याचा उपयुक्त राबता नेहमी असावा असे वाटते. आज ही सगळी टाकी गाळाने बुजली आहेत. पुरातत्वीय संशोधनाच्या अंगाने या टाक्यातला गाळ अगदी काळजीपूर्वक काढून संशोधन केले तर गत काळातील नाणी अथवा ऐतिहासिक महत्वाच्या काही गोष्टी किंवा वस्तुंचे अवशेष त्यात सापडू शकतील व या गडासंबंधी इतिहासातले महत्वाचे दुवे सापडण्यास मदत होऊ शकते. अती उत्साही दुर्गसंवर्धकांची दृष्टी फेरण्याच्या अगोदर हे कार्य दुर्ग संशोधकांनी अथवा पूरातत्व विभागाने करण्याची आवश्यकता आहे.

केम पासून सुरू होणार्‍या सातमाळा रांगेतील तौल्या, अचला, अहिवंत, सप्तश्रृंगी, मार्कंडेय, रावळ्या जावळ्या, लहान-मोठा बंड्या, धोडप, इखारा, लेकुरवाळा, कांचना, बाफळ्या, कोल्ह्या, कोळधेर, राजधेर असा भला मोठा विस्तार डोळ्यात समावत होता. सेलबारी-ढोलबारी रांगेतले काही किल्ले ओळखण्या इतके स्पष्ट दिसत होते. तर कण्हेरगड, कळवणची मोठी भिंत, प्रेमगिरी, ढोर्‍या, चौल्हेर, दीर-भावजई अशा कितीतरी डोंगरांच्या दर्शनाने मन हरखून जात होते.


भरपूर प्रमाणावर विखूरलेल्या इमारतींच्या भग्नावशेषांवरून येथे महत्वाचा सैन्य राबता असावा असे वाटते...

गडमाथ्यावर गवताचे पाते सुद्धा शिल्लक दिसले नाही. याचा अर्थ चराई किंवा घास कापून नेल्या स्पष्ट होत होते. लांबून एक गाय दिसली, पण ती आमची चाहूल लागल्याने लगेचच गुडूप झाली. वरच्या भागात झुडपाच्या नावाने करवंदा सारखी भासणारी पण मोठ्या पानांची झुडपे चैत्र पालवीमुळे हिरवीकंच भासत होती. ही आळवाची झाडे आहेत, त्यांची फळे आम्ही खातो असे विलासने सांगितले. संपुर्ण पठारावर करवंदाचे एकच झाड दिसले बाकी सगळे आळवाच्या लहान झुडपांचेच राज्य. याची पाने सुद्धा गुरे खात असावीत, अन्यथा आळवाची झाडे चांगली फोफावतात. पिवळ्या धम्मक डोंगरावर खालच्या बाजुला कुठे गर्द हिरवी झाडे तर कुठे झाडांना लालस, गुलाबी पालवी अशी संमित्र रंगसंगती मन सुखावत होती. 


उत्तर बाजूची तटबंदी

गडाच्या उत्तर टोकावरून भर उन्हात आमची उतराई सुरू झाली. आता आम्ही खालच्या टप्प्यावर आलो होतो. माथ्यावरून इथवर पोहोचायला सात आठ मिनीटे पुरेसे. कातळाच्या पातळ धारेचे हे उत्तर टोक, मोहनदरी हा एक डाईक आहे याची साक्ष देत होते. डाईक, अर्थातच ज्वालामुखीय उद्रेकातून तयार झालेली डोंगराची पापडा सारखी भासणारी भली लांब अशी पातळ धार आणि कातळाची ठोकळ्या ठोकळ्यासारखी रचना. सह्याद्रीत अशा अनेक डाईक प्रसिद्ध आहेत. कळवण परिसरात अनेक ठिकाणी डाईकच्या अश्म रचना, त्यातली धोडपची रचना ही सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण. याबाजूने डोळ्याच्या सरळ रेषेत ही कातळ भिंत एखादा सुळका भासत होती. येथे काही मधमाशा कानावरून सारख्या घोंघावत होत्या. काही धोका तर नाही, याचा अदमास घेत असाव्यात. सवयी प्रमाणे कोणीही त्यांना हटकले नाही, विलासला हे फार आवडले, 'माशीला मारलं की, त्या धावतात, त्यांना मारायचे नाही'. कड्यावर आणखी काही पोळी नजरेस दिसत होती. 
उन टिपेला होते, मग ते जाणवत का नव्हते? या प्रश्नाचे उत्तर आम्हाला या ठिकाणी सापडले. जोराचा वारा सुटला होता. जोर इतका की, सगळ्या अंगाला वार्‍याचा स्पर्ष जाणवत होता. पाऊस येण्याच्या अगोदर सोसाट्याचा वारा सुटतो तसा हा सोसाट्याचा वारा आमची सोबत करत होता. ही शूभ चिन्ह होती. पाऊस आज गाठणार! हे निश्चीत झाले होते. अंगाची लाही लाही करणार्‍या शरीराला पाण्याचा थंडावा मिळावा तर तो एखाद्या गडावर किंवा गडाच्या परिसरात. आज हे भाग्य आमच्या वाटेला येण्याची शक्यता होती. इथून पंचवीस मिनीटात मोहनदरीच्या सभामंडपात येऊन आम्ही दुपारच्या जेवणाची तयारी केली. सोबतच्या लहान गॅस शेगडीवर पाण्याच्या आधणासोबत अर्ध्या तासाच गरम जेवण तयार झाले. गावच्या मुलांसोबत गप्पा आणि जेवण असे आनंदाचे क्षण होते. विलासने त्याचा मित्र निलेशला कैर्‍या घेऊन यायला सांगितल्या. त्या कैर्‍या त्याने निष्णातपणे सोलल्या व त्यावर मिठ भूरभूरले. जेवणाला कैर्‍यांच्या चवीची सोबत लाभली होती.


येथे तटाचे मजबूत बांधकाम असावे...पाठीमागे प्रेमगिरी, मोठी भिंत, ढोर्‍या, धोडप असा संपन्न पसारा

इकडे विलास घरी जाऊन वडिलांना घेऊन आला. त्यांचा पाय एकदा मुरगळला होता. स्थानिक उपचार केल्याने तो बरा न होता गुडघ्याच्या वर पर्यंत त्रास सुरू झाला. वरच्या नसा आखडून गेल्या व चालणे दुर्भर झाले. डॉ. गोसाविंनी नाशिकमध्ये कोणत्या ठिकाणी उपचार होऊ शकतील याची माहिती दिली व नाशिकला आल्यावर संपर्क करायला सांगितले. प्रधानमंत्री जन धन योजनेचे कार्ड त्यांनी काडले होते, त्यामुळे पाच लाखांपर्यंतचा त्यांचा औषध उपचारांचा खर्च मोफत होऊ शकणार होता. प्रश्न असा आहे की, त्यांचा हा विमा सहजतेने मंजूर होईल का? नाही तर सरकारच्या अनेक चांगल्या योजना कागदावरच शेाभतात!





निम्मी सातमाळा तर मोबाईलच्या कॅमेर्‍याने टिपली आहे...साध्या डोळ्यांनी कोळधेर, राजदेर पर्यंतचे दर्शन घडत होते

अजूनही शाबूत असलेला तटाचा भाग...

या टाक्यातले पाणी पावसानंतर काही महिने तरी उपलब्ध राहते

तटबंदी चे अवशेष...

आशिष शिंपी, डॉ. अशोक गोसावी

मोहनदरला हवीय देवराई आणि वर्षभर पूरेल इतकी पाण्याची साठवणूक...



लहानसे वावटळ पाऊस येणार याची आगाऊ सूचना देताना...


शेवटी कार बाजुला लाऊन पायपीट...

देवळी कर्‍हाड
दुपारचे सव्वा वाजले. आम्ही मोहनदरीला रामराम करून देवळी कराडच्या दिशेने निघण्याचे ठरवले. त्याकरिता वणी सापूतारा रस्त्याने जाणे भाग होते. किती किलो मिटर अंतर पडेल अशी माहिती, तिथे जाऊन आलेल्या ज्ञानेश्वर गांगुर्डेला विचारली, तर तो बर्‍याच वर्षांपूर्वी जाऊन आल्याने त्याला नीटसे आठवत नव्हते. आठ किलो मिटर असे असे त्याने सांगितले. वणी चौफुली वरून खडी टाकलेला रस्ता सुरू झाला. गुजरात राज्य मार्गाचे काम सुरू होते. आठ किलो मिटर्सचाच प्रश्न असल्याने आम्ही पुढे जाण्याचा निर्णय घेतला. बारा किलो मिटर झाले तरी देवळी कर्‍हाडकडचे वळण सापडण्याची चिन्ह दिसेना. एक दोन ठिकाणी थांबून विचारले तर, तिथे मंदिर बघायला जाताय? त्यासाठी इतका आटापिटा? अशा प्रतिक्रीय ऐकायला मिळाल्या. अगोदर घागबारीचा फाटा लागेल, तिथून डाविकडे भनवड तर थोडे पुढे गेल्यावर खडी क्रशर लागेल त्या रस्त्याने खिरीड, पळसदरा, मोहपाडा सोडून पुढे जायचे. माहपाड्याकडे न जाता त्याच्या अगोदर वळण घ्यायचे. या प्रत्याक टप्प्यावर आमची थोडी थोडी चुकामूक झालीच, परंतू सजगता बाळगल्याने आम्ही लगेच वाट दुरूस्त करत होतो. हा आतला रस्ताही सर्वत्र खडवण टाकून नव्याने तयार केला जात होता. एके ठिकाणी गाडी पूढे जाऊ शकत नाही, अशी स्थिती होती तेव्हा गाडी रस्त्याच्या कडेला लाऊन पायीच देवळी कर्‍हाडकडे प्रस्थान केले. अर्थात हे अंतर किलोमिटरभर होते त्यामुळे फार त्रास जाणवला नाही. 
देवळी कर्‍हाडचे शिवमंदिर लांबून दिसत होते त्यावरून त्याची भव्यता लक्षात येत होती. या भागात सह्याद्रीचे वेगळेच रूप बघायला मिळत होते. तौल्या-आतळ्या (अचला) सोडले तर एकही ओळखीचा डोंगर दिसत नव्हता. 


कराडेश्वर मंदिराच्या प्रांगणातला हा विशाल पिंपळ...

देवळी कर्‍हाड आणि वडाळी हटगड अशी ही दोन गावांची मिळून ग्रामपंचायत आहे. इथून हाटगडचा किल्ला दहा किलो मिटर अंतरावर आहे. हटगड किल्ल्याच्या पायथ्याचे हाटगड सोडून हटगड नाव जोडलेली परिसरात दरेगाव हाटगड, करंभेळ हाटगड अशी आणखी तीन गावे हाटगड नावाचा महिमाच कथन करतात. 
केमच्या डोंगरावर उगम पावणारी गिरणा नदी देवळी कराडला कवेत घेऊनच पुढे सरकते. या नदीच्या काठावर कुठल्या राजवटीत हे सुंदर मंदिर बांधले या संबंधात कोणतीच माहिती मिळू शकली नाही. मंदिराची शैली मला सिन्नरच्या गोंदेश्वराशी मिळती जुळती वाटली. अर्थात प्रवरेच्या आणि गोदावरी नदीच्या काठावर जशी पुरातन काळात शिवमंदिरे बांधण्यात आली, त्याच धर्तीवर गिरणेच्या काठावरचे हे शिव मंदिर असावे. मंदिरातील कराडेश्वराचे जुने शिवलिंग भंग पावल्यामुळे अलिकडच्या काळात नविन शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे नंदि, गणपतीच्या नव्या मुर्ती कातळात घडविण्यात आल्या आहेत. शिव-पार्वतीची जुनी मुर्ती अजूनही गाभार्‍यात आहे. मंदिराच्या प्रशस्त आवाराला सिमेंट कॉंक्रिटचे कुंपण तयार करण्यात आले आहे. भव्य आकाराच्या प्रांगणात सर्वत्र पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले आहेत. सुंदर अशा पुरातन मंदिराच्या कातळ कोरिव नक्षीकामाशी ते अजिबात मेळ खात नाहीत. हल्ली अत्यंत कमी पैसा पर्यटन विकासाठी मंजूर होतो आणि त्यातून जी कामे होतात ती तात्पूरती मलमपट्टी ठरत आहेत. मंदिराच्या बाहेर जुना पिंपळाचा वृक्ष वीस मिटर तरी फैलावलेला असावा. इतका पसरलेला पिंपळ प्रथमच बघायला मिळाला. जी कहाणी मोहनदरीची तीच कथा देवळी कराडची - ती म्हणजे पिण्याच्या पाण्याची अन शेतीच्या पाण्याची समस्या. येथे उन्हाळ्यात मोठ्या मुष्किलीने दोन चार हंडेच पाणी मिळते, बर्‍याचदा हंडा सुद्धा भरत नाही, ग्रामपंचायतीला पाणी विकत आणावे लागते. वापरण्यासाठी पाणी फारच तोकडे पडते, अशी व्यथा मंदिरात भेटलेल्या ग्रामस्थांच्या बोलण्यातून जाणवत होती.


मंदिराचे देखणे रूप बघून तिथे पोहोचण्यासाठी केलेला संघर्ष सार्थकी ठरला...

ऐन गिरणच्या काठावरच्या, चहु बाजुंनी डोंगरांनी वेढलेल्या, भरपूर पर्जन्यमान असलेल्या या गाव परिसरात जंगल बर्‍यापैकी टिकून आहे. परिसरात अनेक ठिकाणी शेती हिरवीगार दिसते. पण जिथे काही लोकांना शेतीसाठी पाणी मिळविण्याच्या खटपटी केल्या, तिथे काही पाऊसच नाही, असा निराशावादी सूर आळवणारे शेतकरी भेटले. अर्थात पावसाच्या पाण्यावरच्या पिकांनंतर आठ महिने शेतात काहीही न करणारी ही मंडळी स्वाभाविकपणे मजूरीकडे वळतात, त्यामुळे गावची पैसावारी खाशी कमी. एक मात्र मान्य करावे लागेल, हा परिसर दुर्गम व तुरळक लोकवस्तीचा डोंगरांळ असल्यामुळे येथे जंगल संपदा चांगली दिसून येते. इथल्या अपरिचीत भव्य दिव्य आकाराच्या वन संपदेने नटलेल्या सावर्‍या, देवीचा दांड, डुक्कर दांड आदी डोंगरे भटकंतीच्या नव्या वाटा उघडू शकते. 





 Sahyadri Trekkers Bloggers