Friday, November 28, 2008

Tribute to Ashok Kamte


दहशतीचे सावट...अनं थंडीची चादर
पॅनिक मोड : बाजारपेठेत शुकशूकाट....रस्त्यावर वर्दळ रोडावली


प्रशांत परदेशी
नाशिक, ता. 27 : शहराचे आणि थंडीचे जिवाभावाचे नाते आहे. द्राक्ष उत्पादकांना हुडहूडी भरविणारी थंडी...तीच जर बेताने आली तर त्याचा आनंद काय वर्णावा. या सप्ताहात खऱ्या अर्थाने थंडीची शाल पांघरलेल्या शहरात बुधवारी (ता. 26) सायंकाळ पासून बऱ्या पैकी कडाका जाणवला. या सुखद अनूभुतीचे काही तास उलटत नाही, तोच मुंबईवर दहशतवादाच्या बेछुट साटाची वार्ता दुरचित्रवाणीच्या माध्यमातून येऊन थडकली. गुरूवारी सकाळी शहरात थंडीची नव्हे, तर मुंबईच्या भयाण अतिरेकीकृत्याची प्रामुख्याने चर्चा होती.
भारताच्या विरोधात सर्वात मोठी दहशतवादी कारवाई म्हणून संबोधलेल्या मुंबईवरील हल्ल्याचा सकाळी पहिला दृष्य परिणाम शैक्षणिक क्षेत्रावर जाणवला. एरवी शांत, सुरक्षित शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिककरांनी सकाळच्या थंडीच्या कडाक्‍यातही आपल्या पाल्यांना शाळेत पाठविले खरे, परंतु मुंबईवरील हल्ल्याचा निषेध म्हणा की, भितीची छाया, मुलांना आल्या पावली घरी पाठविण्याचा सपाटा सुरू झाला होता. आजवर मुंबईत अनेक दहशत वादी हल्ले झाले आहेत, परंतू त्याचे इतके मोठे पडसाद नाशिकमध्ये प्रथमच बघायला मिळाले.
घराघरात लोक बुधवारच्या सायंकाळ पासूनच दुरचित्रवाणी वरून सुरू असलेल्या विविध वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाला खिळून होते. त्यामुळे नाशिककरांचीगुरूवारची सकाळ थंडी पेक्षा दहशतीच्या छायेमुळे कुर्मगती सुरू झाली. शाळेत गेलेली मुले आल्या पावली परत आल्याने कामावर जाणाऱ्यांचाही उत्साह ओसरताना दिसुन आला.
हीच गत बाजारपेठांमध्ये दिसुन आली. बहुतांशी दुकाने नित्यक्रमाने सुरू झाली, परंतू ग्राहकांचा उत्साह अतिशय मंद असल्याचे शहरातून फेरफटका मारताना दिसुन आले. रस्त्यांवर दिवसभर कमालीचा शुकशुकाट होता. हल्ली ठिकठीकाणी दिसणारे ट्रॅफिक जॅम फारसे आढळले नाही.
सकाळी सकाळी नभोवाणीवरून पोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी नाशिककरांना निर्भयपणे कामकाज करण्याचा व पोलीस अतिरेकी कारवायांचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम असल्याचा निर्वाळा दिला होता. लोकांचे धाडस वाढविण्याकरिता रॉय यांची नभोवाणीवरची उद्‌घोषणा योग्यच होती. परंतू प्रत्यक्षात शहरात चौका चौकात पोलिसांचा म्हणावा तसा बंदोबस्त दिसुन आला नाही. मुंबईत ज्यापद्धतीने अशोक कामते, हेमंत करकरे, विजय साळसकर यांच्या सारखे बड्या अधिकाऱ्यांसह चौदा पोलिस अतिरेक्‍यांच्या गोळ्यांना बळी पडले, ते पाहता, न जाणो नाशिकवर सुद्धा एखादा दहशतवादी हल्ला झाला तर इथल्या पोलीस, वैद्यकीय व इतर यंत्रणा सक्षम आहेत का? अशा शंका कुशंका घेऊन लोकांनी आजचा दिवस काढला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाचा चेहरा मोहरा बदलला आहे, त्यांच्याकडे आधुनिक शस्त्रास्त्रे असताना आपल्या पोलीसांकडे बंदुकीच्या गोळ्यांना अवरोध करणारे पेहराव सुद्धा नाही, तिथे काठी घेऊन बंदोबस्तावरचे पोलीस काय करणार? अशा शंका या निमीत्ताने उपस्थित होत होत्या.

आठवणींना उजाळा
दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे मुंबईत अतिरेक्‍यांच्या गोळीबारात शहीद झाल्याने त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलिस व इतर सरकारी अधिकाऱ्यांत व कर्मचाऱ्यांमध्ये त्यांच्या आठवणींची चर्चा होती. मुंबईचे अतिरीक्त पोलिस आयुक्त अशोक कामते यांच्या आठवणी मन हेलावणाऱ्या होत्या. दोन वर्षांपूर्वी नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनीत राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सर्वात ठळकपणे जाणविणारी उपस्थिती म्हणून कामतेंचे उल्लेख करता येईल.
वेटलिफ्टींग संघाचे मनोबल वाढविणारा ट्रॅकसुटमधला हा गोरापान अधिकारी, कोणी रशियन वेटलिफ्टींग प्रशिक्षक असावा! असे वाटले होते, परंतू अपघातात दोन्ही पाय गमवूनही खेळांवरची आवड तसुभरही कमी होऊ न देणारे कोल्हापूरचे छत्रपती पुरस्कार विजेता वेटलिफ्टींग व शरीरसौष्ठव संघटक विभिषण पाटील यांनी, " हे अशोक कामते साहेब, कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक' अशी ओळख करून दिली. पाठोपाठ, "त्यांनी यंदा मोठ्या प्रमाणावर खेळाडूना कोल्हापूर पोलिस दलात भरती करून घेतले', अशी पुस्ती विभिषण पाटलांनी जोडली होती.
राज्या पोलीस क्रीडा स्पर्धेत कोल्हापूरला पहिले वहिले सर्वसाधारण जेतेपद मिळवून देण्याचा निर्धार करणारे कामते दिवसभर मैदानात हजर राहून आपल्या प्रत्येक संघाचे मनोधैर्य वाढविताना दिसायचे. खेळाडू हा पोलिस दलाचा खऱ्या अर्थाने दागिना मानणारे कामते, "खेळाडू पोलिसांमुळे पोलिस दलाची प्रतिमा सुधारेल व खिलाडीवृत्ती वृद्धिंगत होऊन दैनंदिन कामात तत्परता दिसुन येईल' असे मानत.

1 comment:

  1. thanks for commenting on the ashokkamte blog and registering yourself as a follower... i enjoyed reading your blog briefly.

    regards,
    sanjay d (san francisco)

    ReplyDelete